गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स (जीएसटी) घोटाळ्याप्रकरणी गुजरातमधील एका ज्येष्ठ पत्रकाराला मंगळवारी सकाळी अटक करण्यात आली. अहमदाबाद गुन्हे शाखेने मंगळवार, ८ ऑक्टोबर रोजी ही कारवाई करत वरिष्ठ पत्रकार महेश लांगा यांना अटक केली. इनपूट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) फसवणुकीचा आरोप करत १३ कंपन्या आणि त्यांच्या मालकांच्या नावाने जीएसटी इंटेलिजेंस डायरेक्टरेट जनरल (डीजीजीआय) ने तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. अटकेवेळी लांगा यांच्या घरातून २० लाख रुपये रोख, सोन्याचे दागिने आणि जमिनीची कागदपत्रेही जप्त करण्यात आली. कोण आहेत महेश लांगा? नेमके हे प्रकरण काय? जाणून घेऊ.

कोण आहेत महेश लांगा?

महेश लांगा ‘द हिंदू’मध्ये वरिष्ठ सहाय्यक संपादक आहेत. त्यांनी २० वर्षे गुजरातमधील बेरोजगारी, राजकारण आणि सामाजिक समस्यांवर वृत्तांकन केले आहे. त्यांच्या बेधडक पत्रकारितेसाठीही त्यांना ओळखले जाते. त्यांच्या ‘लिंक्डइन प्रोफाइल’नुसार, त्यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’ बरोबरही वार्ताहर म्हणून काम केले आहे. सविस्तर चौकशीनंतर पत्रकार महेश लांगा यांना मंगळवारी सकाळी गुन्हे शाखेने अटक केली, असे पोलिस उपायुक्त (गुन्हे) अजित राजियन यांनी सांगितले.

traffic police get abuse and threat in hiranandani meadows area in thane
पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत धमकी
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
Ramzula hit and run case: Ritika Malu in police custody
रामझुला हिट अँड रन प्रकरण: अखेर रितिका मालूला पोलीस कोठडी…
AI technology will be use in Bopdev Ghat gang rape case
बोपदेव घाट सामुहिक बलात्कार प्रकरणातील तपासात एआयचा वापर
Bhopal 900 kg mephedrone drug
भोपाळजवळ ९०० किलो एमडी जप्त, १८१४ कोटी रुपये किंमत; गुजरात एटीएस, ‘एनसीबी’ची संयुक्त कारवाई
Five people including woman sub inspector who sacked in drug trafficker Lalit Patil case reinstated
अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात बडतर्फ केलेले पोलीस पुन्हा सेवेत
hotel vandalised by mob in miraj
मिरजेत जमावाकडून हॉटेलवर हल्ला, तोडफोड; मारहाणीत आठ जण जखमी, व्यावसायिक स्पर्धेतून प्रकार
Akshays parents went to Ambernath Municipality for burial permission their application was not accepted
अक्षय शिंदेचे प्रकरण सत्ताधारी पुरस्कृत, मृत अक्षयच्या वकिलांचा आरोप

हेही वाचा : तुमचा जोडीदार तुम्हाला फसवतोय? हे तपासण्यासाठी लोक घेत आहेत गुप्तहेराची मदत, नक्की हा प्रकार काय?

प्रकरण काय आहे?

सोमवारी, बोगस कंपन्यांच्या कथित घोटाळ्याबद्दल ‘डीजीजीआय’कडून तक्रार दाखल झाल्यानंतर शहर गुन्हे शाखेने डीए एंटरप्रायझेससह १३ लोक आणि संस्थांविरुद्ध एफआयआर नोंदवला, ज्यात पत्रकार लांगा यांचा चुलत भाऊ मनोजकुमार लांगा यांच्या मालकीच्या फर्मचाही समावेश आहे. ही कंपनी कथितपणे २०० संस्थांच्या नेटवर्कचा भाग आहे. त्या कंपन्यांनी फसव्या क्रियाकलापांमध्ये गुंतून कर भरणे टाळण्याचा प्रयत्न केला आहे. ‘डीजीजीआय’च्या अहमदाबाद कार्यालयातील वरिष्ठ गुप्तचर अधिकारी हिमांशू जोशी यांनी खटला दाखल करण्यासाठी काही पुरावेही प्रदान केले आहेत. एफआयआर नोंदवल्यानंतर, गुजरातच्या आर्थिक गुन्हे शाखेने अहमदाबाद, जुनागढ, सुरत, खेडा आणि भावनगरसह राज्यभरात १४ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. “बोगस इनपूट टॅक्स क्रेडिट मिळवून सरकारी तिजोरीची फसवणूक करण्यासाठी देशभरात २०० हून अधिक फसव्या पद्धतीने तयार केलेल्या कंपन्यांचा यात सहभाग असल्याचे दिसून येते. बनावट कागदपत्रे आणि ओळखींचा वापर करून कर भरणे टाळले जात होते,” असे गुन्हे शाखेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

‘एफआयआर’नुसार, ध्रुवी एंटरप्राईज कोणत्याही वस्तू किंवा सेवांचा पुरवठा न करता बनावट इनव्हॉइस वापरून फसव्या इनपूट टॅक्स क्रेडिट ट्रान्सफरमध्ये गुंतलेली होती. बनावट भाडे कराराद्वारे कंपनीने जीएसटी नोंदणी मिळवली होती. नोंदणीकृत संस्थेद्वारे भरलेल्या जीएसटीला इनपूट टॅक्स क्रेडिट म्हणतात; ज्याचा वापर कंपनी अंतर्गत पुरवण्यात येणार्‍या उत्पादनांवरील किंवा सेवांवरील जीएसटी भरून काढण्यासाठी केला जाऊ शकतो. एफआयआरमध्ये दावा करण्यात आला आहे की, कथित फसवणूक गेल्या वर्षी १ फेब्रुवारी ते १ मेदरम्यान केली गेली आहे.

लांगा यांचे या प्रकरणात नाव कसे आले?

डीसीपी (गुन्हे) अजित राजियन यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “आम्ही त्यांच्याकडून २० लाख रुपये बेहिशेबी रोकड, सोने आणि जमिनीची अनेक कागदपत्रे जप्त केली आहेत.” या प्रकरणी सध्या ज्या पत्रकाराची चौकशी सुरू आहे, तेच कंपनीचा वापर फसवणुकीसाठी करत असल्याचा दावा त्यांनी केला. राजियन यांच्या म्हणण्यानुसार, लांगा यांची पत्नी कविता यांच्या नावाची कागदपत्रेही सापडली आहेत. परंतु, तपासणीत पुष्टी करण्यात आली आहे की, त्यांचा संस्थेच्या क्रियाकलापांशी काहीही संबंध नाही. अद्याप लांगा यांच्या चुलत भावाला अटक करण्यात आलेली नाही. अहमदाबाद शहराचे पोलिस आयुक्त ज्ञानेंद्र सिंह मलिक यांनी दावा केला की, कविता जीएसटी फसवणुकीत गुंतलेल्या एका फर्ममध्ये संचालक आहेत. परंतु, क्राईम ब्रँचने त्यांची चौकशी केली तेव्हा कविता यांनी सांगितले की, त्यांना अशा कोणत्याही कंपनीबद्दल किंवा त्यांच्या नावाचा वापर केला जात असल्याबद्दल माहिती नाही. त्यानंतर पोलिसांनी महेश लांगाची चौकशी केली आणि समजले की तेच संपूर्ण फर्म हाताळत होते, असे ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तात सांगण्यात आले आहे.

एफआयआरमध्ये लांगा यांच्या नावाचा समावेश नाही. त्यावर पोलिस आयुक्त ज्ञानेंद्र सिंह मलिक म्हणाले, “एफआयआरमध्ये त्यांचे नाव नसल्यामुळे महेश लांगा आरोपी नाहीत असा अर्थ होत नाही. एका कंपनीतील त्यांची भूमिका तपासादरम्यान समोर आली, त्यामुळेच त्यांना गुन्हे शाखेने अटक केली. पोलिसांनी पुढे असा दावा केला आहे की, अशा बनावट बिलिंग, कागदपत्रे आणि गैरप्रकार करून कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवून देशाचे आर्थिक नुकसान करण्याचा गुन्हेगारी कट रचण्यात एक मोठा गट कार्यरत आहे. डीए एंटरप्रायझेस व्यतिरिक्त, एफआयआरमध्ये राज इन्फ्रा, हरेश कन्स्ट्रक्शन कंपनी आणि ओम कन्स्ट्रक्शन यांचाही उल्लेख आहे. या प्रकरणात तलालाचे भाजपा आमदार भगवान बरड यांचा मुलगा अजय आणि त्यांचे पुतणे विजयकुमार आणि रमेश कलाभाई बरड यांचाही समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते वेरावळ येथील आर्यन असोसिएट्स या कंपनीचे मालक म्हणून नोंदणीकृत आहेत. मात्र, भाजपा आमदाराने फसवणुकीचे सर्व आरोप फेटाळले आहेत.

हेही वाचा : फोर्टिफाइड तांदूळ म्हणजे काय? २०२८ पर्यंत हे तांदूळ मोफत वाटप करण्याचा निर्णय सरकारने का घेतला?

या प्रकरणात कोणाकोणाला अटक?

इलेक्ट्रिक पॅनेल बोर्ड विकणाऱ्या कंपनीत भागीदार भावनगरचा रहिवासी एजाज, तसेच कपडे, गाद्या आणि ऊसाचा रस विकण्याचा व्यवसाय करणारा अब्दुल कादर, आपल्या पत्नीसह व्यवसाय चालवणारा सुरतचा रहिवासी ज्योतिष मगन गोंदलिया आदींना मंगळवारी गुन्हे शाखेने अटक केली. लांगा यांच्या अटकेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, ‘द हिंदू’ संपादक सुरेश नंबथ यांनी ‘ब्लूस्की’ या सोशल मीडिया ॲपवर सांगितले की, “आमच्याकडे या खटल्याविषयीचे कोणतेही तपशील नसले, तरी ‘द हिंदू’मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्ताचा त्यांच्याशी संबंध नाही हे आम्हाला समजले आहे. अहमदाबादस्थित गुजरात वार्ताहर या नात्याने ‘द हिंदू’साठी त्यांच्या व्यावसायिक कामाची आम्ही प्रशंसा करतो. आम्हाला आशा आहे की, कोठेही कोणत्याही पत्रकाराला त्यांच्या कामासाठी लक्ष्य केले जाणार नाही आणि आम्ही अपेक्षा करतो की तपास निष्पक्ष आणि त्वरीत केला जाईल.