म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या ईशान्य भारतात मणिपूर राज्यातील हिंसाचार ३ मे रोजी सुरू झाला. हा वाद कुकी विरुद्ध मैतेई असा आहे. कुकी आदिवासींना मिळणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय लाभांवरुन बहुसंख्य असलेल्या मैतेई या बिगर आदिवासी समाजाने केलेला विरोध, हे या संघर्षाचे स्वरूप आहे. या वांशिक संघर्षात आतापर्यंत ७० हून नागरिक मृत्युमुखी पडले आहेत, इतर शेकडो जखमी झाले आणि जवळपास ३५ हजार नागरिकांचे स्थलांतरण झाले आहे. या पलीकडे मानवतेला काळीमा फासणारी घटना म्हणजे स्त्रियांना विवस्त्र करून त्यांची धिंडदेखील काढण्यात आली. एकूणच संपूर्ण मणिपूर राज्याचे स्वरूप युद्धभूमीत बदलले आहे. याच पार्श्वभूमीवर कुकी आणि मैतेई हे समुदाय कोण आहेत जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

कुकी कोण आहेत?

कुकी हा ईशान्य भारतातील मणिपूर, मिझोराम, मेघालय, आसाम, त्रिपुरा आणि नागालँड या राज्यांमध्ये राहणारा वांशिक गट आहे. कुकी हा समाज भारतातील तसेच बांगलादेश आणि म्यानमार मधील अनेक डोंगराळ जमातींपैकी एक जमात आहे. ईशान्य भारतात अरुणाचल प्रदेश वगळता इतर सर्व राज्यांमध्ये ते स्थायिक झाले आहेत. कुकी हे मुख्यत: टेकड्यांवर राहतात, चुराचंदपूर हा त्यांचा मुख्य गड आहे तसेच मणिपूरच्या चंदेल, कांगपोकपी, तेंगनौपाल आणि सेनापती जिल्ह्यांमध्येही त्यांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. कुकी हा समाज वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. यामध्ये लुशाई, डार्लॉन्ग्स, रोखुम्स आणि चिन (बर्मा बोर्डरवर) इत्यादींचा समावेश होतो. ते स्वतःला हरे-ईमस म्हणायचे. असे असले तर ‘कुकी’ हे या समाजासाठी सामान्यनाव म्हणून स्वीकारले गेले आहे. असे मानले जाते की कुकी समाज हा मूळचा ‘मिझो हिल्स’ (पूर्वीचे लुशाई) येथील आहे. हा मिझोरामच्या दक्षिण-पूर्व भागातील एक पर्वतीय प्रदेश आहे. या व्यतिरिक्त, असा दावा केला जातो की ईशान्य भारतातील कुकी जमातींमध्ये २० पेक्षाही अधिक उप-जमाती आहेत.

accused in satish wagh murder case get police custody till december 20
Satish Wagh Murder: सतीश वाघ खून प्रकरणातील आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Satish Wagh Murder Case
Satish Wagh Murder Case : पूर्वीच्या भाडेकरूनेच दिली ५ लाखांची सुपारी; सतीश वाघ हत्या प्रकरणात पोलिसांकडून मोठा खुलासा
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी
mla satyajeet tambe writes letter to maharashtra cm devendra fadnavis for bangladesh hindu protection
बांगलादेश मधील हिंदूंचे रक्षण करा; आमदार सत्यजित तांबे यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
school girl and her brother molested by minors who threatened to kill her
जिवे मारण्याची धमकी देऊन शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य, अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल

अधिक वाचा : विश्लेषण: मेलुहा ते इंडिया भारताच्या विविध नावांचा प्रवास कसा झाला?

कुकींच्या धार्मिक परंपरा

कुकींमध्ये विविध धार्मिक परंपरा आहेत. ते ऐतिहासिकदृष्ट्या अ‍ॅनिमिझम संकल्पनेवर विश्वास ठेवतात. ते त्यांच्या देवांना संतुष्ट करण्यासाठी पशुबळी देतात, पूर्वजांची पूजा आणि सण यांसारखे विधी देखील यात समाविष्ट आहेत. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीस ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या प्रवेशाने अनेक कुकींनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला, विशेषत: प्रोटेस्टंट धर्मात त्यांनी प्रवेश केला. आज बहुतांशी कुकी हे मुख्यतः ख्रिश्चन धर्माचे पालन करतात. २०११ च्या जनगणनेनुसार मणिपूरमध्ये कुकींची लोकसंख्या आठ लाखांच्या आसपास आहे.

पूर्वी ते डोंगरमाथ्यावर राहत होते आणि झुम शेतीद्वारे तसेच वेगवेगळ्या फळांची उत्पादने घेऊन आपला उदरनिर्वाह चालवत असत. सध्या ते सपाट जमिनीवर मशागत आणि पाळीव पशुधन यांद्वारे उदरनिर्वाह चालवतात. भाषिकदृष्ट्या त्यांची बोलीभाषा ही तिबेटी वंशाच्या कुकी-चिन भाषिक कुटुंबाशी संबंधित आहे. कुकींची अनेक कुळे आणि उपकुळे आहेत. कुकींना संगीत आणि नृत्याची आवड आहे. ते झुम शेतात, बागेत कष्ट करतात आणि सामुदायिक नृत्य आणि संगीताचा आनंद घेतात. सामान्यत: ते त्यांच्या समाजाच्या बाहेर लग्न जुळवत नाहीत. त्यांचे स्वतःचे परंपरागत कायदे आणि ग्राम परिषद आहेत. लाल (LAL) हा शब्द त्यांच्यातील ग्रामप्रमुखपद दर्शविण्यासाठी आहे. गावप्रमुख सामान्यतः विवाह आणि घटस्फोट यासह सर्व प्रकारचे सामाजिक आणि धार्मिक विवाद पाहतो. सध्या कुकी हे इतर जमातींच्या तुलनेत सामाजिक व आर्थिकदृष्ट्या प्रगत आहेत.

“कुकीलॅण्ड” ची मागणी

कुकी आणि मैतेई यांच्यातील तणावग्रस्त परिस्थितीमुळे राज्याच्या १० कुकी-झोमी आमदारांनी “संविधानाखाली स्वतंत्र प्रशासन” अशी मागणी केली, “आमचे लोक यापुढे मणिपूर अंतर्गत अस्तित्वात राहू शकत नाहीत… [आणि] मैतेई सोबत जगणे … पुन्हा मृत्यूसारखेच आहे”… असा आरोप करण्यात आला आहे. “कुकिलॅण्ड” ची मागणी १९८० च्या उत्तरार्धापासून करण्यात येत आहे, किंबहुना २०१२ मध्ये, ज्या वेळेस वेगळ्या तेलंगणा राज्याची मागणी मान्यतेच्या प्रक्रियेत होती, त्या वेळेस कुकी राज्य मागणी समिती (KSDC) नावाच्या संघटनेने कुकीलॅण्डसाठी आंदोलनाची घोषणा केली होती. केएसडीसीने यापूर्वीही स्वतंत्र कुकीलॅण्ड मागणीसाठी अधूनमधून संप आणि आर्थिक बंद पुकारले होते, महामार्ग रोखले होते आणि व्यापारी माल मणिपूरमध्ये येण्यापासून अटकाव केला होता. मणिपूरच्या २२,००० चौरस किमी क्षेत्रफळाच्या ६०% पेक्षा जास्त जागेची, “कुकी आणि कुकीलॅण्ड” साठी KSDC ने मागणी केली आहे. “कुकीलँड” च्या संकल्पनेत कुकी-बहुल चुराचंदपूर जिल्हा, कुकी आणि नागा लोकसंख्येचे मिश्रण असलेले चंदेल आणि अगदी नागाबहुल तामेंगलाँग आणि उखरुलचे काही भाग समाविष्ट आहेत.

मैतेई कोण आहेत?

मैतेई , ज्याला मिताई किंवा मैथियीदेखील म्हणतात, किंबहुना त्यांना मणिपुरीदेखील म्हटले जाते. मैतेई हा ईशान्य भारतातील मणिपूर राज्यातील प्रबळ वांशिक गट आहे. मैतेई मुख्यतः आजच्या मणिपूरच्या इम्फाळ खोऱ्यात राहतात, त्या शिवाय मोठ्या प्रमाणात आसाम, त्रिपुरा, नागालँड, मेघालय आणि मिझोराम या इतर भारतीय राज्यांमध्ये स्थायिक झालेले आहेत. भारतीय जनगणनेच्या २०११ च्या अहवालानुसार मणिपूरच्या लोकसंख्येच्या सुमारे ५३ टक्के लोकसंख्या मैतेई वंशीय गटाची आहेत. मैतेई समाज मेइटी भाषा बोली म्हणून वापरतात, ही भाषा मणिपुरी भाषा म्हणूनही ओळखली जाते आणि ही भाषा भाषाशास्त्रानुसार तिबेटो-बर्मन भाषेच्या उप-कुटुंबात येते. भारताच्या मान्यताप्राप्त अधिकृत भाषांपैकी एक म्हणून ती १९९२ साली भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.

अधिक वाचा : पाकिस्तानची सीमा (हैदर) प्रेमाची; तर मग भारताच्या सीमेचं काय? आणि त्यांच्या ‘त्यागा’चं काय?

मैतेई समाजाच्या धार्मिक परंपरा

२०११ च्या जनगणनेनुसार, मैतेई समाज फक्त दोन धर्मांचे मोठ्या प्रमाणात पालन करतात, बहुतेक मैतेई हिंदू धर्माचे पालन करतात. सुमारे १६ टक्के मैतेई पारंपारिकपणे ‘सनमाही’ देवाच्या नावावर असलेल्या सनमाही धर्मावर विश्वास ठेवतात. सुमारे ८ टक्के मैतेई इस्लामचे पालन करतात. हिंदू रीतिरिवाजांचे पालन करणारे मैतेई आसपासच्या डोंगरी जमातींपासून सांस्कृतिकदृष्ट्या भिन्न आहेत. हिंदू धर्म स्वीकारण्यापूर्वी त्यांनी मांस खाणे, गुरेढोरे बळी देणे आणि शिकार करणे सामान्य होते, परंतु आता ते मांस वर्ज्य मानतात (पण मासे खातात), मद्यपान करत नाहीत, गाईचा आदर करतात. कृष्णाच्या विशेष भक्तीसह हिंदू देवतांच्या पूजा करता परंतु पारंपारिकरित्या चालत आलेल्या देवतांच्या आणि आत्म्यांच्या उपासनेला मात्र ते विसरलेले नाहीत. बागायती शेती, भातशेती हा त्यांच्या अर्थव्यवस्थेचा आधार आहे. ते उत्सुक घोडेपालक आहेत आणि पोलो हा त्यांना सर्वात आवडता खेळ आहे. फील्ड हॉकी, बोटींच्या शर्यती, नाटय़प्रदर्शन आणि मणिपुरी शैलीतील नृत्य हे त्यांचे वैशिष्ट्य मानले जाते.

गेल्या काही दिवसांत मात्र हे दोन्ही समाज एकमेकांच्या विरोधात मणिपूरमध्ये उभे ठाकले असून त्यामुळे युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे महिलांची विवस्त्र धिंड काढणे यासारखे मानवतेला काळीमा फासणारे प्रकारही याचाच भाग झाले आहेत, हे दुर्दैवाचेच.

Story img Loader