पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आहेच कोण, हा प्रश्न भाजप समर्थक सातत्याने २०२४ च्या निवडणुकीच्या तोंडावर उपस्थित करतात. विरोधकांच्या इंडिया आघाडीलाही याला उत्तर शोधावे लागेल. गेल्या दोन सार्वत्रिक निवडणुकीत देशात अध्यक्षीय पद्धतीने निवडणूक झाल्याचे चित्र दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेपुढे विरोधकांना चेहरा देता आला नाही. यामुळे लोकसभा तसेच विधानसभेला मतदान करताना मतदार वेगळा विचार करतात. उदा. लोकसभेबरोबरच ज्या ठिकाणी विधानसभा निवडणूक झाली तेथे भाजपविरोधकांची सरशी झाली. ओडिशात बिजू जनता दलाला मोठे यश मिळाले.
मात्र लोकसभेला त्या राज्यात भाजपने चांगले यश मिळवले. मोदींच्या नावे मते मागितल्यावर त्यात वाढ होते हा अनुभव आहे. यामुळेच विरोधकांच्या आघाडीकडून मोदींना टक्कर देईल असे नाव पुढे ठेवणे गरजेचे होते. इंडिया आघाडीच्या नवी दिल्लीतील बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव पुढे केले. याला दिल्लीचे मुख्यमंत्री आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी अनुमोदन दिल्याचे सांगितले जाते. आता ८१ वर्षीय खरगे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कितपत आव्हान देऊ शकतील याची चर्चा सुरू झाली. विरोधकांची एकजूट ठेवण्यात त्यांना यश मिळेल काय, हा मुद्दा आहे.
राजकारणात प्रदीर्घ अनुभव
कर्नाटकच्या राजकारणात दीर्घकाळ विविध पदे भूषवलेले खरगे हे उत्तम संघटक मानले जातात. कायद्याचे शिक्षण घेतलेल्या खरगेंनी केंद्रात तसेच कर्नाटकात मंत्रीपद भूषवले. याखेरीज राज्यात विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळली असून, सध्या राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे आहे. भाजपकडून सातत्याने काँग्रेसमधील घराणेशाहीविरोधात आरोप केला जातो त्याला खरगेंच्या उमेदवारीने आळा बसेल. दलित व्यक्तीचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे आणल्याने काँग्रेसच्या जुन्या मतदारांमध्ये विश्वास निर्माण होऊ शकतो. गेल्या दोन निवडणुकांत दलित तसेच आदिवासी मते मोठ्या प्रमाणात भाजपच्या बाजूने वळली आहेत. भाजप दक्षिणेत कमकुवत आहे, त्यामुळे खरगेंचे नाव पुढे आणल्याने कर्नाटकसह दक्षिणेतील राज्यांमध्ये विरोधकांच्या दृष्टीने सकारात्मक संदेश जाऊ शकतो. येथे भाजपला शह बसू शकतो. मात्र खरगेंना काँग्रेसमधून किती पाठिंबा मिळणार, हा मुद्दा आहे. याबाबत विचारले असता, आधी इंडिया आघाडीचे अधिकाधिक खासदार निवडून आणणे महत्त्वाचे, नेतेपदाचे मग बघू अशी सारवासारव खरगेंनी केली. कारण राहुल गांधी यांना डावलून पुढे जाणे म्हणजेच गांधी कुटुंबाची नाराजी ओढवून घेतल्यासारखे आहे, हे खरगेंना माहीत आहे. त्यामुळेच ते सावध पावले टाकत आहेत.
मित्रपक्षातही कितपत सहमती?
विरोधकांच्या इंडिया आघाडीत निमंत्रक पदासाठी बिहारचे मुख्यमंत्री व संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार हे इच्छुक असल्याची चर्चा होती. त्यात राष्ट्रीय जनता दलाच्या लालूप्रसाद यादव यांचा त्यांना पाठिंबा आहे. अर्थात लालूप्रसाद यांना नितीशकुमार यांच्याबाबत फार स्नेह आहे अशातील भाग नाही. तर नितीश केंद्रात गेल्यास बिहारच्या मुख्यमंत्रीपदी पुत्र तेजस्वी यांना बसविता येईल असा त्यांचा हिशेब आहे. खरगे यांचे नाव पुढे आल्यावर बिहारमधील हे दोन नेते काय करणार? जाहीरपणे त्यांनी नाराजी व्यक्त केली नाही. मात्र या मुद्द्यावर आघाडीत कितपत सहमती होईल हे तूर्त सांगणे कठीण आहे. आघाडीच्या चौथ्या बैठकीतही जागावाटप, समन्वयक नियुक्ती हे कळीचे मुद्दे अनुत्तरित आहेत.
मोदींना कितपत आव्हान?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ७३ वर्षांचे आहेत. अर्थात मोदी किंवा खरगे दोघेही तंदुरुस्त आहेत. व्यायाम तसेच आहाराचे काटेकोर नियोजन करणारे राजकारणी आहेत. देशव्यापी लोकप्रियतेचा विचार केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळपास कोणीही नाही हे विविध संस्थांच्या चाचण्यांमधून दिसून येते. सलग साडेनऊ वर्षे सत्तेत राहूनही पंतप्रधानांविरोधात नाराजी दिसत नाही. याचा अर्थ सारेच आलबेल आहे अशातला भाग नाही. सरकारचा एखादा धोरणात्मक निर्णय चुकेल, मात्र मोदींच्या कामाप्रति असलेल्या निष्ठेबद्दल लोकांच्या मनात शंका नाही हेच या विविध खासगी संस्थांनी केलेल्या चाचण्या दाखवून देतात. यामुळे विरोधकांच्या पुढे मोदी हेच मोठे आव्हान आहे. पाच राज्यांच्या निकालातूनही हीच मोदींची हमी दिसून आली. केवळ त्यांच्यावर टीका करून विरोधकांच्या हाती काहीच लागणार नाही. पर्यायी कार्यक्रम दिला, त्याला मल्लिकार्जुन खरगे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचे नाव पुढे आणले तरच २०२४ च्या निवडणुकीत चुरस राहील.
हेही वाचा… विश्लेषण: महाराष्ट्रात लसूण महाग कसा?
विरोधी आघाडीत काँग्रेस पक्ष सर्वात मोठा आहे. त्या पक्षाचे अध्यक्ष म्हणून आता खरगे यांच्यावर जबाबदारी आहे. पक्षाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यापासून त्यांचे गृहराज्य कर्नाटक तसेच हिमाचल प्रदेशात काँग्रेसला विजय मिळाला. दोन्ही ठिकाणी खरगेंनी मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न व्यवस्थित सोडवला. कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या यांना डी. के. शिवकुमार यांचे आव्हान होते, तर हिमाचलमध्ये सुख्खू यांच्यापुढे प्रतिभा सिंह यांची दावेदारी होती. यात खरगेंनी खंबीरपणे सिद्धरामय्या तसेच सुख्खू यांना मुख्यमंत्रीपद दिले. पक्षाध्यक्ष म्हणून विविध पक्षांशी त्यांनी उत्तम समन्वय ठेवल्याचे वेळोवेळी संसदेत तसेच इतरही ठिकाणी दिसून आले. यातून खरगे मित्रपक्षांना बरोबर घेऊन पुढे नेऊ शकतात हा संदेश गेला. आता मोदींना पर्यायी नेता म्हणून प्रचारात आव्हान उभे करायचे असल्यास विरोधकांना नेता निश्चित करावा लागेल. सर्वांना बरोबर घेऊन जाणारा, संसदीय राजकारणाचा अनुभव असणारा, विविध जबाबदाऱ्या सांभाळलेली व्यक्ती म्हणून खरगेंची ओळख आहे. आता काँग्रेससह आघाडीतील घटक पक्ष ममतांच्या सूचनेचा स्वीकार करणार काय, हा प्रश्न आहे.
hrishikesh.deshpande@expressindia.com