छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ थेट नवी मुंबई विमानतळाला मेट्रोने जोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ३३७ किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पात ‘मेट्रो ८’ मार्गिका समाविष्ट करण्यात आली आहे. ‘एमएमआरडीए’ आणि ‘सिडको’ या मार्गिकेची संयुक्तपणे उभारणी करणार होते. मात्र आता सिडको आणि खासगी कंपनीच्या माध्यमातून खासगी-सार्वजनिक सहभागातून या मार्गिकेची उभारणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. हा शासन निर्णय आणि ‘मेट्रो ८’ प्रकल्प काय आहे, त्याचा फायदा नक्की कसा होणार याचा घेतलेला हा आढावा…
मुंबईत किती किमीचे मेट्रोचे जाळे?
मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रोचा पर्याय पुढे आणला. आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक व्यवस्था पुरविणे आणि वेगवान प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एमएमआरडीएने मुंबई महानगर प्रदेशात ३३७ किमीचे मेट्रोचे जाळे विणण्याचा प्रकल्प हाती घेतला. यातील मेट्रो १ (घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा) आणि मेट्रो २ अ (दहिसर ते डी एन नगर) आणि मेट्रो ७ (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) मार्गिका सेवेत आहे. त्याच वेळी सध्या मेट्रो २ ब (अंधेरी पश्चिम ते मंडाळे) , ३ (कुलाबा-वांद्रे-सिप्झ) , ४ (वडाळा-कासारवडवली), ४अ (कासारवडवली-गायमुख), ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण), ६ (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी) , ७ अ (अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ), ९ (दहिसर ते भाईंदर) आणि १२ (कल्याण-तळोजा) चे काम सुरू असून लवकरच मेट्रो १० ( गायमुख ते मिरारोड) या मार्गिकेचे काम लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी मेट्रो ८ (मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ), १३ (शिवाजी चौक ते विरार) आणि १४ (अंबरनाथ ते बदलापूर) मार्गिका प्रस्तावित आहेत. त्यामुळे सर्वच्या सर्व १४ मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यास मुंबईत ३३७ किमीचे मेट्रोचे जाळे विणले जाणार आहे. यामुळे मुंबई महानगर प्रदेशाच्या कोणत्याही टोकावरून कुठेही मेट्रोने जाता येणार आहे. तर आता प्रस्तावित मेट्रो ८ मार्गिका लवकरच मार्गी लागणार आहे.
मेट्रो ८ मार्गिका आहे कशी?
एमएमआरडीएच्या ३३७ किमी लांबीच्या मेट्रो जाळ्यातील एक महत्त्वाची मेट्रो मार्गिका म्हणजे ‘मेट्रो ८’. मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ दरम्यान ‘मेट्रो ८’ मार्गिका असणार आहे. या मार्गिकेची एकूण लांबी अंदाजे ३५ किमी असून मार्गिकेच्या उभारणीसाठी अंदाजे १५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ही मार्गिका मुंबई आणि नवी मुंबई अशा दोन महानगरातून जाणार असून या दोन महानगरांमधील अंतर कमी होणार आहे. ही मार्गिका कार्यान्वित झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ प्रवास दीड-दोन तासांऐवजी केवळ ३० मिनिटांत होणार आहे. या मार्गिकेचे काम हाती घेतल्यापासून ती कार्यान्वित करण्यासाठी किमान सहा वर्षांचा कालावधी अपेक्षित असणार आहे.
मुळ प्रस्तावानुसार उभारणी कोणाकडे?
ही मार्गिका मुंबई आणि नवी मुंबई शहरातून जाणार असल्याने या मार्गिकेची उभारणी एमएमआरडीए आणि सिडकोकडून संयुक्तपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सिडकोच्या भागातील काम सिडको, तर मुंबईच्या भागातील काम एमएमआरडीए करणार होती. त्यानुसार एमएमआरडीएने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते मानखुर्द दरम्यानच्या १०.१ किमी लांबीच्या ‘मेट्रो ८’ मार्गिकेतील टप्प्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा दिल्ली मेट्रो रेल काॅर्पोरेशनकडून तयार करून घेतला आहे. तर सिडकोने मानखुर्द – नवी मुंबई विमानतळ दरम्यानच्या टप्प्यातील आराखड्याची जबाबदारी अर्बन मास ट्रान्झिट कंपनीवर सोपवली आहे. त्यानुसार सिडकोकडून कार्यवाही सुरू होती. असे असताना काही महिन्यांपूर्वी या मार्गिकेची उभारणी नेमकी कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला.
मार्गिकेच्या उभारणीचा पेच काय?
सिडको आणि एमएमआरडीए संयुक्तपणे या मार्गिकेची बांधणी करणार होते. यासाठी कार्यवाही सुरू होती. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीत या मार्गिकेची उभारणी नेमकी कोणी करावी असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. या बैठकीत शिंदे यांनी ही संपूर्ण मार्गिका एमएमआरडीएकडे सोपविण्यास प्राधान्य दिले. एमएमआरडीए – सिडकोने महा मेट्रोच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्याची सूचना तत्कालीन मुख्य सचिवांनी केली. त्याचवेळी या मार्गिकेतील बहुतांश मार्ग नवी मुंबईत असल्याने सिडकोनेच या मार्गाची उभारणी करावी, असेही मत यावेळी मांडण्यात आले होते. या सर्व चर्चेनंतर ‘मेट्रो ८’ मार्गिका नेमकी कोण मार्गी लावणार यावर कोणताही अंतिम निर्णय शिंदे यांना देता आला नाही. त्यामुळे ‘मेट्रो ८’ मार्गिकेची उभारणी कोण करणार हा प्रश्न तसाच होता. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्र्यांनी अखेर हा प्रश्न मार्गी लावला आहे.
सार्वजनिक-खासगी सहभागातून उभारणी…
‘मेट्रो ८’ मार्गिकेच्या उभारणीचा प्रश्न अखेर मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावला आहे. नगरविकास विभागाने सोमवार, २७ जानेवारी रोजी एक शासन निर्णय प्रसिद्ध केला. या शासन निर्णयानुसार ‘मेट्रो ८’ मार्गिकेची उभारणी आता सार्वजनिक – खासगी सहभागातून करण्यात येणार आहे. म्हणजेच ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’प्रमाणे खासगी कंपनीच्या माध्यमातून या मार्गिकेची बांधणी आणि पुढे संचलन केले जाणार आहे. ‘मेट्रो ८’ मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प आराखडा सिडकोच्या माध्यमातून तयार केला जाणार आहे. सिडको भागधारकांशी सहकार्य करून आवश्यक त्या मंजुरी मिळवेल, असेही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. एकूणच खासगी कंपनी आणि सिडकोच्या माध्यमातून ही मार्गिका मार्गी लावली जाणार असून आता एमएमआरडीएची कोणतीही भूमिका यात असणार नाही. दरम्यान ‘मेट्रो १’ मार्गिका रिलायन्स इन्फ्रा अर्थात मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडच्या (एमएमओपीएल) माध्यमातून उभारण्यात आली असून त्यांच्याच माध्यमातून सध्या या मार्गिकेचे संचालन केले जात आहे. या मार्गिकेला प्रवाशांचा प्रतिसाद हळूहळू वाढत असला तरी एमएमओपीएल दिवाळखोरीत गेल्याने आणि आर्थिक तोट्यात असलेली ‘मेट्रो १’ विकायला काढण्याची वेळ एमएमओपीएलवर आली आहे. एमएमआरडीएने ही मार्गिका अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र ‘मेट्रो १’ची यंत्रणा जुनी आहे. नियमांचे उल्लंघन झाले असून लेखा परीक्षणातही त्रुटी असल्याचा मुद्दा उपस्थित करीत राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी आक्षेप घेतला. एमएमआरडीएला ६५० कोटींचे नुकसान होणार असल्याने ही मार्गिका अधिग्रहित करण्याचा निर्णय रद्द करण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला होता. आता ‘मेट्रो ८’ मार्गिका खासगी कंपनीच्या माध्यमातून मार्गी लावण्यात येणार आहे.