तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर ‘कॅश-फॉर-क्वेरी’ अर्थात लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी एका उद्योगपतींकडून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी हा आरोप केला असून या प्रकरणाची चौकशी होत नाही तोपर्यंत मोईत्रा यांची खासदारकी रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मोईत्रा यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, हिरानंदानी उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) दर्शन हिरानंदानी यांनी लोकसभेच्या आचार समितीकडे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. या प्रतिज्ञापत्रात अनेक दावे करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर मोईत्रा यांच्यावर नेमके काय आरोप आहेत? दर्शन हिरानंदानी यांच्या प्रतिज्ञापत्रात नेमके काय आहे? या आरोपानंतर मोईत्रा यांनी काय स्पष्टीकरण दिले? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या….

नेमके प्रकरण काय आहे?

मोईत्रा यांच्यावर शशिकांत दुबे यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी एका उद्योगपतीकडून पैसे घेतले आहेत, असा दावा दुबे यांनी केला. हा दावा करत त्यांनी आयटीमंत्री अश्विनी वैष्णव तसेच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना दोन वेगवेगळी पत्रे लिहिली. अश्विनी वैष्णव यांना लिहिलेल्या पत्रात दुबे यांनी मोईत्रा यांच्या लोकसभेच्या लॉगीनसाठीच्या आयपी अॅड्रेसची तपासणी करावी. मोईत्रा यांच्या लोकसभेच्या लॉगीन आयडी आणि पासवर्डचा वापर अन्य कोणी करत आहे का? हे तपासावे, अशी मागणी केली. तसेच ओम बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात दुबे यांनी ‘मोईत्रा यांनी हिरानंदानी समूहाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी लाच घेतली,’ असा आरोप केला. तसेच या आरोपांची चौकशी होईपर्यंत मोईत्रा यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

Demand money from company owner in name of MLA Pune news
आमदाराच्या नावाने कंपनी मालकाकडे पैशांची मागणी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
Prakash Ambedkar, Vanchit Bahujan Aghadi Candidate pune, Vanchit Bahujan Aghadi,
“भाजपचा आरक्षण संपविण्याचा मोठा डाव”, कोणी केला हा गंभीर आरोप ?
Congress, votes, Nayab Singh Saini, Nayab Singh Saini pune,
खोटी आश्वासने देऊन मतविभागणीचा काँग्रेसचा उद्योग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचा आरोप
supreme court rejects sebi penalty on mukesh ambani In rpl shares case
सर्वोच्च न्यायालयाचा मुकेश अंबानींना दिलासा; ‘आरपीएल शेअर्स’प्रकरणी ‘सॅट’च्या आदेशाला सेबीचे आव्हान फेटाळले!
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच

मोईत्रा यांच्यावर आरोप काय?

निशिकांत दुबे यांनी मोईत्रा यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात हिरानंदानी यांनी महुआ मोईत्रा यांना रोख रक्कम आणि भेटवस्तू दिल्या होत्या. तसेच दर्शन हिरानंदानी यांनी २०१९ ची निवडणूक लढण्यासाठी मोईत्रा यांना ७५ लाख रुपये दिले होते. त्याचबरोबर मोईत्रा यांना महागडे आयफोनही दिले होते. महुआ मोईत्रा यांना देण्यात आलेल्या सरकारी बंगल्याची डागडुजीदेखील केली होती, असे अनेक दावे दुबे यांनी केले आहेत.

हिरानंदानी यांचे प्रतिज्ञापत्र आले समोर

मोईत्रा यांच्यावर केलेल्या आरोपानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. असे असतानाच हिरानंदानी ग्रुपचे सीईओ दर्शन हिरानंदानी यांचे प्रतिज्ञापत्र समोर आले आहे. या प्रतिज्ञापत्रात हिरानंदानी यांनी दुबे यांच्या आरोपांना दुजोरा दिला आहे. या प्रतिज्ञापत्रामुळे मोईत्रा यांच्या अडचणी एकाप्रकारे वाढल्या आहेत.

“मोईत्रा यांना प्रसिद्धीच्या झोतात यायचे होते”

दर्शन हिरानंदानी हे सध्या दुबईमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांनी एकूण तीन पानांचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. हे प्रतिज्ञापत्र लोकसभेच्या आचार समितीकडे सादर केल्यानंतर हिरानंदानी समूहाच्या माध्यम विभागाने ते लगेच माध्यमांना दिले. “मोईत्रा यांना राष्ट्रीय पातळीवर लवकर प्रसिद्धीच्या झोतात यायचे होते. तसेच मोईत्रा यांचे मित्र आणि सल्लागारांनी त्यांना मोदी यांच्यावर टीका केल्यावर लवकर प्रसिद्धी मिळेल, असे सांगितले होते,” असे या प्रतिज्ञापत्रात म्हणण्यात आले आहे.

“पंतप्रधान मोदींना अडचणीत आणण्यासाठी उद्योगपती गौतम अदाणी यांच्यावर हल्लाबोल करणे, हा एकमेव मार्ग आहे असे मोईत्रा यांना वाटले होते. कारण गौतम अदाणी आणि नरेंद्र मोदी हे एकाच राज्यातील आहेत,” असेही या प्रतिज्ञापत्रात म्हणण्यात आले आहे.

“सरकारला लक्ष्य करण्यासाठी अदाणी समूहावर प्रश्न”

“मोईत्रा यांनी सरकारला लक्ष्य करण्यासाठी अदाणी समूहावर प्रश्न तयार केले होते. हे प्रश्न तयार करण्यासाठी मी माहिती द्यावी, म्हणून लोकसभेच्या खासदार या नात्याने त्यांनी मला त्यांचा ई-मेल पाठवला. मी त्यांचा हा प्रस्ताव स्वीकारला होता,” असेही या प्रतिज्ञापत्रात सांगण्यात आले आहे.

“मला संसदेचा लॉगीन आयडी आणि पासवर्ड दिला”

“अदाणी समूहाला लक्ष्य करण्यासाठी मी सहकार्य करत राहावे, अशी विनंती त्यांनी मला केली होती. अदाणी समूहाला लक्ष्य करता यावे, यासाठी त्यांच्यामार्फत मी प्रश्न विचारावेत म्हणून त्यांनी मला त्यांचा संसदेचा लॉगीन आयडी आणि पासवर्ड पाठवला होता. मोईत्रा यांना पत्रकार सुचेता दलाल यांसारख्या अन्य लोकांकडूनही मदत होत आहे. अशा लोकांकडून गौतम आदाणी आणि त्यांच्या कंपन्यांबाबतची माहिती कोणतीही सत्यता न पडताळता पाठवली मोईत्रा यांना दिली आहे,” असेही या प्रतिज्ञापत्रात म्हणण्यात आले आहे.

“हिरानंदानी यांनी केलेला दावा खोटा”

सुचेता दलाल ‘मनीआलाईफ’ या अर्थविषयक माहिती देणाऱ्या ऑनलाईन वृत्तसंकेतस्थळाच्या व्यवस्थापकीय संपादक आहेत. मोईत्रांच्या या प्रकरणात नाव आल्यानंतर दलाल यांनी एक्सच्या (पूर्वीचे ट्विटर) माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. मी मोईत्रा यांना ओळखत नाही, असे दलाल म्हणाल्या आहेत. “दर्शन हिरानंदानी यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात माझे नाव घेतले आहे. मात्र त्यांनी केलेला दावा खोटा आहे. मी महुआ मोईत्रा यांना ओळखत नाही. याबाबतची खात्री मोईत्रा यादेखील करू शकतील. मी त्यांना ओळखतच नसल्यामुळे त्यांना अशा प्रकारची माहिती पुरवण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांनीदेखील कोणत्याही माहितीसाठी माझ्याकडे विचारणा केलेली नाही. त्यांनी माझ्याकडून कोणतीही मदत मागितलेली नाही,” असे स्पष्टीकरण दलाल यांनी दिले आहे.

“माझी मदत हवी असेल तर माझ्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील”

हिरानंदानी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, मोईत्रा यांचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी, शशी थरूर तसेच पिनाकी मिश्रा आदी नेत्यांशी चांगले संबंध होते. याच कारणामुळे मोईत्रा यांच्या मदतीने विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या अन्य राज्यांमध्ये आम्हाला फायदा होईल, असे हिरानंदानी यांना वाटले होते. याच प्रतिज्ञापत्रात केलेल्या दाव्यानुसार मोईत्रा यांनी हिरानंदानी यांच्याकडे वेळोवेळी वेगवेगळ्या वस्तूंची मागणी केली. तसेच माझी मदत हवी असेल तर माझ्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील, असेही मोईत्रा हिरानंदानी यांना म्हणाल्या होत्या.

“मोईत्रा यांच्याकडून वेगवेगळ्या मागण्या करण्यात आल्या”

“माझ्याकडे करण्यात आलेल्या मागण्यांत वेगवेगळ्या महागड्या भेटवस्तूंचा समावेश होता. दिल्लीमध्ये मिळालेल्या शासकीय बंगल्याची डागडुजी, प्रवासाचा खर्च, देशांतर्गत तसेच परदेशात प्रवास करण्यासाठी मदत अशा प्रकारच्या मागण्या मोईत्रा यांच्याकडून करण्यात आल्या होत्या. मोईत्रा या माझा प्रमाणापेक्षा अधिक फायदा घेत आहेत, असे मला अनेकवेळा वाटायचे. मला ज्या गोष्टी नको होत्या, त्या करण्यासाठी माझ्यावर त्या दबाव टाकत आहेत, असेही मला वाटायचे. मात्र माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता, असे हिरानंदानी यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे.

“मोईत्रा यांचे संसदेचे लॉगीन आयडी वापरून काही प्रश्न तयार केले”

“मोईत्रा यांना अनेक पडताळणी न केलेली माहिती वेगवेगळ्या माध्यमातून मिळाली होती. अदाणी समूहाच्या काही माजी कर्मचाऱ्यांकडूनही ही माहिती मिळाल्याचा दावा केला जात होता. यातील काही माहिती माझ्याशी शेअर करण्यात आली होती. याच माहितीच्या आधारे मी मोईत्रा यांचे संसदेचे लॉगीन आयडी वापरून काही प्रश्न तयार केले होते.” असादेखील दावा हिरानंदानी यांनी आपल्या पत्रात केला आहे.

हे ही वाचा >> “महुआ मोईत्रांनी मोदींना बदनाम करण्यासाठी अदाणींना टार्गेट केलं”, दर्शन हिरानंदानींचा दावा

“हिरानंदानी यांचे प्रतिज्ञापत्र म्हणजे हास्यास्पद बाब”

महुआ मोईत्रा यांनी मात्र हिरानंदानी यांचे प्रतिज्ञापत्र म्हणजे हास्यास्पद बाब आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच हिरानंदानी यांच्या प्रतिज्ञापत्राचा मसुदा हा पंतप्रधान कार्यालयामार्फत पाठवण्यात आला आहे, असा दावाही त्यांनी केला. “पंतप्रधानांच्या कार्यालयाने हिरानंदानी यांना त्या प्रतिज्ञापत्रावर सही करण्यास भाग पाडले आहे. हिरानंदानी हे खूप श्रीमंत आहेत. ते थेट मंत्री तसेच पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. ते माझ्यासारख्या पहिल्यांदाच खासदार झालेल्या व्यक्तीला भेटवस्तू कशाला देतील. हे पूर्णपणे अतार्किक आहे. पंतप्रधान कार्यालयाने हिरानंदानी यांना सही करण्यासाठी दबाव टाकला आहे. हे प्रतिज्ञापत्र पंतप्रधान कार्यालयाने तयार केलेले आहे. दर्शन यांनी ते तयार केलेले नाही,” असे मोईत्रा म्हणाल्या आहेत.

“हिरानंदानी यांना व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याची धमकी”

पंतप्रधान कार्यालयाने दर्शन हिरानंदानी आणि त्यांच्या वडिलांवर प्रतिज्ञापत्रावर सही करण्यासाठी दबाव टाकला, असाही आरोप मोईत्रा यांनी केला. “दर्शन हिरानंदानी यांना त्यांचे सर्व व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याची धमकी देण्यात आली होती. उद्योगविश्वातून त्यांना संपवलं जाईल, अशी धमकी आली. त्यांच्या कंपन्यांवर सीबीआय छापे टाकेल आणि सर्व व्यवसाय बंद केले जातील. तसेच सर्व PSU बँक वित्तपुरवठा ताबडतोब बंद केला जाईल, अशा धमक्या देण्यात आल्या आहेत,” असा दावा मोईत्रा यांनी केला.

हे ही वाचा >> महुआ मोईत्रा यांच्या वकिलाची खटल्यातून माघार, नेमकं कारण काय?

“लेटरहेड नसलेल्या एका पांढर्‍या कागदावर प्रतिज्ञापत्र”

“तीन दिवसांपूर्वी (१६ ऑक्टोबर) हिरानंदानी ग्रुपने एक अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी केले होते, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की त्यांच्यावरील सर्व आरोप निराधार आहेत. आज (गुरुवारी) एक प्रतिज्ञापत्र प्रसारमाध्यमांसमोर आले आहे. हे प्रतिज्ञापत्र लेटरहेड नसलेल्या एका पांढर्‍या कागदावर आहे,” असंही मोईत्रा यांनी निदर्शनास आणून दिले.

“आम्ही प्रकरणाची चौकशी करणार”

दरम्यान, हिरानंदानी यांचे हे प्रतिज्ञापत्र आम्हाला अद्याप मिळालेले नाही, अशी माहिती संसदेच्या आचार समितीचे अध्यक्ष विनोद सोनकर यांनी दिली. सध्या आमच्याकडे उपलब्ध असलेल्या सर्व सामग्रीची आम्ही तपासणी करू, मोईत्रा यांच्यावरील आरोप हे गंभीर स्वरूपाचे आहेत, असेही सोनकर म्हणाले. त्यामुळे या प्रकरणात भविष्यात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.