वांद्रे इथल्या शाहरूखच्या मन्नत बंगल्याची नोंद ऐतिहासिक वारशात केली जाते. बॅण्ड स्टॅण्ड परिसरात अनेक ऐतिहासिक वारसा असलेल्या मालमत्तेची जागा आता आधुनिक इमारतींनी घेतली आहे. केवळ ‘मन्नत’च नाही तर वांद्र्यात अशी अनेक जुनी बांधकामं आहेत, जी ऐतिहासिक वारसा म्हणून पाहिली जातात. त्यानिमित्ताने आपण वांद्र्याच्या इतिहासावर आणि त्याच्या सतत बदलणाऱ्या वर्तमानावर एक नजर टाकूया…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अभिनेता शाहरुख खान आणि त्याचे कुटुंब वांद्रे येथील पाली हिल परिसरातील एका तात्पुरत्या निवासस्थानी स्थलांतरित होत आहेत. कारण- त्यांच्या मन्नत बंगल्याच्या नूतनीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. मन्नत बंगला श्रेणी-२-ब मधील वारसा मालमत्ता आहे. शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांनी मन्नत अॅनेक्समध्ये आणखी दोन मजले वाढविण्याचे ठरवले आहे. त्यामुळे इमारतीची जागा ६१६.०२ चौरस मीटरनी वाढणार आहे. तेव्हा या बंगल्याचे नूतनीकरण झाल्यावर तो कसा दिसेल याबाबत तर सर्वांना उत्सुकता आहेच. पण त्या निमित्ताने मन्नत म्हणजे ‘व्हिला व्हिएन्ना’ याच्या इतिहासाबाबत जाणून घेऊ.
‘व्हिला व्हिएन्ना‘
इंटरनेटवर मन्नतच्या इतिहासाबाबत अनेक कथा आहेत. त्यावर मुंबईतील देबाशीष चक्रवर्ती यांनी या जागेविषयी अधिक माहिती घेत वांद्रे टाइम्स या वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या ‘मॅन्शन बाय द सी : द हिस्ट्री ऑफ व्हिला व्हिएन्ना’ या लेखात अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे.
चक्रवर्ती यांनी यावर स्पष्टीकरण देत मन्नतबाबत जी काही माहिती आहे ती मौखिक परंपरेतून मिळाली आहे. चक्रवर्ती यांनी सांगितले, “ही व्हिला १८०० सालाच्या उत्तरार्धात मंडीचे (सध्याचे हिमाचल प्रदेशातील पूर्वीच्या काळातले संस्थान) राजा बिजई सेन यांनी त्यांच्या एका राणीसाठी बांधली होती.”
राजा बिजई सेन यांच्या मृत्यूनंतर १९१५मध्ये संस्थानाने हा वाडा गिरगावच्या पेरिन मानेकजी बाटलीवाला यांना विकला. बाटलीवाला यांना व्हिएनीज संगीताची आवड होती, तेव्हा त्यांनी नव्याने घेतलेल्या वाड्याला व्हिला व्हिएन्ना, असे नाव दिले अशी माहिती चक्रवर्ती यांनी दिली. इथले काही जुने लोक अजूनही याला व्हिएन्ना म्हणण्यासच प्राधान्य देतात.
बाटलीवाला यांनी पुढे ते घर त्यांची बहीण खुर्शेदबाई संजना आणि त्यांच्या पतीला विकले. खुर्शेदबाईंना स्वत:चे मूल नसल्याने त्यांनी ही मालमत्ता त्यांची बहीण गुलबानूला दिली. त्यांच्यानंतर ही मालमत्ता गुलबानू यांचा मुलगा नरिमन दुबाश यांच्याकडे आली.
“९० च्या शतकात या व्हिलाचे वेगात हस्तांतरण होत गेले. नरिमन दुबाश यांनी ही व्हिला एका बांधकाम व्यावसायिकाला विकली. त्यानंतर व्यापारी आणि सिनेनिर्माता भरत शाह यांनी ती मालमत्ता विकत घेतली. १९९० च्या उत्तरार्धात ही वास्तू अगदी मोडकळीस आली होती. अखेर ती सध्याचे मालक व रहिवासी शाहरुख याने विकत घेतली”, असे चक्रवर्ती म्हणाले.
इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना चक्रवर्ती यांनी सांगितले, “त्यांच्या लेखासाठी ही माहिती मिळवण्याकरिता त्यांनी वांद्रे इथल्या रहिवाशांशी बराच वेळा संवाद साधला, तसेच ‘बांद्रा : इट्स रिलिजियस अँड सेक्युलर हिस्ट्री’ या पुस्तकाचाही आधार घेतला.
प्रसिद्ध इतिहासकार ब्राझ अँथनी फर्नांडिस यांनी लिहिलेले हे पुस्तक १९२७ मध्ये प्रकाशित झाले होते. हे पुस्तक म्हणजे वांद्र्याच्या इतिहासाचा सर्वात मौल्यवान खजिना आहे. आता मात्र हे पुस्तक उपलब्ध नाहीये. सुदैवाने वांद्रे इथल्या एका कुटुंबाकडे या पुस्तकाची एक प्रत होती आणि त्यांनी ती मला देत सहकार्य केले, असे चक्रवर्ती यांनी सांगितले.
या व्हिलाच्या वास्तुकलेविषयी बोलताना चक्रवर्ती यांनी सांगितले, “१५९० मध्ये उत्तर इटलीतील विसेन्झा शहराबाहेर बांधलेल्या रोटोंडा व्हिलाच्या निओ-क्लासिक रचनेवर आधारित व्हिएन्नाचे बांधकाम करण्यात आले. निओ-क्लासिक म्हणजे ज्या बांधकामातून प्राचीन जीवनशैली पुनरुज्जीवित झाल्याचे दिसून येते. प्रसिद्ध इटालियन वास्तुविशारद आंद्रिया पॅलाडिओ यांनी या व्हिलाची रचना केली होती.” चक्रवर्ती यांनी असेही सांगितले की, आता या व्हिलाची रचना, बांधकाम व त्याचा काळ हे नेमकं ओळखणं थोडं अवघड आहे.
देव आनंद यांच्या ‘टॅक्सी ड्रायव्हर’, शाहरुख खानच्या ‘येस बॉस’ तसंच माधुरीच्या “तेजाब’ यासारख्या अनेक सिनेमांत ही व्हिला दिसली आहे.
वांद्रे बॅण्ड स्टॅण्डचा इतिहास
सेंट अँड्र्यूज चर्च ते लँड्स एण्डपर्यंत अरबी समुद्राच्या समांतर सुमारे दोन किमी असलेल्या बॅण्ड स्टॅण्ड परिसरात मन्नत बंगला आहे. या रस्त्याचे १९ व्या शतकात सर बायरामजी जीजीभाय हे अधिकृत नाव होते.
“जीजीभाय यांनी त्या काळी स्वत:च्या खर्चाने वांद्रे बॅण्ड स्टॅण्डचे बांधकाम केले होते. तेव्हाच्या बायरामजी जीजीभाय रोडला आता आपण वांद्रे बॅण्ड स्टॅण्ड म्हणून ओळखतो”, अशी माहिती मुंबई विद्यापीठातील इतिहासाचे निवृत्त प्राध्यापक अरविंद गणाचार्य यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली. त्याबाबत आणखी माहिती देत ते म्हणाले, “एकेकाळी या भागात युरोपियन आणि पारसी लोकांचे बंगले होते. युरोपियन लोकांना बँडसंस्कृतीत विशेष रस होता. म्हणूनच संध्याकाळच्या वेळी युरोपियन सैनिक आणि वांद्रे गावातील लोक या भागात नियमितपणे संगीतात रमलेले दिसत. अशा प्रकारे या रस्त्याला ‘बॅण्ड स्टॅण्ड’ हे नाव मिळाले”.
वांद्रे बॅण्ड स्टॅण्ड इथल्या इतर ऐतिहासिक मालमत्ता
केवळ मन्नतच नाही, तर या परिसरातील एच. के. भाभा रोडवरही बऱ्याच अशा ऐतिहासिक वास्तू आहेत. ७० च्या उत्तरार्धापर्यंत आणि ८०च्या सुरुवातीपर्यंत या भागात अनेक बंगले होते, जे झपाट्याने होणाऱ्या विकासकामांमध्ये हरवून गेले. त्यावेळी लोक त्यांना बंगले नाही, तर व्हिला किंवा हवेली, असे म्हणत होते. त्या भव्य बंगल्यांपैकी एक म्हणजे बाई शिरीनबाई कामा कॉन्व्हॅलेसेंट होम. त्या बंगल्याची एक सुंदर एडवर्डियन रचना होती. ही रचना १२० वर्षांहून अधिक जुनी होती. एप्रिल २०२२ मध्ये लॉकडाऊननंतर ती लगेचच पाडण्यात आली. माउंट मेरी रोडला टेकडीवर गोडीवाला बंगला होता, ज्या जागी आता रहेजा बे नावाची इमारत आहे.
“बी. जे. रोडवरील मरीन मॅन्शनच्या जागी त्याच नावाने एक इमारत उभारली गेली. एच. के. भाभा रोडवर अभिनेता अनिल कपूरच्या मेव्हणीच्या पतीचा रॉकडेल नावाचा खासगी बंगला होता. त्या ठिकाणी रॉकडेल नावानेच एक इमारत बांधली गेली आहे. ‘वुडले’ हे सी-किस्ड आणि सी-ग्लिम्प्स इमारतींचे एच. के. भाभा रोडवरील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. याच रस्त्यावरील मेरी लॉजच्या ठिकाणीही बसेरा नावाचे रो हाऊस बांधण्यात आले. तसंच बी. जे. रोड आणि केन रोडच्या कोपऱ्यावर असलेल्या डेप्युटी बंगल्याच्या ठिकाणी ‘बर्केट’ नावाची इमारत बांधण्यात आली आहे”, अशी माहिती चक्रवर्ती यांनी दिली.
मुंबईतल्या मोक्याच्या ठिकाणच्या बऱ्याच जुन्या वास्तू आता जमीनदोस्त करून, त्यावर मोठमोठाले टॉवर उभारले जात आहेत. हा ऐतिहासिक वारसा नष्ट होत चालल्याबाबत विचारले असता चक्रवर्ती यांनी सांगितले, “त्यामध्ये मी कोणालाही दोष देणार नाही. हा बदल होण्यामागे तीन महत्त्वाची कारणं आहेत. पहिलं म्हणजे ही सर्व जुनी घरं एकत्र कुटुंबांची मालमत्ता आहेत. दुसरं हे की, अशा घरांची देखभाल करणं खूपच खर्चीक आहे. तिसरं म्हणजे एखादा बांधकाम व्यावसायिक जर तुम्हाला त्या जागेचे १०० किंवा २०० कोटी देत असेल, तर कोणीही ते घेईलच.”