-अनिश पाटील
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील अमेरिकन स्कूलवर दहशतवादी हल्ला करून परदेशी नागरिकांना मारण्याचा कट रचणाऱ्या अनिस शकील अहमद अन्सारी याला नुकतीच दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. कुर्ला भागात राहणाऱ्या या २८ वर्षीय संगणक अभियंत्यावर दहशतवादी हल्ल्याचा कट रचणे, सायबर दहशतवाद आणि जिहादी कल्पनांचा प्रसार केल्याचे आरोप आहेत. सायबर दहशतवादाच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाल्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी.
नेमके प्रकरण काय?
बीकेसी येथील अमेरिकन स्कूल उडवण्याचा कट रचल्याप्रकरणी दहशतवात विरोधी पथकाने (एटीएस) सॉफ्टवेअर अभियंता अनिस अन्सारीला १८ ऑक्टोबर २०१४ रोजी अटक केली होती. अन्सारी हा एकटाच हल्ला करणार होता. त्याला लोन वुल्फ अॅटॅक असे म्हटले जाते. त्यासाठी तो उमर एलहाज नावाच्या व्यक्तीशी फेसबुक चॅटद्वारे संपर्कात होता. परदेशी नागरिकांना २६-११ तील हल्ल्याप्रमाणे लक्ष्य करण्याचा कट रचण्यात आला होता. त्यासाठी त्याने बीकेसी येथील अमेरिकन स्कूलची निवड केली होती. त्याच्या चॅटींग डेटावरून या कटाची सर्व माहिती स्पष्ट झाली. त्यामुळे सायबर दहशतवाद प्रकरणात अन्सारीला शिक्षा सुनावण्यात आली. सायबर दहशतवादाखाली गुन्हा दाखल करून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेला हा देशातील पहिलाच खटला आहे. महाराष्ट्र एटीएसने नोंदवलेल्या गुन्ह्यात आलेल्या निकालांपैकी हा अतिशय महत्त्वाचा निकाल मानला जातो. अन्सारीला २०१४मध्ये अटक केली त्यावेळी तो आयसिस या दहशतवादी संघटनेचा समर्थक असल्याचा संशय होता.
थर्माइट बॉम्ब हल्ला करण्याची तयारी?
धातूस्वरूप ऑक्साईड आणि धातूची भुकटी यांचे मिश्रण करून थर्माइट बॉम्ब तयार केला जातो. याबाबत काही संभाषणही एटीएसच्या हाती लागले होते. या सर्व कटाची माहिती अन्सारी उमर एलहाज नावाच्या व्यक्तीला देत होता. त्याच वेळी तो अंधेरीत एका कंपनीत असोसिएट जिओग्राफिक टेक्निशियन म्हणून काम करत होता. कामाच्या ठिकाणी असलेल्या संगणकाचा वापर त्याने या हल्ल्याचा कट रचण्यासाठी केला होता. थर्माईट बॉम्ब तयार करण्याची संपूर्ण पद्धत त्याने शिकून घेतली होती. ही माहिती त्याने उमर एलहाज याच्याशी झालेल्या संभाषणातही दिली होती. या संभाषणाची प्रत अन्सारीविरोधात सर्वात मोठा पुरावा ठरली. अन्सारीने याप्रकरणी समाज माध्यमांचा वापर करून अमेरिकन स्कूलवर हल्ला करण्याचा कट रचला होता. तत्कालीन एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली एटीएसच्या पथकाने मोठ्या शिताफीने अन्सारीला अटक करून त्याचा कट हाणून पाडला. एटीएसने प्रतिबंधात्मक कारवाई करून हल्ला होण्यापूर्वीच रोखला. गंभीर बाब म्हणजे २०१४ मध्ये अन्सारीला अटक झाल्यानंतर दोन महिन्यांनंतरच पाकिस्तानातील पेशावर येथे शाळेवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात १३२ विद्यार्थ्यांसह १४१ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे एटीएसने केलेली ही प्रतिबंधात्मक कारवाई, फार महत्त्वपूर्ण मानली जाते.
एटीएसने कोणते पुरावे सादर केले?
अन्सारीविरोधात ७२८ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यात ५० साक्षीदार आणि न्यायवैद्यक तज्ज्ञांचा समावेश आहे. साक्षीदारांमध्ये अन्सारीसह काम करणारे सहकारी, त्याचे वरिष्ठ, शेजारी यांचाही समावेश होता. या तज्ज्ञांनी ६ संगणक, हार्डडिस्क आणि एका मोबाइल संचाची तपासणी करून संपूर्ण अहवाल सादर केला. याप्रकरणी सरकारी पक्षाने बाजू मांडताना दया दाखवल्यास अन्सारी आपला कट अमलात आणू शकतो, असे दाखवून दिले. त्याने उसारिम लोगान नावाने स्वतःचे बनावट फेसबुक खाते तयार करून त्या माध्यमातून तो उमरशी संवाद साधत होता. या संभाषणाच्या प्रतीही पुरावा म्हणून सादर करण्यात आल्या.
अन्सारीला नेमकी काय शिक्षा झाली?
वांद्रे-कुर्ला संकुल येथील अमेरिकन स्कूल या इमारतीवर दहशतवादी हल्ला करून परदेशी नागरीकांना मारण्याचा कट रचल्याप्रकरणी ऑक्टोबर २०१४ मध्ये आरोपी अनिस शकील अहमद अन्सारी विरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ४३, ६६ सह ६६ ( अ ) (अ), ६६ (फ), तसेच भादंवि कलमांतर्गत कट रचल्याप्रकणी १४ जानेवारी २०१५ मध्ये सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी एटीएसने सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारावर अन्सारीला माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (फ) (सायबर दहशतवाद), ४३ (अ) व भादवि कलम ११५ सह १२० ब अन्वये दोषी ठरवून सश्रम आजन्म कारावास व ३५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. माहिती तंत्रज्ञानातील ६६ (फ) कलम सायबर दहशतवादासाठी लावण्यात येते. देशांची अखंडता, एकता धोक्यात आणण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये दहशत माजवण्यासाठी संगणक यंत्राचा वापर करणाऱ्या व्यक्तीविरोधात या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो. सायबर दहशतवादाप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा सिद्ध झाल्यास जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते.