– विश्वास पवार
साताऱ्यात झालेल्या ६४व्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने अटीतटीच्या लढतीत गुणाधिक्यावर मुंबईच्या विशाल बनकरला पराभूत करत प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकावला. तब्बल २१ वर्षांनी कोल्हापूरला मानाची चांदीची गदा मिळवण्यात यश आले. करोनामुळे दोन वर्षांनी झालेल्या या स्पर्धेत तब्बल नऊशे मल्लांचा सहभाग होता. यंदाच्या स्पर्धेला ऊन-पावसाचे आव्हानही पेलावे लागले. मात्र, त्यानंतरही ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. या स्पर्धेचा घेतलेला आढावा –
महाराष्ट्र केसरीची लढत कशी झाली?
महाराष्ट्र केसरी किताबासाठी झालेल्या लढतीच्या पहिल्या फेरीत बनकरने ४-० अशी आघाडी घेतली होती. मात्र, पिछाडीवर पडलेल्या पृथ्वीराजने अखेरच्या ४५ सेकंदांत सामन्याला कलाटणी दिली. त्याने अखेर ही लढत ५-४ अशा फरकाने जिंकली आणि ४५वा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला. या लढतीत सुरुवातीला पृथ्वीराज आणि विशालची खडाखडी झाली. दोघांनीही एकमेकांची मनगटे धरल्याने पंचांनी त्यांना ही कुस्तीतील निष्क्रियता आहे असे बजावत सामना योग्य पद्धतीने खेळण्याची सूचना केली. दोन वेळा हे पैलवान आखाडा सोडून बाहेर गेले. पहिल्या फेरीत विशालने आपल्या नैसर्गिक उंचीचा फायदा उठवत पृथ्वीराजला आक्रमक खेळी करून गुणांची आघाडी घेतली. एकेरी प्रकारची पकड करत पृथ्वीराजने शेवटची अडीच मिनिटे असताना जबरदस्त कुस्ती करत प्रतिस्पर्धी विशालवर गुण मिळवण्याचा प्रयत्न करीत आपले वर्चस्व दाखवले. अखेरीस पृथ्वीराजने बाजी मारली.
पृथ्वीराज पाटील कोण आहे?
पृथ्वीराज पाटील हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामधील देवठाणे गावचा आहे. त्याने संजीवनीदेवी गायकवाड महाविद्यालयातून बारावीपर्यंत शिक्षण घेतले. मग मोतीबाग तालमीतून कुस्ती प्रशिक्षणाला प्रारंभ केला. भारत केसरी दादू चौगुले, पैलवान संग्राम पाटील व धनाजी पाटील यांच्याकडून त्याने कुस्तीचे धडे घेतले. मग पृथ्वीराज ९५ किलो वजनी गटातील कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकाचा मानकरी ठरला. सध्या तो सेनादलात कार्यरत आहे.
पृथ्वीराज आणि विशालने अंतिम फेरी कशी गाठली?
राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील गादी आणि माती या दोन्ही गटांतील लढती चुरशीच्या झाल्या. तगडे पैलवान उपांत्य फेरीत आल्याने मानाची चांदीची गदा कोणत्या जिल्ह्यात जाणार याची उत्कंठा वाढली होती. कोल्हापूरचा पृथ्वीराज, सोलापूरचा सिकंदर शेख, पंढरपूरचा माऊली उर्फ ज्ञानेश्वर जमदाडे, नगर जिल्ह्यातील असलेला मात्र नाशिककडून खेळणारा हर्षवर्धन सदगीर, पुणे जिल्ह्यातील इंदापूरचा हर्षद कोकाटे, बीडचा अक्षय शिंदे, सोलापूरचा महेंद्र गायकवाड, विशाल बनकर यांच्यात उत्कृष्ट लढती झाल्या. या पैलवानांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष होते. अखेर गादी विभागातून पृथ्वीराज आणि माती गटातून विशाल महाराष्ट्र केसरीच्या लढतीसाठी पात्र ठरले. पृथ्वीराजने पुणे शहरच्या हर्षद कोकाटेवर एकतर्फी विजयाची नोंद केली होती, तर शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या लढतीत विशालने सिकंदर शेखवर १३-१० अशी मात केली.
स्पर्धेचे वातावरण आणि नियोजन कसे होते?
करोना साथीच्या कालखंडानंतर दोन वर्षांनी यंदा साताऱ्याला ५ ते ९ एप्रिल या कालावधीत राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी तीन गादीचे आणि दोन मातीचे असे एकूण पाच आखाडे तयार करण्यात आले होते. जवळपास ४५ संघांतून ९०० मल्ल या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतून तब्बल पन्नास हजारांहून अधिक क्रीडा शौकिन आणि कुस्तीपटू या स्पर्धेसाठी आले होते. दररोज सकाळी आणि सायंकाळच्या सत्रांमध्ये चाळीस कुस्त्या झाल्या. सर्वांना उत्सुकता असलेली महाराष्ट्र केसरी किताबाची लढत शनिवारी (९ एप्रिल) रंगली. या स्पर्धेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
यंदाच्या स्पर्धेला ऊन-पावसाचे आव्हान कसे पेलावे लागले?
यंदा या मानाच्या स्पर्धेला कडक ऊन आणि अवकाळी पावसाचे आव्हानही पेलावे लागले. कडक उन्हामुळे गुरुवारी (७ एप्रिल) सकाळच्या सत्रातील अनेक लढती रद्द झाल्या. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत लढती खेळवण्यात आल्या. त्यानंतर शुक्रवारी साताऱ्यात जोरदार अवकाळी पाऊस झाल्यामुळे सायंकाळच्या सत्रातील सामने रद्द करण्यात आले. पावसामुळे विद्युत रोषणाईसह उभारलेला स्पर्धेचा मंडप कोसळला आणि आखाड्याची माती वाहून गेली. याचप्रमाणे स्पर्धेसाठीच्या गाद्यासुद्धा भिजल्या आणि मैदानावर पाणी साठले. मात्र, आयोजकांनी रात्रभर मेहनत घेत शनिवारी सकाळी आठ वाजता आखाडा पूजन करून पुन्हा कुस्त्या सुरू केल्या.
‘नाडा’कडून खेळाडूंच्या उत्तेजक चाचण्या घेण्यात आल्या का?
राष्ट्रीय उत्तजेक प्रतिबंधक संस्था म्हणजेच ‘नाडा’कडून २०१९च्या अंतिम फेरीपूर्वी स्पर्धकांच्या उत्तेजक चाचण्या घेण्यात आल्या होत्या. यंदाही सर्व खेळाडूंच्या चाचण्या घेणार अशी चर्चा सुरू होती. मात्र, अखेर कोणत्याही मल्लाची उत्तेजक चाचणी करण्यात आली नाही.