प्रशांत केणी

करोना साथीतून सावरत क्रिकेट आता स्थिरस्थावर होत असताना ‘एमसीसी’ म्हणजेच मेरिलिबोन क्रिकेट क्लबने आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमांमध्ये नव्या बदलांची घोषणा केली आहे. ‘मंकडिंग’ला धावचीत निर्णयाचे अधिष्ठान, चेंडूची लकाकी वाढवण्यासाठी लाळेच्या वापरास पूर्णत: बंदी आदी अनेक बदल १ ऑक्टोबरपासून अमलात येणार आहेत. म्हणजेच ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नव्या नियमांनिशी खेळाडूंचा कस लागणार आहे. काय आहेत नवे नियम ते समजून घेऊया…

‘मंकडिंग’च्या नियमात कोणता बदल झाला? त्यामुळे त्याविषयीच्या दृष्टिकोनात बदल होईल?

गोलंदाजाने चेंडू टाकताना नॉन-स्ट्रायकर फलंदाजाने क्रीझ सोडली असताना गोलंदाजाने धावचीत करणे, याला ‘मंकडिंग’ म्हटले जायचे. आधी खेळभावनेविरोधातील कलम क्रमांक ४१.१६ अशा स्वरूपातील या नियमाचे कलम क्रमांक ३८मध्ये धावचीत असे नियमन केले गेले आहे. क्रिकेटमध्ये इतिहासात १९४८मध्ये ‘मंकडिंग’नुसार प्रथम धावचीत केल्याची नोंद आढळते. भारताचे माजी क्रिकेटपटू विनू मंकड यांनी ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक-फलंदाज बिल ब्राऊन यांना, त्यांनी नॉन-स्ट्रायकरला क्रीझ सोडली असताना या पद्धतीने धावचीत केले होते. मंकड यांनी ब्राऊन याला आधी अनेकदा ताकीदसुद्धा दिली होती. ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांनी या प्रकाराला ‘मंकडिंग’ असेच नाव दिले. या पद्धतीने बाद करणे हे खेळभावनेच्या विरोधातील असे मानले गेल्याने सुनील गावस्कर यांनी त्याला विरोध दर्शवला होता. त्यानंतर कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रत्येकी चार, तर ट्वेन्टी-२० आणि महिला क्रिकेटमध्ये एकेक ‘मंकडिंग’च्या घटना घडल्या होत्या. २०१९च्या ‘आयपीएल’मध्ये फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने जॉस बटलरला ‘मंकडिंग’ पद्धतीने बाद केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यामुळे या नियमाची बाजू घेणारे आणि विरोधक अस्तित्वात आहेतच. परंतु ‘एमसीसी’ने ‘मंकडिंग’ला धावचीत ठरवल्याने आता अशा रीतीने बाद करणे हे येथून पुढे तरी खेळभावनेविरोधी नसेल.

चेंडूला लाळेला वापर हा ‘एमसीसी’च्या नियमानुसार का निषिद्ध असेल?

नव्या कलम क्रमांक ४१.३ नुसार लाळेच्या वापरास बंदी घालण्यात आली आहे. चेंडूला लकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर हा खेळभावनेविरोधी असल्याचे ‘एमसीसी’ने नमूद केले आहे. करोना साथीच्या कालखंडात लाळेच्या वापरास ‘आयसीसी’ने तात्पुरती बंदी आधीच लागू केलेली होती. मात्र लाळेच्या वापरामुळे चेंडूवर कोणताही परिणाम म्हणजे तो स्विंग होत नसल्याचे संशोधकांना आढळून आले आहे, असा दावा ‘एमसीसी’ने केला आहे. करोनामुळे लाळेच्या वापरास बंदी घातल्याने खेळाडू घामाचा वापर चेंडूला लकाकी आणण्यासाठी करत होते आणि ते प्रभावी होते. लाळ किंवा अन्य कोणत्याही पद्धतीने चेंडूच्या आकारमानात बदल करण्याचा प्रयत्न हा निषिद्ध मानला जाईल.

चेंडू झेलबाद झाल्यावर मैदानावर येणाऱ्या नव्या फलंदाजासाठी कोणता नियम करण्यात आला आहे?

कलम क्रमांक १८नुसार फलंदाज झेलबाद झाल्यास नवा फलंदाज स्ट्राइकला म्हणजेच फलंदाजीला येईल. बाद झालेला खेळाडू नॉन-स्ट्राइकला म्हणजेच समोरच्या बाजूला पोहोचला असेल तरी नवा फलंदाज हाच फलंदाजी करील. तो षटकातील अखेरचा चेंडू असल्यास मात्र स्ट्राइक बदलला जाईल. आतापर्यंत एखादा फलंदाज झेलबाद होण्याआधी धाव घेताना त्याने समोरील फलंदाजाला मागे टाकले असेल तर नवा फलंदाज स्ट्राइकरऐवजी नॉन-स्ट्राइकर एंडला येत असे. गतवर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या ‘द हंड्रेड’ क्रिकेट स्पर्धेत हा नियम लागू केला होता.

सामन्यात व्यत्यय आल्यास कोणता नियम लागू होईल?

कलम क्रमांक २०.४.२.१२ हा नियम सामन्यातील व्यत्ययामुळे चेंडू ‘डेड बॉल’ ठरवतो. सामना सुरू असताना व्यक्ती, प्राणी किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव एखाद्या संघाचे नुकसान टाळण्याच्या हेतूने तो चेंडू पंचांना ‘डेड बॉल’ ठरवता येईल. मैदानावर हौशी प्रेक्षक किंवा कुत्र्याच्या घुसखोरीमुळे सामन्यात व्यत्यय आल्यास तो चेंडू ‘डेड बॉल’ ठरेल.

आणखी कोणते नवे नियम लागू करण्यात येणार आहेत?

  • जर एखाद्या गोलंदाजाने समोरील फलंदाजाला धावचीत करण्याच्या प्रयत्नात चेंडू टाकला तर तो आता ‘डेड बॉल’ असेल. क्रिकेटमध्ये क्वचितच घडणाऱ्या या कृतीला आतापर्यंत ‘नो बॉल’ म्हटले जायचे.
  • जर गोलंदाजाने टाकलेला चेंडू खेळपट्टीपासून दूर गेला असेल, तर नवीन नियम फलंदाजाला चेंडू खेळण्याची मुभा देतो. जोपर्यंत त्याच्या बॅटचा काही भाग किंवा व्यक्ती खेळपट्टीमध्ये राहते. त्यांनी त्यापलीकडे पाऊल टाकले तर, पंच ‘डेड बॉल’ हा निर्णय देतील. फलंदाजाची भरपाई म्हणून, कोणताही चेंडू जो त्यांना खेळपट्टी सोडण्यास भाग पाडेल, त्याला ’नो बॉल’देखील म्हटले जाईल.
  • आतापर्यंत कोणत्याही क्षेत्ररक्षकाला अयोग्यरीत्या हलवल्यास फक्त तो चेंडू ‘डेड बॉल’ ठरवला जात होता. हे कृत्य अयोग्य आणि जाणीवपूर्वक असल्याने आता फलंदाजी करणाऱ्या संघाला ५ अतिरिक्त धावा दिल्या जातील.

Story img Loader