भक्ती बिसुरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगभरातील मानवजातीला वेठीस धरणाऱ्या विविध आजारांपैकी १७ टक्के आजार हे कीटकजन्य आहेत. कीटकजन्य आजारांमुळे जगभर दरवर्षी सुमारे सात लाख मृत्यू होतात. त्यापैकी सुमारे चार लाख मृत्यू केवळ मलेरियामुळे होतात. वातावरणातील बदल, कीटकनाशक औषधांचा वाढता वापर आणि कीटकांमध्ये असलेली कीटकनाशक विरोधी प्रतिकारशक्ती (रेझिस्टन्स) अशा विविध कारणांमुळे मलेरियाच्या निर्मूलनाचे आव्हान मोठे आहे. करोना काळात मलेरिया निर्मूलन प्रयत्नांचा प्राधान्यक्रम काहीसा मागे पडला. जगावरील मलेरिया अधिभारापैकी बहुतांश अधिभार आफ्रिकी देशांत असला तरी तीन टक्के अधिभार भारतात आहे. २५ एप्रिल हा दिवस जागतिक मलेरिया जागृती दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने मलेरियाच्या सद्यःस्थितीवर प्रकाश टाकणारे हे विश्लेषण.

मलेरिया म्हणजे काय? कशामुळे होतो?

या आजाराचा प्रसार करणाऱ्या डासाचे नाव आहे ॲनोफेलीस. जगामध्ये या डासाच्या ५३२ प्रजाती आहेत. त्यांपैकी भारतामध्ये एकूण ६२ प्रजाती आढळून येतात. त्या ६२ प्रजातींपैकी नऊ प्रजाती या मलेरियाच्या प्रसारास कारणीभूत ठरतात. महाराष्ट्रामध्ये ॲनोफिलिस या डासाच्या तीन प्रजातींपासून मलेरिया पसरतो. हा डास साचलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालतो. या डासाच्या पंखावर पांढरे ठिपके असतात. रात्री किंवा पहाटे हे डास चावतात. थंडी वाजून ताप येणे, तो २४ किंवा ४८ किंवा ७२ तासांनी परत येणे, फक्त थंडी वाजणे, डोकेदुखी, मळमळणे, उलट्या होणे, त्वचा कोरडी पडणे, घाम येऊन ताप उतरणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत.

आजारामुळे होणारे दुष्परिणाम कोणते?

पाच वर्षांखालील मुले आणि गर्भवती महिला यांना हा आजार होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे मृत्यूचे प्रमाणही लक्षणीय आहे. या आजारामुळे औषधावरील खर्च वाढतो. मनुष्यबळाचे नुकसान होते. देशाचे आर्थिक नुकसान होते. डासांच्या नायनाटासाठी महागड्या कीटकनाशकांचा वापर केला जातो. त्याचे दुष्परिणाम मनुष्य तसेच इतर उपयोगी कीटकांवरही होतो. त्यातून पर्यावरणावरही मोठे आणि दूरगामी परिणाम होतात.

जागतिक मलेरिया आणि भारत…

२०२२च्या जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार आग्नेय आशियातील सुमारे दोन टक्के मलेरियाचे रुग्ण भारतात आहेत. तसेच मागील तीन वर्षांतील आग्नेय आशियातील मलेरिया मृत्यूंपैकी सुमारे ८२ टक्के मृत्यूही भारतात झाले आहेत. भारताने २०२३पर्यंत मलेरिया मुक्त होण्याचे, तर २०३०पर्यंत मलेरियाचे संपूर्ण निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. जगाच्या इतर भागांच्या तुलनेत आफ्रिकन देशांमध्ये मलेरियाचे अस्तित्व आजही सर्वाधिक आहे. यंदा ‘मलेरिया मुक्तीसाठी गुंतवणूक करणे, कल्पना योजणे आणि अंमलबजावणी करणे’ ही मध्यवर्ती संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. सध्या श्रीलंका, मालदिव आणि चीन या देशांनी मलेरियामुक्तीचे उद्दिष्ट साध्य केले आहे, मात्र, भारताच्या ग्रामीण तसेच दुर्गम भागात आजही मलेरियाचे अस्तित्व कायम आहे.

काय काळजी घ्यावी?

प्रत्येक ताप आलेल्या व्यक्तींनी मलेरियासाठी रक्ताची तपासणी करून घ्यावी. ही रक्ताची तपासणी सरकारी संस्थेमध्ये संपूर्णपणे मोफत असून ती जगातील सर्वोत्तम तपासणी आहे. या तपासणीमध्ये मलेरिया आजाराचे निदान झाल्यास तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलेले औषधोपचार एकही दिवस न चुकवता पूर्ण करावे. सर्व सरकारी दवाखाने आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हे उपचार मोफत उपलब्ध आहेत. हे उपचार पूर्ण केल्यानंतर एक महिना झाल्यानंतर पुन्हा थंडी वाजून ताप आला असता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घर आणि परिसरात योग्य ती मलेरिया प्रतिबंधात्मक औषध फवारणी करून घ्यावी. या आजाराचा प्रसार हा ॲनोफेलीस डासाच्या मादीपासून होत असल्याने या डासांची वाढ रोखण्यासाठी घर आणि परिसरातील सर्व पाणी साठे वाहते करावेत. पाणी साठवलेल्या भांड्यांना कापडाने झाकावे. मोठ्या टाक्या आणि तत्सम पाणी साठ्यांमध्ये गप्पी मासे किंवा टेमिफोस या अळीनाशक औषधाचा वापर करावा. घराच्या दारे खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात. रात्री तसेच दुपारी झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. संध्याकाळी घरामध्ये धूर करावा किंवा डास प्रतिबंधात्मक कॉईल, क्रीम यांचा वापर करावा. घर किंवा परिसरातील पाणीसाठ्यांमध्ये मलेरियाला कारणीभूत ठरणाऱ्या डासांच्या अळ्या आढळून आल्या असता ते पाणी थेट ओतून टाकू नये.

निर्मूलन केव्हा म्हणायचे?

मलेरिया निर्मूलन निकषांमध्ये गाव, जिल्हा, राज्यात स्थानिक पातळीवर संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळून येऊ नये आणि हे चित्र तीन वर्षे कायम राहावे असे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटना त्याबाबत पडताळणी करून तो विशिष्ट प्रदेश मलेरियामुक्त झाल्याचे प्रमाणपत्र देते. सध्या श्रीलंका, मालदिव आणि चीन यांनी मलेरियामुक्तीचे उद्दिष्ट साध्य केले आहे. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे या महापालिका तर रायगड, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. २०३० पर्यंत मलेरिया निर्मूलनासाठी गाठायचा पल्ला अद्याप मोठा आहे आणि त्यासाठी सार्वत्रिक प्रयत्नांची गरज आहे.

bhakti.bisure@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malaria eradication still far away print exp scj
Show comments