-संकेत कुलकर्णी

क्रिकेट या खेळाचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. मात्र तो भारतात जितका रुजला तितका अमेरिका, चीन, जपान, रशिया यांच्यासारख्या अनेक देशांत त्याचा अपेक्षित प्रसार झालेला नाही. अमेरिकेसह इतरत्र जगभरात क्रिकेटचा प्रसार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीकडून (आयसीसी) वेळोवेळी पावले उचलली जातात. पुढील वर्षी अमेरिकेत होणाऱ्या पहिल्यावहिल्या मेजर लीग ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला आणि अडॉबचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू नारायण या दोन भारतीय-अमेरिकन व्यावसायिकांनी पुढाकार घेत १२ कोटी अमेरिकन डॉलर इतकी मोठी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. या निमित्ताने या लीगचा आणि या स्पर्धेतील गुंतवणुकीचा घेतलेला वेध.

अमेरिकेत होणाऱ्या पहिल्या ट्वेंटी-२० लीगचे गुंतवणूकदार कोण आहेत ?
समीर मेहता आणि विजय श्रीनिवासन हे मेजर लीग क्रिकेट या अमेरिकेतील पहिल्या व्यावसायिक ट्वेंटी-२० क्रिकेट लीगचे सह-संस्थापक आहेत. अमेरिकेतील आघाडीच्या व्यावसायिक गटाच्या नेतृत्वाखाली या लीगसाठी ४.४० कोटी अमेरिकन डॉलर्सचा निधी उभारण्यात आला आहे. पुढील वर्षभरात ७.६० कोटी अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक निधी जमा करण्याचे उद्दिष्ट त्यांनी निश्चित केले आहे.

सत्या नाडेला आणि शंतनू नारायण यांनी अमेरिकन ट्वेंटी-२० लीगमध्ये का आणि किती गुंतवणूक केली आहे?
अमेरिकेत क्रिकेट हा खेळ लोकप्रिय करण्याच्या उद्देशाने मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला आणि अडॉबचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू नारायण यांनी या लीगमध्ये गुंतवणूक केली आहे. एकूण १२ कोटी डॉलर्सपर्यंतची गुंतवणूक करण्यास ते तयार आहेत. ‘‘मी शाळेत असताना माझ्या शाळेच्या क्रिकेट संघाकडून खेळलो आहे. कसोटी क्रिकेट पाहणे मला जास्त आवडते. क्रिकेटने मला सांघिक भावना आणि नेतृत्व कौशल्य शिकवले. ते मला माझ्या आयुष्यात नेहमीच उपयोगी पडते,’’ असे नाडेला यांनी म्हटले आहे.

क्रिकेट हा खेळ अमेरिकेत का रुजला नाही ?
सध्या जगातील सर्वात लोकप्रिय खेळ म्हणून क्रिकेटचा समावेश आहे. जगभरात तब्बल २.५ अब्ज लोक क्रिकेट पाहतात. परंतु क्रिकेट ज्यावेळी उदयास येत होते, त्यावेळीच अमेरिकेत बेसबॉल हा खेळ नावारूपास येत होता. त्यामुळे येथे क्रिकेटचा अपेक्षित प्रसार झाला नाही. अमेरिकेतील एक व्यापारी आणि बेसबॉल या खेळाचे प्रणेते एजी स्पाल्डिंग यांनी आपल्या खेळासाठी अमेरिकेत क्रिकेटचे दरवाजे बंद करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली, त्यामुळे क्रिकेटला अमेरिकेत जास्त स्थान मिळाले नाही.

अमेरिकनील मेजर लीग क्रिकेटचा खेळाडूंना फायदा होणार का ?
अमेरिकेत क्रिकेटच्या विकासासाठी मेजर लीग क्रिकेटची विशेष भागीदार म्हणून निवड केली आहे. मेजर लीग क्रिकेट अमेरिकेच्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करून देण्यास सहाय्य करणार आहे. २०२४मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपददेखील अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांना संयुक्तपणे देण्यात आले आहे. त्यामुळे तेथील खेळाडूंना येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळता येणार आहे.

अमेरिकेत याआधी क्रिकेट लीगसाठी कोणते प्रयत्न झाले?
मेजर लीग क्रिकेटच्या आधी अमेरिकेत लीग क्रिकेटचे अनेक प्रयत्न झाले. २००४मध्ये प्रो क्रिकेटचे सामने झाले. नंतर अमेरिकन प्रीमियर लीगचादेखील प्रस्ताव होता. यात अमेरिकन क्रिकेट संघटना आणि न्यूझीलंड क्रिकेट यांच्यातील भागीदारी देशांतर्गत ट्वेंटी-२० स्पर्धेनंतर झाली. २०१८मध्ये अमेरिकेतील क्रिकेट संघटनेने २०२१मध्ये देशांतर्गत क्रिकेट लीग आयोजित करण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न सुरू केले. २१ फेब्रुवारी २०२० रोजी झालेल्या संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अमेरिकेत २०२१मध्ये मेजर लीग क्रिकेट सुरू करण्याची योजना आखली. परंतु करोनाच्या साथीमुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. मात्र आता या नव्या गुंतवणुकीमुळे क्रिकेटच्या अमेरिकेतील प्रसारास बळ मिळेल.

Story img Loader