भारतीय हवामान खात्याने बुधवारी (६ जुलै २०२२ रोजी) मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर ठाणे आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला मुंबईकरांना देण्यात आलेला आहे. समुद्राच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने हा इशारा देण्यात आला. मात्र दरवेळी नैसर्गिक आपत्तीच्या वेळी कानावर पडणाऱ्या या अलर्टचा नेमका अर्थ काय असतो हे अनेकांना ठाऊक नसते. सध्या मुंबई आणि ठाणे परिसरासाठी जारी करण्यात आलेल्या अलर्टच्या पार्श्वभूमीवर यावरच टाकलेली नजर…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अतिवृष्टी, महापूर, भूकंप, त्सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्यावेळी प्रशासनाकडून नेहमी सतर्कतेचा इशारा दिला जातो. परिस्थितीच्या तीव्रतेनुसार ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड या चार प्रकारांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट म्हणजे काय? नैसर्गिक संकटाच्यावेळीच तो का जारी केला जातो? जाणून घेऊयात सतर्कतेचा इशारा देण्यासाठी जरी केल्या जाणाऱ्या या अलर्ट्सचा अर्थ…

ग्रीन अलर्ट –
कोणतंही संकट नाही, सर्व काही ठीक आहे असं सांगण्यासाठी ग्रीन अलर्ट असतो. सामान्यपणे यल्लो, ऑरेंज किंवा रेड अलर्ट मागे घेण्यासाठी ग्रीन अलर्टचा वापर केला जातो.

यलो अलर्ट –
पुढील काही दिवसांमध्ये हवामानाच्या बदलामुळे संकट ओढवू शकते, अशी सुचना जारी करण्यासाठी यलो अलर्ट दिला जातो.. दैनंदिन कामे रखडू शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात येतो.

ऑरेंज अलर्ट –
कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते हे सांगण्यासाठी ऑरेंज अलर्टचा वापर केला जातो.. येणाऱ्या संकटासाठी नागरिकांनी तयार रहावे म्हणून प्रशासनाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येतो. वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक ठप्प होण्यासारखे प्रकार घडू शकतात. ही एक प्रकारे पुढच्या संकटाची तयारी असते. गरज असेल आणि महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा असेही या अलर्टमध्ये सांगितले जाते.

रेड अलर्ट –
नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर किंवा ओढवण्याची शक्यता असल्यास एकाद्या विशिष्ट प्रदेशातील (राज्य, शहर, तालुका, जिल्हा) नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी रेड अलर्टला जारी करण्यात येतो. या अलर्टचा अर्थ लोकांनी स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवावं आणि धोकादायक भागात जाऊ नये असा असतो. रेड अलर्टमध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठं नुकसान होण्याची शक्याताही असते. हा इशारा देण्यात आल्यानंतर स्थानिक प्रशासन, आपत्कालीन यंत्रणांनी अधिक सतर्क रहाणं अपेक्षित असतं. अधिक धोकादायक आणि तिव्र पद्धतीची नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असली, परिस्थिती गंभीर होण्याची भीती असली आणि सामान्य जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असल्यास रेड अलर्ट देण्यात येतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra mumbai rains imd issue yellow alert in mumbai orange alert in thane palghar what does it means scsg