– देवेश गोंडाणे
भारत हा कृषीप्रधान देश असून पशुपालन, दुग्धव्यवसाय हा शेतकऱ्यांचा प्रमुख जोडधंदा आहे. त्यामुळे दूध उत्पादनातून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी अधिक दूध देणाऱ्या कालवडी निर्माण करण्याचा यशस्वी प्रयोग नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्या आयव्हीएफ प्रयोशाळेने केला आहे. या तंत्रज्ञानाद्वारे कमी वेळात उच्च दुग्धक्षमतेचे गोधन तयार करण्यात यश मिळाल्याने याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
वर्षाला किती भ्रूण?
महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाने (माफसू) भ्रूण प्रत्यारोपण केलेल्या सात गायींमधून दोन गायींनी तीन वासरांना नैसर्गिकरित्या जन्म दिला. या यशस्वी प्रयोगामुळे आता उच्च दर्जाच्या एका गीर गायीपासून वर्षांला ५० भ्रूण तयार करता येणार आहे.
प्रयोगशाळेचे उद्दिष्ट काय?
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय गोकूल प्रकल्पांतर्गत माफसू येथे भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आहे. उच्चप्रतीच्या देशी गोवंशाचे संवर्धन भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्याचे प्रमुख उद्दिष्ट या प्रयोगशाळेस देण्यात आले आहे. हा प्रयोग यशस्वी झाला असून राज्य सरकार आता शेतकऱ्यांनाही हे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार आहे.
भारतात याची गरज का?
देशात दुभत्या जनावरांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, जगाच्या तुलनेत दूध उत्पादनाचा वाटा कमी आहे. उच्च जातीच्या गायी-म्हशी नसणे हे एक यामागचे कारण आहे. या प्रयोगामुळे आता उच्च दर्जाच्या देशी गायींची निर्मिती सहज करता येईल. भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे उच्च दुग्ध उत्पादन क्षमता असलेल्या गीर प्रजातीच्या दाता गायीची अधिकाधिक वासरे कमीत कमी कालावधीत यशस्वीरित्या निर्माण करून त्याद्वारे उच्चप्रतीच्या देशी गोवंशाचे संवर्धन करता येणार आहे.
प्रयोग काय?
या प्रयोगाअंतर्गत भरपूर दुग्ध उत्पादन क्षमता असलेल्या गीर प्रजातीच्या दाता गायीस विशिष्ट कालावधीत संप्रेरकाचे इंजेक्शन देण्यात येते. नंतर ठराविक कालावधीत उच्च आनुवंशिकता असलेल्या गीर प्रजातीच्या वळूच्या वीर्याचा वापर करून कृत्रिम रेतन करण्यात येते. कृत्रिम रेतनापासून सातव्या दिवशी विशिष्ट नलिकेद्वारे दाता गायीच्या गर्भाशयात निर्माण झालेले भ्रूण संकलित करण्यात येते. सूक्ष्मदर्शिकेद्वारे या संकलित केलेल्या भ्रूणांचे परीक्षण करून त्यातील उत्तम प्रतीचे भ्रूण विशिष्ट नलिकेद्वारे कमी दुग्ध उत्पादन क्षमता असलेल्या गायीच्या गर्भाशयात स्थानांतरित करण्यात येते. त्यानुसार येथील प्रयोगशाळेत एकूण सात गायींवर हा प्रयोग करण्यात आला. त्यातील दोन गायींनी गर्भधारण कालावधी पूर्ण करून नैसर्गिकरित्या तीन कालवडींना नुकताच जन्म दिला.
राज्यात दूध उत्पादनाला कसा लाभ होणार?
राज्यात अडीच-तीन वर्षांत दूध संकलनात ९० लाख लिटरची म्हणजे साधारणपणे ३० टक्के घट झाली आहे. २०१९ मध्ये खासगी आणि सहकार क्षेत्रात एकूण रोज सरासरी दोन कोटी ६० लाख लिटर दुधाचे संकलन होते. ते उच्चांकी होते. मात्र, आता ते रोज एक कोटी ७० लाख लिटरवर आले आहे. यासाठी अनेक कारणे असली तरी छोट्या शेतकऱ्यांकडे कमी दूध देणाऱ्या गायी हे त्यातले एक प्रमुख कारण आहे. परिणामी त्यांच्या या गायींवर हा प्रयोग करून उच्च दुग्ध उत्पादन क्षमता असलेल्या प्रजातीच्या गायींची संख्या वाढवता येणार आहे. या प्रयोगाच्या आधारे महाराष्ट्रात दूध उत्पादनामध्ये मोठी वाढ करता येणे शक्य आहे.
शेतकऱ्यांचा फायदा काय?
एक देशी गाय ८ ते १० वासरांना जन्म देऊ शकते. मात्र, आता या तंत्रज्ञानामुळे भ्रण प्रत्यारोपण सहज शक्य झाल्याने दूध उत्पादनाची देशाची क्षमता वाढण्यात मदत होऊ शकते. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात अल्पभूधारक शेतकरी आहेत. शेतीमधून मिळणारे उत्पन्न फारच कमी असल्याने त्यांना शेतीला पूरक जोडधंदा करणे आवश्यक आहे. आज अनेक शेतकरी पशुपालन, दुग्धउत्पादन हा जोडधंदा करतात. मात्र, त्यांच्याकडे असणाऱ्या गायी, म्हशी या अधिक दूध देणाऱ्या नाहीत. त्यामुळे त्यांना अधिक दूध उत्पादन क्षमतेच्या गायी दिल्यास जोडधंदा फायद्याचा ठरू शकणार आहे.