मणिपूरमध्ये मैतेई व कुकी या समुदायांमध्ये उफाळलेल्या वांशिक हिंसाचारात आतापर्यंत शेकडो लोकांचे बळी गेले आहेत. मागील अनेक दिवसांपासून हा हिंसाचार रोखण्यासाठी लष्कर, स्थानिक पोलिस प्रयत्न करत आहेत; मात्र अद्याप या यंत्रणांना यश आलेले नाही. मणिपूरमधील हिंसाचारामुळे मोदी सरकारलाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे अकार्यक्षम आहेत आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. एकीकडे हिंसाचार सुरू असताना दुसरीकडे मणिपूरमधील मीरा पैबी ही महिला संघटना सध्या चांगलीच चर्चेत आहे. या महिला कोण आहेत? मणिपूरमध्ये या महिलांना का महत्त्व आहे? त्यांच्यावर लष्कराने काय आरोप केले आहेत? हे जाणून घेऊ या ….
मणिपूरमध्ये नेमके काय घडले? ‘मीरा पैबी’ महिलांवर काय आरोप?
मैतेई समाजाकडून मागील अनेक दिवसांपासून अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा, अशी मागणी केली जाते. या मागणीला घेऊन मैतेई समाजाने आतापर्यंत अनेक आंदोलने केली आहेत. मात्र, या समुदायाच्या मागणीविरोधात ३ मे रोजी पर्वतीय जिल्ह्यांमध्ये ‘आदिवासी एकता मोर्चा’ आयोजित करण्यात आला होता. तेव्हापासून मणिपूरमध्ये हिंसक चकमकी उसळत आहेत. मैतेई व कुकी समुदायांमध्ये सध्या वाद सुरू आहे. हा वाद शमवण्याचा लष्कराकडून प्रयत्न केला जातोय. मात्र, या मोहिमेत तेथील स्थानिक महिला अडथळा निर्माण करत आहेत, असा आरोप लष्कराने केला आहे. सोमवारी (२६ जून) लष्कराने याबाबतचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केला होता. मणिपूरमधील महिला कार्यकर्त्या जाणूनबुजून रस्ते ब्लॉक करत आहेत. सुरक्षा रक्षकांच्या मोहिमेत त्या अडथळा निर्माण करत आहेत, असा आरोप या व्हिडीओमध्ये करण्यात आला होता.
लष्कराच्या व्हिडीओमध्ये काय आहे?
लष्कराने पूर्व इंफाळ जिल्ह्यातील एक व्हिडीओ क्लिप समाजमाध्यमांवर प्रसारित केली आहे. व्हिडीओतील महिला दंगलखोरांना पळून जाण्यास मदत करत आहेत. या महिला त्यांच्या वाहनांत सशस्त्र दंगलखोरांना घेऊन जात आहेत. त्यासाठी रुग्णवाहिकांचाही वापर केला जात आहे, असा दावा लष्कराने केला आहे. या व्हिडीओमध्ये महिला रस्त्यावर आंदोलन करताना दिसत असून, त्या लष्करातील जवानांना विरोध करताना दिसत आहेत. महिलांच्या विरोधामुळे लष्कराला सामानाची ने-आण करण्यास अडचण येत आहे. ‘आसाम रायफल्स’च्या सैनिकांच्या जाण्या-येण्याच्या मार्गावर खड्डे खोदले जात आहेत. सुरक्षा रक्षकांना त्यांच्या कार्यादरम्यान विरोध करणे वा अडथळा आणणे हा कायद्याने गुन्हा आहे, असे या व्हिडीओमध्ये सांगण्यात आले आहे.
‘मीरा पैबी’ महिला कोण आहेत?
लष्कराने समाजमाध्यमावर शेअर केलेल्या व्हिडीओमधील महिला नेमक्या कोण आहेत? याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही. मात्र, मणिपूरमधील सामाजिक चळवळ आणि आंदोलनांमध्ये पहिल्यापासूनच महिलांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. मीरा पैबी हा या महिलांचा सर्वांत संघटित आणि सक्रिय गट आहे. या गटाला ‘मशालधारी महिला’ असेही म्हटले जाते. या महिला रात्रीच्या वेळी आंदोलनादरम्यान हातात मशाल घेऊन चालतात. त्यामुळेच त्यांना मशालधारी महिला, असे म्हटले जाते. मीरा पैबी या गटाच्या महिलांना इमास, मदर्स ऑफ मणिपूर (मणिपूरची आई) असेदेखील म्हटले जाते. या संघटनेतील बहुतांश महिला या मैतेई समाजाच्या असतात. या संघटनेतील महिलांकडे मणिपूरमध्ये खूप आदराने पाहिले जाते.
महिला विशेष प्रसंगातच एकत्र येतात
या महिलांचे मणिपूरमध्ये ठोस असे संघटन नाही. या गटातील वरिष्ठ महिलाच इतर महिलांचे नेतृत्व करतात. या गटात पदांचा क्रम किंवा अशी कोणतीही व्यवस्था नाही. विशेष म्हणजे मीरा पैबी संघनटेतील महिला विशिष्ट राजकीय विचाराकडे झुकलेल्या नसतात. या गटातील महिला विशेष प्रसंगातच एकत्र येतात; मात्र मणिपूरमध्ये या महिलांना विशेष स्थान आहे. याच कारणामुळे मणिपूर दौऱ्यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मीरा पैबी या संघटनेच्या प्रतिनिधी महिलांशी चर्चा केली.
‘मीरा पैबी’ मणिपूरमध्ये काय काम करते? त्यांची भूमिका काय आहे?
मीरा पैबी या संघटनेची १९७७ साली स्थापना झाली होती. ही चळवळ स्थानिक पातळीवरील चालवल्या जाणाऱ्या सर्वांत मोठ्या चळवळींपैकी एक आहे. सुरुवातीला या गटाने व्यसनमुक्ती, ड्रग्ज सेवनविरोधी मोहिमा राबवल्या. कालांतराने हा गट मानवी हक्क, सामाजिक विकास या क्षेत्रांतही काम करू लागला. काही दशकांनंतर मीरा पैबी गटाने मणिपूरमध्ये अनेक सामाजिक आणि राजकीय चळवळी राबवल्या. लष्कराकडून केल्या जाणाऱ्या कथित अत्याचाराविरोधातही या गटाने आवाज उठवलेला आहे. याच कारणामुळे मणिपूरमध्ये या गटाला मानाचे स्थान आहे.
आतापर्यंत या गटाने कोणकोणत्या मोहिमा राबवलेल्या आहेत?
मीरा पैबी गटाच्या महिलांना प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांचा पाठिंबा लाभलेला आहे. इरोम शर्मिला यांनी लष्कराकडून केल्या जाणाऱ्या कथित छळाविरोधात, तसेच लष्कराला कारवाईचे अधिकार देणाऱ्या एएफएसपीए कायद्याविरोधात २००० ते २०१६ अशा प्रदीर्घ काळासाठी उपोषण केले होते.
इनर लाईन परमिटच्या (आयएलपी) मागणीमुळे २०१५ साली मणिपूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. इनर लाइट परमिटच्या माध्यमातून बाहेरच्या लोकांना मणिपूरमध्ये येण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार होती. स्थानिक लोकांचे हित, संस्कृती, व्यावसायिक संधी यांचे रक्षण करण्यासाठी आयएलपीची अंमलबजावणी करावी, अशी मागणी मणिपूर राज्यातील लोकांकडून केली जात होती. या आंदोलनात मीरा पैबी गटाच्या महिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
साधारण दोन वर्षांनंतर भाजपाच्या आमदाराने एका महिलेशी लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, नंतर या आमदाराने त्या महिलेकडे पाठ फिरवली होती. या महिलेने न्यायासाठी मीरा पैबी गटाकडे धाव घेतली होती. त्यानंतर या संघनटेने थेट आमदाराच्या घरासमोर आंदोलन केले होते. तसेच थांगमेइबंद विधानसभा मतदारसंघात मोठा बंद पुकारला होता. या बंदमध्येही मीरा पैबी संघटनेतील महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता.
सध्या मणिपूरमध्ये अशांतता निर्माण झालेली असताना हा गट पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. येथील सशस्त्र दलाने इंफाळच्या पूर्वेस असलेल्या इथाम गावात कारवाई केली होती. या कारवाईत अनेक शस्त्रे, दारूगोळा, तसेच १३ ‘केवायकेएल’च्या कार्यकर्त्यांना पकडण्यात आले होते. मात्र, या लोकांची सुटका करावी, अशी मागणी महिला कार्यकर्त्यांनी केली होती. महिलांच्या दबावामुळे लष्काला १२ लोकांना सोडून द्यावे लागले होते.