– दत्ता जाधव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदाच्या गळीत हंगामात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. निकटचा प्रतिस्पर्धी असलेल्या उत्तर प्रदेशला मागे टाकून राज्याने आघाडी घेतली आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधील हंगाम जवळपास आटोपला आहे. राज्यात मात्र, अजूनही गाळप सुरू आहे. त्यामुळे यंदा राज्यात विक्रमी साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे.

काय आहे देशातील हंगामाची स्थिती?

देशात यंदाच्या गळीत हंगामात एकूण ५१६ कारखाने सुरू होते. १५ मार्चअखेर २८३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षांपेक्षा २३ लाख टनांनी यंदा अधिक साखर निर्मिती झाली आहे. मार्च २०२१मध्ये याच कालावधीत २५९ लाख टन साखर निर्मिती झाली होती. देशातील ८१ कारखान्यांचा गळीत हंगाम आटोपला आहे. ४३५ साखर कारखाने अजूनही सुरू आहेत. यंदा कर्नाटकात हंगाम लवकर संपण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील ७२ पैकी २४ साखर कारखान्यांनी हंगाम संपवला आहे. उत्तर प्रदेशमध्ये १६ कारखान्यांनी हंगाम बंद केला आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर विभागात बहुतांशी साखर कारखाने बंद झाले आहेत. याशिवाय गुजरातमध्ये १७ कारखान्यांनी ९.१५ लाख टन, तमिळनाडूत २६ कारखान्यांनी ५.७५ लाख टन साखर उत्पादन केले आहे. उर्वरित आंध्र प्रदेश, तेलंगाणा, बिहार, पंजाब, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील कारखान्यांनी २६.४३ लाख टन साखर उत्पादन केले आहे.  

महाराष्ट्रातील हंगामाची स्थिती काय?

राज्यातील साखर कारखान्यांनी यंदा पहिल्या महिन्यापासूनच आघाडी घेतली होती. एकूण १९७ कारखान्यांनी हंगामा सुरू केला होता. त्यात ९८ सहकारी ९९ खासगी कारखान्यांचा समावेश होता. राज्यात मार्चच्या पहिल्या आठवड्यातच १०० लाख टनांवर साखर उत्पादित झाली होती. देशात एकूण २८३ टन साखर तयार झाली होती, म्हणजे एकट्या राज्यात जवळपास निम्मी साखर तयार झाली होती. महाराष्ट्रातच १५ मार्च अखेर १०८ लाख टन साखर तयार झाली आहे. तर २४ मार्चअखेर ११४ लाख टनांवर उत्पादन गेले आहे. राज्यातील कारखान्यांनी सुमारे ११ कोटी टन उसाचे गाळप केले असून, १०. ३८ टक्के साखर उतारा राखला आहे. २४ मार्चअखेर राज्यातील २२ कारखाने बंद झाले आहेत. हंगाम आटोपता घेण्यात कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे.  

इथेनॉल निर्मिती किती झाली?

पेट्रोलमध्ये ९.४५ टक्के इथेनॉल मिसळण्याच्या धोरणानुसार ४९६.३३ कोटी लिटर इथेनॉल गरजेचे आहे. त्या तुलनेत १३ मार्चपर्यंत ११३.१७ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा करण्यात आला आहे. आतापर्यंतच्या एकूण पुरवठ्यापैकी सुमारे ८६ टक्के उसाच्या रसापासून बनवलेल्या इथेनॉलचा समावेश आहे. डिसेंबर २०२१पासून मार्चच्या मध्यापर्यंत देशाने सरासरी ९.४५ टक्क्यांची मिश्रित टक्केवारी गाठली आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२मध्ये १३ मार्चअखेर ११३ कोटी लिटर इथेनॉलचे मिश्रण करण्यात आले आहे. तेलंगाणामध्ये देशात सर्वाधिक १०.५७ टक्के इथेनॉलचे  पेट्रोलमध्ये मिश्रण केले. त्यानंतर कर्नाटकात १०.३७ टक्के, पश्चिम बंगालमध्ये ६.३२ टक्के इथेनॉलचे मिश्रण झाले आहे. एकूण ११३ कोटी लिटरपैकी उत्तर प्रदेशात १५.३ कोटी लिटर आणि महाराष्ट्रात  १३.५ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले आहे.

उत्तर प्रदेश पिछाडीवर का?

यंदा उत्तर प्रदेशात सुरुवातीपासूनच गाळप हंगाम संथ गतीने सुरू होता. १२० साखर कारखान्यांनी ७८ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ८४ लाख टन साखरेचे उत्पादन उत्तर प्रदेशात झाले होते. देशातील इतर राज्यात साखरेचे उत्पादन वाढले असताना उत्तर प्रदेशात मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी साखर कमी तयार होत आहे. सध्या उत्तर प्रदेशातील १६ साखर कारखान्यांनी हंगाम बंद केला आहे. त्यामुळे यंदा साखर उत्पादनात उत्तर प्रदेशची पिछाडी कायम राहण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्येही हंगाम अखेरच्या टप्प्यात आहे. कर्नाटकातील ७२ कारखान्यांनी ५४ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. सध्या २४ साखर कारखाने बंद झाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत कर्नाटकात यंदा १३ लाख टनांनी साखरेचे उत्पादन वाढले आहे.

साखर विक्रीची स्थिती काय?

सुमारे ६५ लाख टन साखर निर्यातीचे करार झाले आहेत. फेब्रुवारीअखेर ४७ लाख टन साखरेची प्रत्यक्षात निर्यात झाली आहे. याच काळात मागील वर्षी १७.७५ लाख टन साखरेची निर्यात झाली होती. मार्चअखेर ५६ लाख टन साखरेची निर्यात होण्याची शक्यता आहे. यंदा देशातून ७५ लाख टन साखर निर्यात शक्य आहे, ही निर्यात आजवरची उच्चांकी निर्यात असेल. देशात यंदाच्या हंगामात ३३३ लाख टन साखर उत्पादन होईल. देशाला एक वर्षाला २७२ लाख टन साखरेची गरज असते. ७५ लाख टन निर्यात होईल. ३० सप्टेंबरअखेर देशातील एकूण साखरेचा साठा सुमारे ६८ लाख टन इतका असू शकेल, असा अंदाजही ‘इस्मा’ने व्यक्त केला आहे.

(संदर्भ स्रोत- इंडियन शुगर मिल असोसिएशन (इस्मा). आकडेवारी १५ मार्चअखेरपर्यंतची)

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra highest sugar production state in india print exp 0322 scsg
Show comments