वर्षानुवर्षे औरंगजेबाने मराठ्यांचा निःपात करण्यासाठी आणि दक्षिणेत आपले साम्राज्य वाढवण्यासाठी संघर्ष केला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या निधनानंतर मराठ्यांचा प्रतिकार संपेल असे त्याला वाटले, मात्र तसे घडले नाही. राजाराम महाराजांच्या निधनानंतर ताराबाईंनी नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली आणि रणनीती आणि गनिमी काव्याच्या सहाय्याने मराठ्यांच्या लढ्याला नवसंजीवनी दिली.

‘Rainha dos Marathas’ (मराठ्यांची राणी) हा किताब महाराणी ताराबाई भोसले यांना पोर्तुगीजांनी बहाल केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूनबाई असलेल्या ताराबाई यांनी मुघल बादशाह औरंगजेबाच्या विरुद्ध दाखवलेल्या शौर्याबद्दल हा किताब त्यांना देण्यात आला. सहावा मुघल सम्राट औरंगजेब याच्याविरुद्धचा संघर्ष अनेक दशकांपर्यंत सुरू होता आणि १७०० मध्ये राजाराम महाराजांचे निधन झाल्यानंतरही तो संपला नाही. राजाराम महाराजांच्या मागे त्यांची पत्नी ताराबाई आणि शिवाजी दुसरे राहिले. ताराबाईंनी औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत मुघलांना तोंड देण्याची एकही संधी गमावली नाही. महाराणी ताराबाई भोसले यांनी ‘स्वराज्य’ टिकवण्यासाठी अपूर्व योगदान दिले. मुघलांच्या अमानुष अत्याचारांसमोर न झुकता त्यांनी सातत्याने प्रतिकार केला.

महाराणी ताराबाई यांनी आपल्या अदम्य इच्छाशक्तीच्या जोरावर इतिहासातील पराक्रमी स्त्रियांमध्ये आपले स्थान निर्माण केले. इतिहासकार जदुनाथ सरकार म्हणतात, “१७०० ते १७०७ या काळात महाराष्ट्राचे नेतृत्व कोणत्याही मंत्र्याने नव्हे, तर राजमाता ताराबाईंनी केले. त्यांच्या प्रशासनकौशल्याने आणि दुर्दम्य आत्मविश्वासाने या कठीण काळात देशाला वाचवले.” जदुनाथ सरकार यांनी मुघलांविषयीच्या आपल्या लेखनात नमूद केले आहे की, जर ताराबाई नसत्या, तर मराठा साम्राज्याचे रक्षण करणे कठीण झाले असते आणि इतिहासाचा प्रवाह कदाचित वेगळ्या दिशेने गेला असता. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी राज्याचा कार्यभार स्वीकारला आणि मुघलांविरुद्ध नऊ वर्षे अखंड संघर्ष करत जीवनाचे बलिदान दिले. या संघर्षात त्यांना औरंगजेबाच्या कैदेत भीषण छळ सहन करावा लागला, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत ते झुकले नाहीत आणि मुघलांविरुद्ध प्रतिकार करतच राहिले.

महाराणी ताराबाई भोसले

ताराबाई यांचा जन्म १६७५ साली भोसले घराण्यात झाला. त्यांचा विवाह ८ व्या वर्षी राजाराम महाराजांशी झाला. राजाराम महाराजांचे फुफ्फुसाच्या आजाराने निधन झाले. त्यामुळे ताराबाई वयाच्या २५ व्या वर्षी विधवा झाल्या. पतीच्या निधनानंतर दु:खात गुरफटून न जाता, त्याच क्षणापासून त्यांनी आपला अल्पवयीन पुत्र शिवाजी दुसरा याच्यासाठी राज्यसंस्था सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली. स्वराज्याचे स्वप्न जिवंत ठेवण्याचा व स्वतंत्र मराठा साम्राज्य स्थापन करण्याचा दृढनिश्चय त्यांनी केला. ताराबाईंना घोडदळाच्या मोहिमांमध्ये विशेष कौशल्य प्राप्त होते. हे कौशल्य त्यांनी आपल्या वडिलांकडून हंबीरराव मोहिते यांच्याकडून आत्मसात केले. हंबीरराव मोहिते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सेनापती होते. ताराबाई यांनी मुघलांविरुद्धच्या अनेक लढायांमध्ये स्वतः मराठा सैन्याचे नेतृत्व केले. बहुतेक शासक राजमहालाच्या भिंतींआडून राज्यकारभार करत असत. तसे न करता ताराबाईंनी थेट रणांगणावरून नेतृत्व केले. त्या एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यांवर जात, युद्धसल्ले घेत आणि मोहिमांचे नियोजन करत असत.

१७०० नंतर मराठ्यांचा मुघलांविरुद्ध प्रतिकार

एक स्त्री लढणार हे मुघल सैन्याला समजले तेव्हा त्यांनी मराठ्यांचा उपहास केला. पण प्रत्यक्ष युद्धभूमीवर स्थिती वेगळीच होती. लढाईच्या सुरुवातीला मुघलांनी या मराठा राणीला कमी लेखले होते. परंतु, युद्ध संपताना मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी विकसित केलेल्या गनिमी काव्याच्या युद्धतंत्राचा वापर करत मराठ्यांनी मुघल सैन्यावर विजय मिळवला होता. ‘A Social History of the Deccan’ या ग्रंथात इतिहासकार रिचर्ड ईटन यांनी मुघल दरबारी इतिहासकार आणि ‘मुन्तखब अल-लुबाब’ या ग्रंथाचे लेखक खफी खान यांच्या खालील ओळी उद्धृत केल्या आहेत, “मुघलांना वाटले की दोन लहान मुले आणि एक असहाय स्त्री यांचा पराभव करणे सोपे असेल. त्यांना आपला शत्रू दुर्बळ, तुच्छ आणि असहाय वाटला. पण ताराबाई रामराजाची पत्नी, तिने प्रशासकीय आणि लष्करी बाबींमध्ये अफाट ताकद दाखवली. दररोज युद्ध अधिक तीव्र होत गेले आणि मराठ्यांची शक्ती वाढत गेली. ताराबाईंच्या कारकीर्दीत मराठा सैन्याने दक्षिण कर्नाटकमध्ये विजय मिळवला आणि पश्चिम किनाऱ्यावरील भरभराटीच्या अनेक शहरांवर हल्ले केले. यात बुरहानपूर, सुरत आणि भरुच यांचा समावेश होता. ताराबाईंच्या प्रभावी युद्धनीतींपैकी एक म्हणजे मुघल व्यवस्थेला त्यांच्याच विरोधात वळवणे. औरंगजेबाने वापरलेल्या लष्करी अधिकाऱ्यांना लाच देण्याच्या तंत्राचा त्यांनी उपयोग केला आणि त्यामुळे अनेक महत्त्वाच्या मुघल सेनाधिकाऱ्यांनी गद्दारी करून मराठ्यांना साथ दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने मुघल साम्राज्यात खोलवर प्रवेश केला आणि माळवा व गुजरातसारख्या शहरांवर धडाकेबाज छापे टाकले. या प्रदेशांमध्ये मराठ्यांनी स्वतःचे महसूल गोळा करणारे अधिकारी नेमले त्यांना कमाईशदार म्हटले जात असे.

औरंगजेब वृद्ध व थकलेला होता तरी तो वारंवार मराठा उठाव दडपण्याचा जोरदार प्रयत्न करत असे. परंतु, त्याला त्यात अपयश आले. अखेर २ मार्च १७०७ रोजी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मुघलांनी नवीन डाव आखला छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र आणि ताराबाईंचे पुतणे शाहू महाराज यांना मुक्त करण्याचा निर्णय घेतला. यामागील हेतू मराठा नेतृत्वात फूट पाडण्याचा आणि सिंहासनासाठी दुसरा दावेदार उभा करण्याचा होता. ही योजना यशस्वी ठरली. शाहूंनी ताराबाई व शिवाजी दुसऱ्यांविरुद्ध मराठा संघराज्यावर हक्क सांगितला. ताराबाईंना मुघलसंलग्न शाहूंच्या प्रभावाचा धोका वाटत होता, त्यामुळे त्या झुकल्या नाहीत. हा राजकीय संघर्ष हळूहळू युद्धात परिवर्तित झाला. याच काळात ताराबाईंनी राजाराम दुसरे यांना आपल्या नातवाचा दर्जा दिला आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज असल्याचे सांगितले. पराभव कधीही स्वीकारायचा नाही यावर ठाम असलेल्या ताराबाई कोल्हापुरात स्वतंत्र दरबार स्थापन करून सत्तेच्या लढाईत टिकून राहिल्या. मात्र, त्यांचे राज्य अल्पकाळच राहिले. शाहूंनी राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी राजसाबाई यांच्याशी हातमिळवणी केली आणि त्यांचा मुलगा संभाजी दुसरा याला कोल्हापूरचा राजा घोषित केले. यानंतर ताराबाई सत्तेपासून दूर केल्या गेल्या. तरीही, साम्राज्यातील राजकीय उलथापालथीनंतरही ताराबाई मराठा राजकारणातील प्रभावशाली व्यक्ती राहिल्या. त्या दीर्घकाळ राज्यकारभारात सक्रीय होत्या.

१७६१ मध्ये त्यांचे निधन झाले आणि काही महिन्यांनंतरच मराठ्यांना पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मोठा पराभव सहन करावा लागला. १८ व्या शतकाच्या सुरुवातीला ताराबाईंच्या अढळ नेतृत्वाशिवाय मराठा साम्राज्य कदाचित एवढे टिकलेच नसते, असे इतिहासकार मानतात.

Story img Loader