तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा अनेक वेळा वादाच्या केंद्रस्थानी असतात. पश्चिम बंगालमधील कृष्णनगर या मतदारसंघाचे त्या लोकसभेत प्रतिनिधित्व करतात. हजरजबाबीपणा, सफाईदार इंग्रजी तसेच सडेतोड उत्तरे ही ४९ वर्षीय महुआंची वैशिष्ट्ये. मात्र संसदेत प्रश्न विचारण्यासाठी स्वत:चे खाते अन्य व्यक्तीला वापरण्यास दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तसेच या मोबदल्यात काही महागड्या भेटवस्तू घेतल्याचीही तक्रार आहे. अर्थात महुआंनी संसदेच्या खात्याचा गोपनीय क्रमांक अन्य व्यक्तीला दिल्याचे मान्य केले असून, पैसे किंवा भेटवस्तू घेतल्याचे नाकारलेय. मात्र यातून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असा उभा संघर्ष पुन्हा पेटलाय. यात महुआ याच केंद्रस्थानी आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बँकर ते राजकारणी…

आसाममध्ये जन्मलेल्या महुआंनी अमेरिकेत उच्च शिक्षण घेतल्यानंतर काही काळ परदेशात वित्त संस्थांमध्ये उच्चपदस्थ म्हणून काम केले. युवक काँग्रेसमधून २००९ मध्ये त्यांनी राजकारणात पदार्पण केले. मात्र पुढे वर्षभरातच त्यांनी तृणमूल काँग्रेसची वाट धरली. नादिया जिल्ह्यातील करिमपूर मतदारसंघातून त्या विधानसभेवर गेल्या. तेथून राजकारणातील त्यांची वाटचाल वेगाने झाली. पक्ष नेतृत्वाचा विश्वास संपादन केल्याने लगोलग लोकसभेची उमेदवारी त्यांना मिळाली. महुआंनी विजय खेचून आणत, संसदेत सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली. मग पक्षाने त्यांच्यावर गोवा प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली. त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांच्याशी त्यांचा वाद झडला. तृणमूल काँग्रेसने २०२२ मध्ये विधानसभा निवडणुकीत गोव्यात उमेदवार दिल्याने काँग्रेसमधून संतप्त प्रतिक्रिया उमटली. भाजपविरोधी मतांमध्ये फूट पाडण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप पक्षाने केला. तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालच्या बाहेर विस्तार करण्यासाठी गोव्यात ताकद लावली होती. राज्याबाहेर पक्षविस्ताराचा त्यांचा हा पहिलाच प्रयत्न, त्यात महुआंकडे पक्षाने ही जबाबदारी दिली होती. मात्र काँग्रेसमधील काही नेते फोडूनही गोवेकरांनी तृणमूलला प्रतिसाद दिला नाही. यात भाजपचा लाभ झाला. त्यामुळे गोवा मोहिमेवर महुआंना अपेक्षित कामगिरी करता आली नाही.

हेही वाचा – ‘आम्हाला ‘माय लॉर्ड’ म्हणू नका,’ सर्वोच्च न्यायालयाची भूमिका, पण ‘माय लॉर्ड’वरून वाद का होतो? जाणून घ्या…

महुआ अन् वाद…

केवळ विरोधकांशीच नव्हे तर, स्वपक्षीयांशी महुआंचा वाद झाला. एकदा पक्षाच्या कार्यक्रमात तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी महुआंना ताकीद दिल्याची चित्रफीत सर्वदूर झाली होती. अल्पावधीत महुआंना राजकारणात मोठा पल्ला गाठण्याची महत्त्वाकांक्षा असल्याचा आरोप त्यांच्या काही निकटवर्तीयांनी केला. आर्थिक विषयाची नेमकी जाण, त्याला उत्तम संभाषणाची जोड याच्या जोरावर त्यांनी लोकसभेत प्रभाव पाडला. भाजप व काँग्रेसपाठोपाठ तृणमूलचे लोकसभेत सदस्य आहेत. त्यामुळे त्यांना संधीही मिळत गेली. अनेक वेळा भाजपचे आपणच खरे विरोधक आहोत हे दाखवताना तृणमूल काँग्रेसचे संसद सदस्य आक्रमक होत असल्याचे चित्र गेल्या चार वर्षांत दिसले. यात अर्थातच महुआ सरकारविरोधात दोन हात करताना पुढे दिसल्या. यातून काही वेळा व्यक्तिगत टिप्पणी होत गेली. मग हा विरोध वैयक्तिक होत गेला. यातून मग महुआ आणि वाद हे चित्र पुढे आले. महुआंना यातून सरकारच्या कडव्या विरोधक हे बिरूद मिळाले. त्यांच्या व्यक्तिगत जीवनाबाबतही चर्चा झाली. यात माध्यमातील एका गटाने त्यांना उचलून धरले तर काहींनी विरोधाची भूमिका घेतली. समाजमाध्यमावर सतत सक्रिय असणाऱ्या महुआ आणि वाद समीकरणच झाले. त्यांच्या टि्वप्पण्याही (आताचे एक्स खाते) धारधार असतात.

हेही वाचा – विश्लेषण: यंदाच्या साखर हंगामापुढील आव्हाने काय?

उमेदवारीचे काय?

महुआंवर प्रश्न विचारण्याबाबत आरोप झाल्यावर तृणमूल काँग्रेसने सुरुवातीला मौन बाळगले. व्यक्तिगत स्वरुपाचे हे आरोप आहेत, त्यामुळे त्याच उत्तर देतील असे प्रवक्त्यांनी जाहीर केले. त्यावेळी महुआ काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली. त्यांची राजकीय वाटचाल त्या पक्षातून सुरू झाली होती हा त्याला आधार. मात्र विविध मुलाखतींमध्ये तृणमूल अखेरपर्यंत सोडणार नसल्याचे सांगत, पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम दिला. ममता बॅनर्जी या आईसारख्या आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र आता आरोप झाल्याने त्यांना तृणमूल काँग्रेस पुन्हा उमेदवारी देणार काय, हा मुद्दा आहे. प्रचारात हा मुद्दा भाजप उपस्थित करणार, त्याला प्रत्युत्तर देणे तृणमूल काँग्रेसला सोपे नाही. संसदेच्या नीतीपालन समितीकडून चौकशी सुरू आहे. त्यात सभ्य प्रश्न विचारण्यात आले नाहीत अशी महुआंची तक्रार आहे. यावरून सत्ताधारी-विरोधक वाद झडलाय. त्यामुळे मूळ मुद्दा बाजूला पडलाय. या साऱ्यात महुआंवरच चर्चेचा झोत आहे. आपल्याला लक्ष्य केले जात असल्याची त्यांची तक्रार आहे.

hrishikesh.deshpande@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Many aspects of mahua moitra personality print exp ssb
Show comments