लोकसभा निवडणुकीत राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कोकणात महायुतीला चांगले यश मिळाले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही महायुतीला कोकणातून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. मात्र महायुतीसमोर बंडखोरांना थोपविण्याचे तर महाविकास आघाडीसमोर मतविभाजन टाळण्याचे आव्हान असणार आहे.  शिवसेनेच्या दोन गटांत वर्चस्ववादाची लढत या निमित्ताने रंगेल. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील राजकीय परिस्थितीचा थोडक्यात आढावा….

कोकणातील राजकीय बलाबल कसे?

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत एकूण १५ विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यात रायगडमधील ७, रत्नागिरीमधील ५, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ मतदारसंघ येतात. शिवसेना शिंदे गटाचे ६ शिवसेना ठाकरे ३, भाजप ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट २ आमदार मावळत्या विधाीनसभेत होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत कोकणात भाजप-सेना युतीचा वरचष्मा राहिला होता. रायगड आणि रत्नागिरीमधील प्रत्येकी एक अशा दोनच जागा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला जिंकता आल्या होत्या. मात्र शिवसेना तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने दोन्ही पक्षांची ताकद विभागली गेली आहे. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत.

Rajnath Singh, Shivajinagar candidate Siddharth Shirole,
महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांना घेऊन काँग्रेस बुडणार, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची टीका
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
nitin gadakari in Ichalkaranji
इंदिरा गांधी यांच्याकडूनच घटनेची सर्वाधिक मोडतोड ; नितीन गडकरी
yogi adityanath criticize congress and mahavikas aghadi
योगी आदित्यनाथ म्हणाले “काँग्रेस नेतृत्वातील ‘मविआ’ची नियत साफ नाही”
sagar meghe and Sameer meghe
सागर मेघेंवर बंधूसह अन्य दोघांची जबाबदारी; हिंगण्यात हजेरी पण वर्धा, देवळीत प्रतीक्षाच
entry to Narendra Modis meeting venue will be denied if objectionable items are brought
…तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत प्रवेशच मिळणार नाही!
maharashtra assembly poll 2024 rajendra raut and dilip sopal supporters clash barshi assembly elections
बार्शीत राजेंद्र राऊत – सोपल गटात गोंधळ; दोन्ही गटांचे आरोप-प्रत्यारोप, तणाव
Latur City Assembly Constituency Assembly Election Amit Deshmukh will contest election print politics news
लक्षवेधी लढत: लातूर : देशमुख, चाकूरकर घराण्याची प्रतिष्ठा पणाला

हेही वाचा >>> विश्लेषण : ‘कॉप २९’ची एवढी चर्चा का?

लोकसभा निवडणुकीत परिस्थिती कशी? 

लोकसभा निवडणुकीत मावळ, रायगड, रत्नागिरी अशा तिन्ही मतदारसंघांतून महायुतीचे उमेदवार विजयी झाले होते. मावळमधून शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे, रायगडमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि रत्नागिरी मतदारसंघातून भाजपचे नारायण राणे विजयी झाले होते. मात्र विधानसभा मतदारसंघनिहाय मताधिक्याचा विचार केला तर रायगड जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीला तर दोन विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मताधिक्य होते. रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात महाविकास आघाडीला मताधिक्य होते. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात महायुतीला मताधिक्य होते. म्हणजेच कोकणातील १५ मतदारसंघापैकी ७ मतदारसंघात महाविकास आघाडी तर ८ मतदारसंघात महायुतीचे पारडे जड होते.

बंडखोरी कुठे?

राज्यातील इतर भागांप्रमाणे कोकणातही महायुतीला बंडखोरीला सामोरे जावे लागले आहे. भाजपमधील असंतुष्ट नेते यास कारणीभूत ठरले आहेत. रत्नागिरीतून बाळ माने तर  सिंधुदुर्गातून राजन तेली भाजप सोडून शिवसेना ठाकरे गटात दाखल झाले. अलिबाग मतदारसंघातून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांनी पक्षनिर्णयाविरोधात जाऊन बंडखोरी करत अपक्ष उमेदावारी अर्ज भरला आहे. सावंतवाडी मतदारसंघात भाजपचे विशाल परब यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुधाकर घारे यांनी बंडखोरी केली आहे. या बंडखोरीचा फटका महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना बसू शकतो. महाविकास आघाडीतून श्रीवर्धन मतदारसंघात काँग्रेसचे राजेंद्र ठाकूर यांनी बंडखोरी केली आहे. तर राजापूर मतदारसंघातून काँग्रेसचे अविनाश लाड यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र तो अवैध ठरल्याने बंडखोरी टळली आहे.

मविआत मतविभाजन कुठे?

समन्वय नसल्याने रायगड जिल्ह्यातील चार मतदारसंघात महाविकास आघाडीतील पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. उरण, पनवेल, पेण मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार एकमेकांविरोधात निवडणूक लढवत आहेत. तर श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार एकमेकांविरोधात निवडणूक रिंगणात असणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मतविभाजनाचा फायदा महायुतीच्या उमेदवारांना होण्याची शक्यता आहे. अलिबाग मतदारसंघातूनही शिवसेना ठाकरे गटाने, शेकापच्या विरोधात उमेदवार दिला होता. मात्र शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी शरद पवार यांना हस्तक्षेप करण्यास भाग पाडून अलिबागच्या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारास आपला अर्ज मागे घेण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे अलिबागमध्ये महाविकास आघाडीचे मतविभाजन टळले आहे.

कोकणातून काँग्रेस हद्दपार?

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कोकणात काँग्रेस वाट्याला एकही जागा आली नाही. रायगडमधून उरण, अलिबाग आणि श्रीवर्धन तर रत्नागिरीतून राजापूर मतदारसंघासाठी काँग्रेस आग्रही होती. मात्र महाविकास आघाडीच्या जागावाटपात कोकणातून काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे काँग्रेस पाठिंब्यापूरतीच राहिली आहे. त्यामुळे पक्षात नाराजी आहे. नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेसला उतरती कळा लागली आहे. तर बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या निधनानंतर रायगड जिल्ह्यात काँग्रेसला एकसंघ ठेवू शकेल असे नेतृत्वच उरले नाही. त्यामुळे समुद्रात भरकटलेल्या जहाजाप्रमाणे काँग्रेसमधील कार्यकर्त्यांची अवस्था आहे.

शिवसेनेच्या दोन गटांत कोण वरचढ?

कोकण हा शिवसेनेचा कायमच बालेकिल्ला म्हणून ओळखला गेला. मात्र अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडली. शिवसेनेचे नऊपैकी सहा आमदार शिंदे गटात सामील झाले. शिवसेनेची ताकद दोन गटांत विभागली गेली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने यावेळी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. १५ पैकी ८ मतदार संघात शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट एकमेकांना भिडणार आहेत. या वर्चस्वाच्या लढाईत कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.  

harshad.kashalkar@expressindia.com