Adolf Hitler and Bhupinder Singh of Patiala: भारतातील राजे-महाराजांना आलिशान गाड्यांचे, विशेषत: परदेशातून आयात केलेल्या गाड्यांचे/ कारचे प्रचंड आकर्षण होते. त्यात रोल्स रॉइस कार या सर्वाधिक लोकप्रिय होत्या. भारतीय महाराजांच्या यादीतील पटियालाचे महाराजा भूपिंदर सिंग यांचाही त्याला अपवाद नव्हता. त्यांच्याकडे रोल्स रॉइस गाड्यांचा एक संपूर्ण ताफा होता. परंतु त्यांच्याकडे आणखी एक अनोखी कार होती, जी त्यांना हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलरने स्वतः भेट म्हणून दिली होती, ती म्हणजे त्या काळातील प्रसिद्ध मेबॅक. त्याच पार्श्वभूमीवर महाराजा भूपिंदर सिंग आणि जर्मन हुकूमशहा हिटलर यांच्यात नक्की काय संबंध होते आणि हिटलरने त्यांना ही कार भेट का दिली, हे जाणून घेणं नक्कीच रंजक ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पटियालाचे महाराजा भूपिंदर सिंग

मुघल साम्राज्याच्या पतनानंतर बाबा आला सिंग यांनी १७६३ साली स्थापन केलेल्या पटियाला राज्याचे ब्रिटिशांशी घनिष्ठ संबंध होते, विशेषत: १८५७ च्या उठावादरम्यान ब्रिटिशांना दिलेल्या समर्थनामुळे हे संबंध घनिष्ठ झाले होते. त्या काळातील हिटलरसारख्या प्रभावशाली व्यक्तींशी महाराजांचे संबंध प्रस्थापित होण्यामागे या युतीचा मोठा वाटा असावा. पंजाबच्या सुपीक मैदानांनी या प्रदेशात विपुल संपत्ती आणली, त्यामुळे हे राज्य भारतातील सर्वात श्रीमंत आणि शक्तिशाली राज्यांपैकी एक होते. पटियालाच्या राज्यकर्त्यांनी अफगाणिस्तान, चीन आणि मध्य पूर्वेतील लष्करी मोहिमांमध्ये ब्रिटिशांना समर्थन देऊन आपले संबंध अधिक मजबूत केले होते.

अधिक वाचा: २०० वर्ष जुना स्टॅम्प पेपर, ईस्ट इंडिया, जातीव्यवस्था आणि महिला; तत्कालीन समाजाची नेमकी कोणती माहिती मिळते?

२७ रोल्स रॉइस गाड्या

१८९१ ते १९३८ या काळात राज्य करणारे महाराजा भूपिंदर सिंग हे त्यांच्या दणकट व्यक्तिमत्त्वासाठी आणि अभूतपूर्व प्रतिष्ठेसाठी प्रसिद्ध होते. त्यांना वाईन, दाग-दागिन्यांपासून स्पोर्ट्स कारसारख्या विविध लक्झरी वस्तूंची आवड होती. त्यांच्या ताफ्यात २७ हून अधिक रोल्स रॉइस गाड्या होत्या आणि त्यांच्याकडे दागिन्यांचा मोठा संग्रह होता, ज्यात पॅरिसमधील कार्टियरने तयार केलेले प्रसिद्ध ‘पटियाला नेकलेस’ याचा देखील समावेश होतो. लक्झरी वस्तूंच्या प्रेमापलीकडे भूपिंदर सिंग हे एक महत्त्वपूर्ण राजकीय व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी चेंबर ऑफ प्रिन्सेसमध्ये एक प्रभावशाली सदस्य म्हणून काम केले. महाराजा भूपिंदर सिंग हे भारतीय क्रिकेट इतिहासातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व होते. ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) संस्थापक सदस्य होते, ही भारतीय क्रिकेटशी संबंधित शिखर संस्था आहे. त्यांनी नवानगरचे महाराजा रणजित सिंग यांच्या स्मरणार्थ प्रतिष्ठित रणजी करंडक देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा सुरू केली. राजकीयदृष्ट्या महाराजा भूपिंदर सिंग यांचा प्रभाव मोठा होता. चेंबर ऑफ प्रिन्सेसचे प्रमुख सदस्य म्हणून त्यांनी भारतासह संपूर्ण युरोपमध्ये आपला ठसा उमटवला. त्यांच्या व्यक्तिगत मैत्रीचे संबंध इंग्लंड, स्पेन, स्वीडन, नॉर्वे आणि इतर अनेक राष्ट्रांच्या राजांशीही होते.

महाराज आणि हिटलर भेट

१९३५ साली जर्मनीच्या दौऱ्यादरम्यान ॲडॉल्फ हिटलरने महाराज भूपिंदर सिंग यांना मेबॅक कार भेट दिली. हा एक दुर्मीळ सन्मान होता, कारण हिटलरने फक्त इजिप्तचा राजा फारूक आणि नेपाळचा जुद्ध शमशेर जंग बहादूर राणा यांनाच अशी कार भेट दिली होती. असे मानले जाते की, जर्मनी आणि ब्रिटिश साम्राज्य यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, महाराज तटस्थ भूमिका घेतील हे सुनिश्चित करण्यासाठी हिटलरने ही भेट दिली होती. या विलक्षण भेटीची कथा महाराजांचे नातू राजा मालविंदर सिंग यांनी शारदा द्विवेदी यांच्या “Automobiles of the Maharajas” या पुस्तकात सांगितली आहे. त्यांनी सांगितले की, जेव्हा त्यांच्या आजोबांनी १९३५ साली जर्मनीला भेट दिली आणि ॲडॉल्फ हिटलरला भेटण्याची विनंती केली, तेव्हा हिटलर त्यांना भेटण्यासाठी फारसा आनंदी नव्हता. परिणामी त्याने महाराजांबरोबर फक्त १०-१५ मिनिटांच्या भेटीसाठी सहमती दर्शवली. परंतु, त्यांनी बोलणे सुरू केल्यावर १५ मिनिटांची वेळ ३० मिनिटांवर गेली आणि नंतर ही भेट एक तासापर्यंत वाढली. त्यांच्या संवादाने प्रभावित होऊन हिटलरने महाराजांना जेवणासाठी आमंत्रित केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत येण्याचे निमंत्रण दिले, आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी देखील बोलावले. शेवटच्या दिवशी, हिटलरने त्यांना लिग्नोज, वॉल्थर आणि लुगर पिस्तुलांसह जर्मन शस्त्रे आणि एक आलिशान मेबॅक कार भेट दिली.

दुर्मीळ आणि शक्तिशाली मेबॅक

महाराजा भूपिंदरसिंग यांना भेट दिलेली मेबॅक ही जगात तयार झालेल्या फक्त सहा कारपैकी एक होती, ज्यामध्ये १२ झेपेलिन इंजिन होते. त्यामुळे त्याचे बोनट खूपच मोठे होते. कार लाल- मरून रंगाची होती, ज्यात ड्रायव्हरसाठी आणि पुढील बाजूस एका प्रवाशासाठी तर मागच्या बाजूस आणखी तीन प्रवासी बसू शकतील अशी व्यवस्था होती. ही विलक्षण मेबॅक कार भारतात आणून महाराजांच्या आलिशान गाड्यांच्या मोठ्या संग्रहात समाविष्ट करण्यात आली आणि पटियालातील मोती बाग पॅलेसच्या गॅरेजमध्ये ठेवली गेली. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर महाराजा भूपिंदरसिंग यांनी मेबॅक राजवाड्याच्या आत लपवून ठेवली, त्यामुळे ती नंतर वापरात आणली गेली नाही.

अधिक वाचा: Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: ३५७ वर्षे झाली, छत्रपती शिवरायांचा किल्ला मजबूत; पण पुतळा मात्र कोसळला… 

कारचा अद्वितीय नोंदणी क्रमांक

महाराजा भूपिंदरसिंग यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा महाराजा यादवेंद्र सिंग गादीवर आला. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पटियाला इतर संस्थानांमध्ये विलीनीकरण करून पेप्सू (पटियाला आणि पूर्व पंजाब राज्ये संघ) स्थापन करण्यात आले. या काळात पंजाबमध्ये प्रथमच मेबॅक कारची नोंदणी करण्यात आली, कारची नंबर प्लेट ‘७’ होती. बदलत्या काळाशी जुळवून घेत इतर अनेक राजघराण्यांप्रमाणे, पतियाळा राजघराण्याने अखेरीस मेबॅकसह बरीच मालमत्ता विकली. भूपिंदर सिंग यांनी ही कार अखेरीस त्यांच्या एडीसीला (एड-डी-कॅम्प) दिली, त्याने तिची विक्री केली. आज ही कार अमरिकेमधील एका खाजगी संग्राहकाकडे आहे, आणि तिची किंमत सुमारे सुमारे ५० कोटी रुपये आहे. भूपिंदरसिंग हे खाजगी विमानाचे मालक असलेले पहिले भारतीय होते, ज्यासाठी त्यांनी पटियालामध्ये स्वतःची धावपट्टी बांधण्यात आली  होती.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharaja bhupinder singh of patiala was gifted unique car by adolf hitler also owned indias first private jet svs