-राखी चव्हाण
चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असणारा मानव-वाघ संघर्ष आता गडचिरोली जिल्ह्यातदेखील पोहोचला आहे. मागील वर्षीपासून सुरू झालेला हा संघर्ष अजूनही थांबायला तयार नाही. याउलट तो वाढतच चालला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातच आजतागायत त्यावर नियंत्रण आणणे वनखात्याला जमले नाही. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातही अशीच परिस्थिती उद्भवणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वाघांचे हल्ले वारंवार का होत आहेत?
गडचिरोली जिल्ह्यात बरीच वर्षेपर्यंत वाघांचा वावर नसल्याने जिल्ह्यातील गावकऱ्यांना मानव-वाघ संघर्षाचा गंध नव्हता. यापूर्वी या जिल्ह्यात वाघ होते, पण संघर्ष नव्हता. आताही वाघांची संख्या खूप जास्त नाही, पण त्यातील अधिकांश वाघ हे ब्रम्हपुरीसारख्या मानव-वाघ संघर्ष असणाऱ्या क्षेत्रातून आल्यामुळे वाघांचे हल्ले सुरू झाले आहेत, असाही एक अंदाज वन्यजीवप्रेमींच्या वर्तुळातून काढला जात आहे. वडसा, आरमोरी परिसरातील नागरिक त्याला बळी पडत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात वाघांचा प्रवेश कसा झाला?
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वनविभागात वाघांची संख्या अधिक आहे आणि त्याला गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंजची सीमा लागून आहे. वैनगंगा नदीने हा प्रदेश विभागला आहे. रवी आणि कोंडाळा या दोन गावांलगत काही वर्षांपूर्वी वाघिणींनी येथे प्रवेश केला. याच सुमारास काही वाघदेखील त्याठिकाणी आले. २०१५च्या सुमारास टी-वन या नऊ वर्षे वयाच्या वाघाने ब्रम्हपुरीतून वडसा गाठले. यानंतर या जिल्ह्यात वाघांची संख्या वाढायला सुरुवात झाली. वन्यजीवप्रेमींच्या मते जिल्ह्यात सुमारे ३४ वाघ आहेत. तर वनखात्याच्या मते सुमारे २४ वाघ आहेत. एकट्या वडसा वनविभागातच २४ वाघ असल्याचे सांगितले जाते. तर गडचिरोली वनविभागात आठ वाघ असल्याचे सांगितले जाते.
वाघांचा वावर वाढण्यामागील कारण काय?
उत्तर गडचिरोलीच्या वनखात्याच्या दोन विभागात वाघाला आवश्यक असणारे जंगल आहे. तसेच तृणभक्षी प्राण्यांची संख्याही अधिक आहे. वाघांना त्यांचे खाद्य मिळाले की त्यांचा वावर वाढू लागतो. खाद्य आणि अधिवास मिळाल्यामुळे याठिकाणी वाघांची संख्या वाढली.
गडचिरोली जिल्ह्यातील वाघाची पार्श्वभूमी काय?
जिल्ह्यातील कोरचीपासून सिरोंचा तालुक्यातील पातागुडमपर्यंत ४०० किलोमीटर क्षेत्रात चपराळा हे अभयारण्य आहे. दोन दशकांपूर्वी या अभयारण्यात व्याघ्रदर्शन होत होते. जिल्ह्यातील जाणकार ज्येष्ठ नागरिकांच्या मते आष्टी-आलापल्ली मार्गावरही व्याघ्रदर्शन होत होते. मात्र, हळूहळू जिल्ह्यातून वाघांची संख्या कमी होत गेली. राज्यातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या या प्रदेशात २०१०पर्यंत केवळ दोन वाघांची नोंद होती.
मानव-वाघ संघर्षावर काय उपाय असू शकतात?
गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, धानोरा, एट्टापल्ली,भामरागड, मुलचेरा, अहेरी, सिरोंचा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आदिवासी समुदाय राहत असल्याने व त्यांचे नैसर्गिकरित्या वन्यजीवांशी असलेले समन्वय आणि याच तालुक्यांमध्ये वाघ, बिबटे आणि अन्य वन्यजीवांच्या वस्तीसाठी योग्य जंगल असल्याने या परिसरातील जंगलात बंदुकधारी पोलिसांचा रात्रंदिवस असलेला अतिरिक्त वावर थांबविण्यात यावा. तसेच कोरची आणि एट्टापल्ली तालुक्यातील १४ हजार ९५० हेक्टर जंगलावरील बेकायदा मंजूर आणि प्रस्तावित लोह खाणी ताबडतोब रद्द करण्यात याव्यात. जेणेकरून येथे वाघ, बिबट्यांना वावर (येथे पूर्वी अधिवास होतेच) करणे शक्य होईल.