– अनिश पाटील

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खंडणीचे आरोप असलेले पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. गृहविभागाने मंगळवारी याबाबत आदेश दिले. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबीर सिंह यांच्यावर खंडणी घेतल्याचे आरोप झाल्यानंतर वर्षभरातच त्रिपाठी यांच्याविरोधात प्रतिमहिना १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार अंगडिया व्यावसायिकांनी केली आहे. त्यामुळे मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. त्रिपाठी यांच्याविरोधात आरोप झालेले प्रकरण नेमके काय आहे, याचा घेतलेला हा आढावा…

प्रकरण कसे बाहेर आले?

अतिरिक्त पोलीस आयुक्त (दक्षिण प्रादेशिक परिमंडळ) दिलीप सावंत यांनी स्वतः याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली असून त्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंगडिया व्यावसायिक संघटनेचे योगेश गांधी, जतीन शहा, मधूसुदन रावल व मगनभाई प्रजापती यांनी ७ डिसेंबर, २०२१ रोजी अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांची भेट घेतली व त्रिपाठी यांच्याबाबत तक्रार केली होती. तत्कालीन उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्याविरोधात अंगडिया व्यावसायिकांनी तक्रार केल्यामुळे अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांच्याकडे याप्रकरणाची चौकशी देण्यात आली होती.

चौकशीतून काय निष्पन्न झाले?

या चौकशीत अंगडिया व्यवसायिकांचे, आरोपी पोलिसांचे, साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. तसेच पोफळवाडी, मुंबादेवी चौकी व एल.टी. मार्ग पोलीस ठाणे यांच्या सीसीटीव्हींचीही तपासणी करण्यात आली. प्राथमिक चौकशीत २, ३, ४ व ६ डिसेंबरला आरोपी पोलीस अधिकारी व इतर अनोळखी संशयितांनी अंगडिया व्यवसायिकांना डांबून ठेवले व प्राप्तिकर विभागाला माहिती देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून खंडणी उकळली. सावंत यांना प्राथमिक तपासात आरोपी पोलिसांविरोधात नऊ मुद्दे सापडले. आरोपी पोलिसांनी त्यांच्या जाण्या-येण्याच्या चुकीच्या नोंदी पोलीस डायरीत केल्या. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या तपासणीतही या बाबी पाहण्यात आल्या. आरोपी कदम यांनी त्यांच्या जबाबात पोलीस निरीक्षक वंगाटे यांच्या सांगण्यावरून पोलीस डायरीमध्ये चुकीच्या नोंदी केल्याचे म्हटले होते. गुन्हा घडला, त्या चार दिवसांमध्ये भुलेश्वर परिसरात संशयित चोरीची मालमत्ता विक्रीसाठी आल्याचा संशय होता. तपासणीत काहीच सापडले नाही, म्हणून त्यांना सोडून देण्यात आले अशा खोट्या नोंदी डायरीत करण्यात आल्या होत्या. याप्रकरणी तपासणी अहवाल पोलीस आयुक्तांना दाखवल्यानंतर त्यांच्या परवानगीने सावंत यांनी स्वतः तक्रार केली. त्यानुसार भादंवि ३९२,३८४,३४१ व ३४ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढे याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता पथकाला (सीआययू) वर्ग करण्यात आला.

त्रिपाठी यांच्याविरोधात आरोप काय?

उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनी कोणतीही कारवाई न करण्यासाठी १० लाख रुपये प्रति महिना मागितल्याची तक्रार अंगडिया व्यावसायिकांच्या संघटनेने केली होती. त्रिपाठी यांच्या सूचनेवरून लोकमान्य टिळक (एल.टी.) मार्ग पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक नितीन कदम व उपनिरीक्षक समाधान जमदाडे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) ओम वंगाटे यांनी अंगडिया व्यवसायिकांना डांबून ठेऊन त्यांच्याकडून खंडणी उकळल्याचा आरोप आहे. तिन्ही अधिकाऱ्यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. वंगाटे याने याप्रकरणी १९ लाख रुपये अंगडियांकडून काढले असून त्यातील दीड लाख रुपये त्रिपाठी यांना हवालामार्फत पाठवल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. ही रक्कम लखनऊ येथून त्रिपाठी यांचा नोकर पप्पूकुमार प्यारेलाल गौड (२७) याने स्वीकारली. त्याला याप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केली. गौड याने त्रिपाठीच्या सूचनेवरून पोलीस निरीक्षक ओम वंगाटे यांच्याकडून हवालाद्वारे पैसे स्वीकारले होते.

पोलिसांचा तपास

गुन्हे गुप्तवार्ता कक्ष (सीआययू) यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर एलटी मार्ग पोलीस ठाण्यातून सहायक पोलीस निरीक्षक नितीन कदम व उपनिरीक्षक समाधान जमदाडे यांना १९ फेब्रुवारीला अटक झाली होती. त्यानंतर याप्रकरणी शोध सुरू असताना पोलीस निरीक्षक ओम वंगाटे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. पण तेथे त्यांना जामीन न मिळाल्यामुळे अखेर १० मार्चला ओम वंगाटे यांना गुन्हे शाखेने अटक केली. याप्रकरणी मुंबईतील एका हवाला चालवणाऱ्या व्यक्तीचा जबाब नोंदवण्यात आला आहे. त्याच्या डायरी व मोबाइलमधील नोंदी पुरावा म्हणून जप्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय याप्रकरणी त्याचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. निलंबीत उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनीही याप्रकरणी न्यायालयात अटकपूर्वी जामिनासाठी अर्ज केला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra govt suspends ips officer saurabh tripathi in angadia extortion case print exp 0322 scsg