करोनामुळे जगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. करोनाच्या विळख्यातून अद्याप सुटका झालेली नाही. अटोक्यात आलेला करोना आता पुन्हा वाढताना दिसतं आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. भारतातही करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आता करोनानंतर मंकीपॉक्स आणि मारबर्ग सारख्या धोकादायक विषाणूंनी आपलं डोक वर काढलयं. मारबर्ग व्हायरस हा कोरोना व्हायरसपेक्षा जास्त धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. या विषाणूची केवळ माणसांनाच नाही तर जनावरांना देखील लागण होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याशिवाय एकीकडे पोलिओ विषाणूचा समूळ उच्चाटन झाल्याचा दावा केला जात असला तरी हे पूर्णपणे खरे नाही. अमेरिकेत नुकताच पोलिओचा एक रुग्ण आढळून आला आहे. तर दुसरीकडे कोरोनाचे नव-नवीन प्रकार समोर येत आहेत.

मारबर्ग व्हायरस

मारबर्ग व्हायरस हा देखील कोरोना सारख्या वटवाघळांच्या उगमापासून पसरलेला विषाणू आहे. अलीकडेच, आफ्रिकन देश घानामध्ये या विषाणूचे दोन रुग्ण आढळून आले असून या दोन्ही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूबाबत जागतिक मारबर्ग हा इबोलासारखा धोकादायक विषाणू आहे आणि त्याचा मृत्यूदर खूप जास्त आहे. मार्कबर्ग हा इबोला विषाणूंच्या कुटुंबातील एक विषाणू आहे. या रोगाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरातून रक्त बाहेर येते.

हा विषाणू फळे खाणाऱ्या वटवाघळांपासून मानवांमध्ये पसरतो. या विषाणूची लक्षणे अचानक दिसू लागतात. ज्यात उच्च ताप, डोकेदुखी आणि अस्वस्थता यांचा समावेश होतो. याशिवाय अनेक रुग्णांना अंतर्गत आणि बाह्य रक्तस्त्रावही होतो. धक्कादायक बाब म्हणजे या विषाणूवर आतापर्यंत कोणतेही औषध किंवा लस बनवण्यात आलेली नाही. त्यामुळे या रोगाची लागण झालेल्या रुग्णावर उपचार करणे शक्य नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.

हेही वाचा- विश्लेषण : सेवा शुल्कासंदर्भातील नव्या नियमांना स्थगिती; ४ नोव्हेंबरपर्यंत रेस्तराँ, हॉटेलमध्ये ग्राहकांना द्यावं लागणारं सेवा शुल्क?

लंपी स्किन डिसीज (ढेकूळ त्वचा रोग)

लंपी त्वचा रोग हा कोरोनासारखा संसर्गजन्य रोग आहे. मुख्य करुन दुभती जनावरे या रोगाला लवकर बळी पडतात. भारतात राजस्थानमध्ये या रोगाची लागण झाल्याचे समोर आले आहे. राजस्थानमधील गायी, म्हशी मोठ्या प्रमाणात या विषाणूच्या विळख्यात येऊन आजारी पडत आहेत. इतकेच नाही तर गेल्या अनेक दिवसांत या विषाणूमुळे अनेक जनावरांचा मृत्यूही झाला आहे. या आजारामुळे जनावरांच्या शरीरात गुठळ्या तयार होतात. त्यांना खूप ताप येतो, डोके आणि मानेच्या भागात तीव्र वेदना होतात.

या विषाणूची लागण झालेल्या जनावरांची दूध देण्याची क्षमताही कमी होते. हा विषाणू डास, माश्या यांसारख्या रक्त शोषणाऱ्या कीटकांमुळे पसरतो. एका संशोधनात असे आढळून आले आहे, की हा आजार शेळ्यांमध्ये पसरणाऱ्या पॉक्स विषाणूसारखाच आहे. हा रोग कोणत्याही प्राण्यामध्ये आढळल्यास आजूबाजूच्या सर्व प्राण्यांना लसीकरण करणे आवश्यक आहे.

हेही वाचा- विश्लेषण: स्मृती इराणींच्या मुलीच्या नावे नेमका काय वाद सुरु आहे? काँग्रेस नेत्यांना नोटिसा का पाठवल्या आहेत?

मंकीपॉक्स व्हायरस

मंकीपॉक्स विषाणूचा धोका जगात सातत्याने वाढत आहे. भारतातही या आजाराने थैमान घातले आहे. आत्तापर्यंत ७५ देशांमध्ये ११ हजार ६३४ रुग्ण आढळले आहेत. जगभरातील डॉक्टर मंकीपॉक्सबाबत चिंता व्यक्त करत आहेत. या विषाणूबाबत संशोधनही कऱण्यात येत आहे. या विषाणूंची काही नवीन लक्षणे समोर आली आहेत.

संशोधनात तपासण्यात आलेल्या अनेक संक्रमित लोकांमध्ये या विषाणूच्या सध्याच्या लक्षणांपेक्षा वेगळी लक्षणे आढळून आली. एका संशोधनात असेही समोर आले आहे, की हा विषाणू एचआयव्ही सारखा पसरू शकतो. म्हणजेच असुरक्षित सेक्समुळेही हा आजार पसरू शकतो. जर एखाद्याला ताप किंवा फ्लूची लक्षणे असतील तर त्यांच्यापासून दूर रहा. जागतिक प्राणी आरोग्य संघटनेने हा रोग घोषित केला आहे.

हेही वाचा- विश्लेषण : चारस्तरीय रचना नेमकी काय?

अमेरिकेत पोलिओचा रुग्ण आढळला

पाकिस्तान आणि अफगाणिस्ताननंतर आता अमेरिकेत पोलिओचे विषाणूचे प्रकरण समोर आले आहे. या आजाराच्या समाप्तीच्या घोषणेनंतर १० वर्षांनी अमेरिकेतील एका २० वर्षांच्या तरुणामध्ये हा विषाणू आढळून आला आहे. रॉकलँड न्यूयॉर्कमधील काउंटीमध्ये राहणाऱ्या २० वर्षीय तरुणाला पोलिओ विषाणूची लागण झाली आहे.

अमेरिकेने १० वर्षांपूर्वी पोलिओमुक्त घोषित केले. त्यानंतर हे पहिले प्रकरण आहे. द वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, पोलिओ हा एक विषाणूजन्य आजार आहे ज्याचा मज्जातंतूंवर परिणाम होऊ शकतो. यामुळे स्नायू कमकुवत होऊ शकतात आणि काही प्रकरणांमध्ये मृत्यू देखील होऊ शकतो.
मंकीपॉक्सचा आणि मारबर्ग वाढता प्रभाव, करोनाचे नवीन प्रकार, पोलिआची पुन्हा दहशत यासारख्या अनेक विषाणूंच्या एकाच वेळी फैलाव होण्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेसमोर मोठे आवाहन निर्माण झाले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Many dangerous virus scaring world after corona pandemic like monkeypox and marburg dpj