-भक्ती बिसुरे

जागतिक स्तरावरील आजारांचे प्रमाण विचारात घेतले असता कीटकजन्य आजाराचा वाटा १७ टक्के एवढा आहे. या आजारांमुळे जगभरामध्ये दरवर्षी सुमारे सात लाख मृत्यू होतात. त्यांपैकी २१९ दशलक्ष रुग्ण आणि सुमारे चार लाख मृत्यू केवळ हिवताप किंवा मलेरियामुळे होतात. वातावरणातील बदल, कीटकनाशक औषधांचा वाढता वापर आणि त्यातून कीटकांमधील वाढती प्रतिकारशक्ती यांमुळे मलेरियाच्या निर्मूलनाचे आव्हान मोठे आहे. जागतिक मलेरिया जागृती दिवस (२५ एप्रिल) नुकताच साजरा झाला. त्यानिमित्ताने मलेरियाची सद्यःस्थिती काय आहे, याचा आढावा. 

nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
flights affected by bomb threat
वाढत्या विमान धमक्यांचा ५१० उड्डाणांवर परिणाम…धमकीखोरांच्या बंदोबस्तासाठी कोणत्या उपाययोजना? किती परिणामकारक?
terrorist 44 killed during the year in jammu region
जम्मू विभागात दहशतवादी कारवायांत वाढ; वर्षभरात ४४ ठार
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
Loksatta explained Why has the central government recommended the influenza vaccine
केंद्र सरकारने इन्फ्लूएन्झा लशीची शिफारस का केली आहे? भारताला फ्लूचा विळखा?
Special campaign against Pneumonia by Zilla Parishad to prevent child death
बालमृत्यू टाळण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे न्यूमोनियाविरोधात विशेष मोहीम
Loksatta explained What is the exact reason behind the death of ten elephants in Bandhavgarh National Park in Madhya Pradesh
विश्लेषण: एकाच वेळी दहा हत्तींच्या मृत्यूमागे नेमके कारण काय?

मलेरिया म्हणजे काय? तो कशामुळे होतो?

या आजाराचा प्रसार करणाऱ्या डासाचे नाव आहे अनोफिलिस. जगामध्ये या डासाच्या ५३२ प्रजाती आहेत. त्यांपैकी भारतामध्ये एकूण ६२ प्रजाती आढळून येतात. त्या ६२ प्रजातींपैकी नऊ प्रजाती  मलेरियाच्या प्रसारास कारणीभूत ठरतात. महाराष्ट्रामध्ये ॲनोफिलीस या डासाच्या तीन प्रजातींपासून मलेरिया पसरतो. हा डास साचलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालतो. या डासाच्या पंखावर पांढरे ठिपके असतात. रात्री किंवा पहाटे हे डास चावतात. थंडी वाजून ताप येणे, तो २४ किंवा ४८ किंवा ७२ तासांनी परत येणे, फक्त थंडी वाजणे, डोकेदुखी, मळमळणे, उलट्या होणे, त्वचा कोरडी पडणे, घाम येऊन ताप उतरणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत.

आजारामुळे होणारे दुष्परिणाम कोणते?

या आजारासाठी सर्वात असुरक्षित संवर्ग कुठला असेल तर तो आहे पाच वर्षाखालील बालके आणि गर्भवती महिला यांचा. हा संवर्ग या आजारासाठी सर्वात संवेदनशील असल्याने यात मृत्युंची संख्या अधिक आहे. या आजारामुळे औषधावरील खर्च वाढतो आणि मनुष्यबळाचाही नाश होतो, परिणामी देशाचे आर्थिक नुकसान होते. डासांच्या नायनाटासाठी वापरल्या जाणाऱ्या महागड्या कीटकनाशकांमुळे  मनुष्य तसेच इतर उपयोगी कीटकांवर दुष्परिणाम होतात. त्यातून पर्यावरणावरही मोठे परिणाम होतात.

निर्मूलनासाठी शासन काय करते?

शासकीय यंत्रणेला मलेरियाच्या रुग्णाची माहिती मिळाल्यानंतर यंत्रणेमार्फत रुग्णाच्या घर आणि परिसरातील सुमारे ५० ते १०० घरांमध्ये तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण केले जाते. या रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी करून मलेरियाचा संसर्ग आढळला असता त्यांना तातडीने उपचार दिले जातात. परिसरातील पाणीसाठ्यांची तपासणी करून त्यामध्ये आवश्यकतेनुसार अळीनाशक औषधे फवारली जातात. मलेरियाचा प्रसार करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी, सवयी याबाबत जनतेचे प्रबोधन केले जाते. समज देऊनही सहकार्य न करणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई केली जाते.

काय काळजी घ्यावी?

प्रत्येक ताप आलेल्या व्यक्तींनी मलेरियासाठी रक्ताची तपासणी करून घ्यावी. ही रक्ताची तपासणी सरकारी संस्थेमध्ये संपूर्णपणे मोफत असून ती जगातील सर्वोत्तम तपासणी आहे. या तपासणीमध्ये हिवताप आजाराचे निदान झाल्यास तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलेले औषधोपचार एकही दिवस न चुकवता पूर्ण करावे. सर्व सरकारी दवाखाने आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हे उपचार मोफत उपलब्ध आहेत. हे उपचार पूर्ण केल्यानंतर एक महिना झाल्यानंतर पुन्हा थंडी वाजून ताप आला असता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घर आणि परिसरात योग्य ती मलेरिया प्रतिबंधात्मक औषध फवारणी करुन घ्यावी. या आजाराचा प्रसार हा ॲनोफिलीस डासाच्या मादीपासून होत असल्याने या डासांची वाढ रोखण्यासाठी घर आणि परिसरातील सर्व पाणी साठे वाहते करावेत. पाणी साठवलेल्या भांड्यांना कापडाने झाकावे. मोठ्या टाक्या आणि तत्सम पाणी साठ्यांमध्ये गप्पी मासे किंवा टेमिफोस या अळीनाशक औषधाचा वापर करावा. घराच्या दारे खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात. रात्री तसेच दुपारी झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. संध्याकाळी घरामध्ये धूर करावा किंवा डास प्रतिबंधात्मक कॉईल, क्रीम यांचा वापर करावा. घर किंवा परिसरातील पाणीसाठ्यांमध्ये मलेरियाला कारणीभूत ठरणाऱ्या डासांच्या अळ्या आढळून आल्या असता ते पाणी थेट ओतून टाकू नये. 

निर्मूलनाबाबत उद्दिष्ट कोणते?

राज्याचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप म्हणाले, की जागतिक आरोग्य संघटनेने २०३० पर्यंत या आजाराच्या निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. निर्मूलन निकषांमध्ये गाव, जिल्हा, राज्यात स्थानिक पातळीवर संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळून येऊ नये आणि हे चित्र तीन वर्षे कायम राहावे असे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटना त्याबाबत पडताळणी करुन तो विशिष्ट प्रदेश मलेरियामुक्त झाल्याचे प्रमाणपत्र देते. सध्या श्रीलंका, मालदीव आणि चीन यांनी मलेरियामुक्तीचे उद्दिष्ट साध्य केले आहे. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे या महापालिका तर रायगड, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. तेथे मलेरिया निर्मूलनाचे प्रयत्न सुरू आहेत. मागील दोन वर्षे करोना नियंत्रणाला प्राधान्य असल्याने मलेरिया निर्मूलनाकडे दुर्लक्ष झाले. मात्र, यापुढे मलेरिया निर्मूलनासाठी सर्वेक्षण, तपासणी, उपचार, कीटक नियंत्रण, जन जागृती, नागरिकांचे सहकार्य आणि राजकीय इच्छाशक्ती यांची गरज आहे.