– निशांत सरवणकर
वादग्रस्त बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर बारमालकांकडून १०० कोटींची खंडणीवसूल करण्यास सांगितल्याचा आरोप करून खळबळ माजवून दिली होती. या प्रकरणात दाखल झालेल्या खटल्यात वाझे माफीचा साक्षीदार झाला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन व मनसुख हिरेन हत्याप्रकरणात अटकेत असलेला बडतर्फ पोलीस निरीक्षक सुनील माने याने आता माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला आहे. या प्रकरणात वाझे याच्यासह चमकमफेम अधिकारी प्रदीप शर्मा आदी आरोपी आहेत. माने याचा अर्ज मंजूर झाला तर त्याला दिलासा मिळणार असला तरी ही साक्ष इतर आरोपींना शिक्षा देण्यात फायदेशीर ठरणार का, हे पाहणे उद्बोधक ठरेल.
अँटिलिया स्फोटक प्रकरण काय होते?
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ गाडीत २५ फेब्रुवारी २०२१ रोजी स्फोटके (जिलेटिनच्या २० कांड्या) सापडली. अंबानी कुटुंबियांना ठार मारण्याचा ‘जैश-उल-हिंद’ या दहशतवादी संघटनेचा डाव असल्याचे तेव्हा भासविण्यात आले. धमकीचा फोन तिहार कारागृहातून करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी उघड केले. मात्र या प्रकरणात सायबर तज्ज्ञाला खोटा अहवाल देण्यासाठी पाच लाख रुपये देण्यात आल्याची बाब साक्षीदरम्यान पुढे आली.
हा सर्व बनाव असल्याचे उघड झाले. या प्रकरणात वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ गाडी ज्यांच्या नावावर होती त्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर हे स्फोटक प्रकरण मुंबई पोलिसांच्या चांगलेच अंगाशी आले. अँटिलिया स्फोटके तसेच मनसुख हिरेनप्रकरणात सुरुवातीला राज्याचा दहशतवादविरोधी विभाग व अखेरीस राष्ट्रीय यंत्रणेने तपास सुरू करीत वाझे, शर्मा, माने यांच्यासह दहाजणांना अटक केली.
या प्रकरणाशी मनसुख हिरेन यांचा संबंध काय?
स्फोटके ठेवण्यासाठी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ गाडी मनसुख हिरेन यांच्या नावावर होती आणि हे प्रकरण घडल्यानंतर हिरेन यांचा मृतदेह कळवा येथील खाडीत आढळला होता. हिरेन आणि वाझे यांची चांगली ओळख होती. मुंबई पोलीस दलात आपली दहशत निर्माण करण्यासाठी वाझे याने थेट अँटिलिया स्फोटके प्रकरणाचा वापर केला. अशा प्रकारचे गुन्हे आपण उघड करू शकतो, असे वाझे याला भासवायचे होते. अँटिलिया स्फोटके प्रकरणाचा सुरुवातीला तपास अधिकारीही तोच होता. या प्रकरणी जबाबदारी स्वीकारण्यास वाझे याने हिरेन यांना सांगितले होते. पंरतु त्यांनी त्यास साफ नकार दिला होता. त्यामुळेच वाझे यानेच हिरेन यांचा काढला असा आरोप आहे.
सुनील मानेचा संबंध काय?
अँटिलिया प्रकरण घडले तेव्हा सुनील माने गुन्हे अन्वेषण विभागाच्या मरोळ युनिटचे प्रमुख होते. वाझे याच्याशी माने याची खास दोस्ती होती. त्यासाठी ते सतत पोलीस आयुक्तालयात येत असत. अँटिलिया प्रकरणाचे बिंग मनसुख हिरेन यांच्यामुळे फुटेल, असे वाटूलागताच वाझे याने हिरेन यांचा काटा काढण्याचे ठरविले. त्यासाठी माने याने मदत केली, असा प्रमुख आरोप आहे. ज्या आरोपींनी हिरेन याचा काटा काढला त्याच्याकडे हिरेनला माने याने सोपविले, असा आरोप आहे. या प्रकरणी तपास करणाऱ्या दहशतवादविरोधी पथकाने सीसीटीव्ही फुटेजही हस्तगत केले होते. हा तपास हाती घेणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणी सुरुवातीला वाझे यालाअटक केली. त्यानंतर माने व त्यापाठोपाठ प्रदीप शर्मा तसेच इतरांना अटक केली.
माने माफीचा साक्षीदार होऊ शकतो?
सुनील माने याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने ॲंटिलिया तसेच मनसुख हिरेन प्रकरणात आरोपी केले आहे. अशा वेळी माने याने माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला आहे. या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेला त्याचे म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयाने ८ मार्चपर्यंत वेळ दिला आहे. माने सध्या तळोजा तुरुंगात आहे. गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीला ‘माफीचा साक्षीदार’ होता येते, त्यानुसार माने यास ते लागू होते.
या प्रकरणातील संपूर्ण माहिती व त्यामागे कोण आहे, कोणाच्या आदेशावरून हे घडले याची आपल्याला कल्पना असून आपल्याला विनाकारण गोवण्यात आले आहे, असे माने याचे म्हणणे आहे. इतकेच नव्हे तर अँटिलिया इमारतीबाहेर स्फोटके ठेवण्याचे आदेश कुणी दिले याचीही आपल्याला कल्पना असल्याचे माने याने सांगितले आहे. त्यामुळे यावर राष्ट्रीय तपास यंत्रणेचे म्हणणे काय आहे हे जाणून घेतल्यानंतर माने याला माफीचा साक्षीदार म्हणून मान्यता द्यायची किंवा नाही याचा निर्णय विशेष न्यायालयावर अवलंबून आहे.
मानेच्या साक्षीला आक्षेप घेतला जाईल?
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणात माफीचा साक्षीदार झालेल्या सचिन वाझे याच्या साक्षीबाबत उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला होता. या साक्षीची गुणवत्ता खटल्याच्या वेळी तपासून घ्यावी, असेही म्हटले होते. माने याच्या साक्षीबाबत तसे होणार नाही हे स्पष्टपणे सांगता येत नाही. आतापर्यंतची आपली कारकीर्द खूप चांगली असल्याचा माने याचा दावा आहे. पण तेवढेच पुरेसे नसते. उलटत पासणीत असे साक्षीदार किती टिकतात यावर खटल्याचे भवितव्य अवलंबून असते.
हेही वाचा : “ज्याने अँटिलियासमोर स्फोटकं ठेवली त्यांच्याकडून उद्धव ठाकरे…”, अतुल भातखळकरांचे गंभीर आरोप
खटल्यासाठी फायदेशीर?
अँटिलिया स्फोटके तसेच मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास नीट झालेला नाही, याबाबत उच्च न्यायालयानेच नाराजी व्यक्त केली आहे. अशा वेळी नेमके काय घडले आहे हे त्या प्रकरणातील आरोपीनेच विशद करणे हे कुठल्याही तपास यंत्रणेला हवे असते. आतापर्यंतच्या तपासावरून माने हे या प्रकरणातील महत्त्वाचे आरोपी असल्याचे दिसून येते. माफीचा साक्षीदार झाल्यानंतर भविष्यात आपली तुरुंगातून सुटका होण्याच्या आशेने माने वस्तुस्थिती निश्चितच विशद करेल. फौजदारी प्रक्रिया संहिता १६४ अन्वये दिलेली साक्ष माने याने बदलली तरी काहीही फायदा होणार नाही. मात्र या साक्षीसोबत परिस्थितीजन्य तसेच न्यायवैद्यक पुराव्याच्या आधारे दोषसिद्धी करणे सोपे जाईल.
nishant.sarvankar@expressindia.com