संतोष प्रधान
काँग्रेस अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे हे निवडून आले. १८८५मध्ये स्थापन झालेल्या काँग्रेस पक्षाचे खरगे ६२वे अध्यक्ष आहेत. परंतु आतापर्यंत सहा वेळाच पक्षाध्यक्षपदाकरिता निवडणूक पार पडली. अन्य वेळी सहमतीनेच अध्यक्षांची निवड झाली आहे. अध्यक्षपदाकरिता प्रत्यक्ष निवडणूक झाल्याने पक्षांतर्गत लोकशाहीनेच अध्यक्षांची निवड होते, असा दावा काँग्रेस नेते करू लागले आहेत. तसेच भाजपमध्ये अध्यक्षांची निवड होते, निवडणूक नव्हे, असा चिमटाही काँग्रेसने काढला आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काय घडले?
अध्यक्षपदासाठी प्रत्यक्ष मतदान होऊन कर्नाटकमधील पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे निवडून आले. खरगे यांना ७,८९७ तर शशी थरूर यांना १,०७२ मते मिळाली. अध्यक्षपदी निवडून आलेले ८० वर्षीय खरगे यांना पक्षाच्या बहुसंख्य प्रतिनिधींचा पाठिंबा मिळाला. गांधी कुटुंबियाचे उमेदवार म्हणून खरगे यांचा प्रचार झाला आणि त्यांना निवडणूक सोपी गेली.
पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची कायद्यात तरतूद आहे का?
राजकीय पक्षांच्या अंतर्गत निवडणुका व्हाव्यात, असा आदेश टी. एन. शेषन हे मुख्य निवडणूक आयुक्त असताना काढला होता. तसा कायदा नाही. निवडणूक आयोगाचा तसा प्रशासकीय आदेश असल्याचे निवृत्त मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’मधील लेखात स्पष्ट केले होते. पक्षांतर्गत निवडणुकांमध्ये ब्लाॅक अध्यक्षपदापासून ते पक्षाच्या अध्यक्षपदापर्यंत निवडणूक घेतली जाते. बहुतांशी पक्षांमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक ही बिनविरोध केली जाते. भाजपमध्ये अध्यक्षपदाचे नाव निश्चित केले जाते. राजकीय पक्षांमध्ये अंतर्गत निवडणुकांची औपचारिकता पार पाडली जाते. पक्षांतर्गत निवडणुकांच्या माध्यमातून वाद वा मतभेद होऊ नयेत म्हणून निवडणुका टाळण्याचा बहुतांश पक्षांचा प्रयत्न असतो.
काँग्रेसमध्ये आतापर्यंत किती वेळा अध्यक्षपदाकरिता निवडणूक पार पडली?
काँग्रेसमध्ये शक्यतो अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध केली जाते. यंदा चित्र वेगळे होते. देशभर पक्षाची पीछेहाट होत आहे. त्यातच गांधी कुटुंबियांतील कोणीही अध्यक्षपदी असणार नाही, असे राहुल गांधी यांनी जाहीर केले होते. यामुळे गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष होणार हे स्पष्ट झाल्याने प्रत्यक्ष निवडणूक पार पडली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव अध्यक्षपदाकरिता निश्चित झाले होते. पण राजस्थानमधील मुख्यमंत्रीपदावरून त्यांनी नेतृत्वालाच आव्हान दिल्याने अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव मागे पडले. अध्यक्षपदासाठी आतापर्यंत झालेली ही सहावी निवडणूक ठरली. १९३९, १९५०, १९७७, १९९७, २०००मध्ये अध्यक्षपदाकरिता आतार्यंत निवडणुका झाल्या होत्या. १९३९मध्ये अध्यक्षपासाठी पहिल्यांदा निवडणूक पार पडली होती. तेव्हा महात्मा गांधी यांनी पाठिंबा दिलेले पी. सीतारामय्या यांचा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पराभव केला होता. १९५०मध्ये अध्यक्षपदाकरिता पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या समर्थकांमध्ये लढत झाली होती. त्या निवडणुकीत सरदार पटेल समर्थक पुरुषोत्तमदास टंडन यांनी नेहरू यांचा पाठिंबा असलेले आचार्य कृपलानी यांचा पराभव केला होता. १९७७मध्ये आणिबाणीनंतर काँग्रेसच्या दारुण पराभवामुळे ‘इंदिरा ईज इंडिया’ असे तारे तोडणारे देवकांत बारुआ यांनी राजीनामा दिला होता. तेव्हा झालेल्या निवडणुकीत के. ब्रम्हानंद रेड्डी यांनी सिद्धार्थ शंकर रे आणि करणसिंह यांचा पराभव केला होता. १९९७मध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शरद पवार हे उमेदवार होते. गांधी कुटुंबियांचा वरदहस्त असलेले सीताराम केसरी यांनी शरद पवार व राजेश पायलट यांचा पराभव केला होता. तेव्हा केसरी यांना ६,२२४, शरद पवार यांना ८८२, पायलट यांना ३५४ मते मिळाली होती. २०००मध्ये अध्यक्षपदाची निवडणूक लक्षवेधी ठरली, कारण गांधी कुटुंबातील सदस्याने ती प्रथमच लढवली होती. त्यावेळी सोनिया गांधी यांना जितेंद्र प्रसाद यांनी आव्हान दिले होते. तेव्हा सोनिया गांधी यांना ७४०० तर प्रसाद यांना १००च्या आसपास मते मिळाली होती.