पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात लाखो भारतीय सैनिकांनी ब्रिटिश आणि मित्रराष्ट्रांच्या बाजूने युद्धात सहभाग घेतला. अनेक भारतीय सैनिकांनी आपल्या प्राणांची बाजी लावून अतुलनीय शौर्य गाजवला. ब्रिटिश आणि मित्रराष्ट्रांनी शहीद सैनिकांचा सन्मान करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्यापैकीच एक आहेत, महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील माणगावचे व्हीसी यशवंत घाडगे. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ११ ऑक्टोबर रोजी इटलीमधील मॉन्टोन शहरात असलेल्या व्हीसी यशवंत घाडगे (VC Yeshwant Ghadge Sundial Memorial) यांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली. दुसऱ्या महायुद्धात भारतीय सैनिकांनी आपल्या प्राणांची बाजी लावली होती. राजनाथ सिंह यांनी शहीद स्मारकाला भेट दिल्यामुळे दुसऱ्या महायुद्धातील भारतीय जवानांच्या शौर्याचा इतिहास ताजा झाला. अनेक वर्षांपासून परकीय भूमीवर बलिदान देणाऱ्या शहिदांची उपेक्षा झाली होती. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीला इटलीने मॉन्टोन शहरात स्मारक तयार करण्याचा निर्णय घेतला.
दुसऱ्या महायुद्धातील इटालियन मोहीम काय होती? त्यात भारतीय सैनिकांनी काय योगदान दिले? आणि दुसऱ्या महायुद्धात पराक्रम गाजविणारे यशवंत घाडगे कोण आहेत? त्यांच्याबद्दल घेतलेला हा आढावा.
एकट्याच्या पराक्रमावर शत्रूची छावणी ताब्यात घेतली
जर्मन स्नायपरने लांबून झाडलेल्या गोळीमुळे यशवंत घाडगे यांना महायुद्धात वीरमरण आले. त्यावेळी ते अवघ्या २२ वर्षांचे होते. इटालियन प्रांतातील पेरुगिया येथे असलेल्या आताच्या मॉन्टोन शहरात शत्रूच्या सैनिकांशी झालेल्या लढाईत त्यांचा मृत्यू झाला. चार वर्षं सैन्यात सेवा केलेल्या घाडगेंची कामगिरी पाहून, त्यांना नाईक पदावर बढती मिळाली होती. ब्रिटिश सैनिकांच्या पाचव्या मराठा लाइट इन्फन्ट्री तुकडीतील रायफल दलात घाडगे महत्त्वाची भूमिका बजावत होते.
१० जुलै १९४४ रोजी पाचव्या मराठा लाइट इन्फन्ट्री तुकडीने शत्रूच्या सैनिकांची छावणी ताब्यात घेण्यासाठी आक्रमण केले. नाईक घाडगे यांची तुकडी पुढे जात असताना शत्रू सैनिकांनी त्यांच्यावर मशीनगनने गोळ्यांचा वर्षाव केला. त्या गोळीबारात घाडगेंच्या तुकडीतील अनेक सैनिक धारातीर्थी पडले आणि अनेक सैनिक जायबंदी झाले. घाडगे मात्र यातून थोडक्यात बचावले. शत्रूवर पुन्हा चाल करण्यासाठी घाडगे यांच्या सोबतीला एकही सैनिक उरला नव्हता. तरीही न डगमगता आणि स्वतःच्या जीवाची तमा न बाळगता घाडगे यांनी मोठ्या धाडसाने चाल केली आणि मशीनगनवर हँडग्रेनेड फेकून ती निकामी केली. मशीनगन उद्ध्वस्त होताच, घाडगे यांनी आपल्या टॉमीगन बंदुकीने तिथे असलेल्या सैनिकांचा वेध घेतला. टॉमीगनमधील गोळ्या संपल्या तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही. टॉमीगनचा शस्त्रासारखा वापर करून त्यांनी आणखी दोन सैनिकांना मारले.
घाडगे यांनी शत्रू छावणीवर एकट्यानेच हल्ला चढवीत ती काबीज करण्याचा प्रयत्न केला; मात्र दुर्दैवाने दूर लपून बसलेल्या जर्मन स्नायपरने त्यांच्या पाठीवर आणि छातीवर गोळ्या झाडल्या. घाडगे यांचा त्या दिवशी मृत्यू झाला असला तरी त्यांनी छावणी काबीज केली होती. घाडगे यांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी त्यांना मरणोत्तर ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ हा ब्रिटनचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार देताना ब्रिटनने घाडगे यांच्याबद्दल लिहिले की, “परिस्थिती विरोधात असूनही आपल्या जीवाची पर्वा न करता, त्यांनी स्वतःला झोकून दिले. भारतीय एनसीओने दाखविलेले धाडस, दृढनिश्चय व कर्तव्याप्रति त्यांची निष्ठा वाखाणण्याजोगी आहे.” (एनसीओ म्हणजे non-commissioned officer)
इटालियन मोहीम काय होती?
दुसऱ्या महायुद्धात १९४३ ते १९४५ या दरम्यान इटालियन मोहीम राबवली गेली होती. याच मोहिमेवर असताना नाईक घाडगे शहीद झाले. दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनी, इटली व जपान यांचा एकत्रित गट होता; त्याला ‘एक्सिस पॉवर्स’ असे म्हटले गेले. त्यांच्याविरोधात अमेरिका, ब्रिटिश (राष्ट्रकुल देश) व सोविएत संघ ही मित्रराष्ट्रे एकत्रितपणे लढत होती.
जर्मनीने आक्रमक विस्तारवादाची भूमिका घेऊन, युरोपमध्ये हातपाय पसरण्यास सुरुवात केल्यानंतर मित्रपक्षाने इटलीवर आक्रमण करून प्रतिहल्ल्याला सुरुवात केली. इटलीचा पाडाव झाल्यास इटली या युद्धातून बाहेर पडेल आणि इटलीच्या द्वीपकल्पातून आपल्याला पुढे चढाई करण्यास मार्ग मोकळा होईल, असे मित्रराष्ट्रांतील युद्ध नियोजनकर्त्यांचे आडाखे होते. इटलीचा पराभव करून, एक्सिसच्या वर्मावर घाव घालण्याचा प्रयत्न मित्रराष्ट्रांनी केला.
हे वाचा >> हिरोशिमा-नागासाकीवर अणुबॉम्ब का टाकला?
मित्रराष्ट्रांच्या फौजांनी जुलै १९४३ साली इटलीच्या अधिपत्याखाली असलेल्या सिसिली बेटावर पाऊल ठेवले आणि पुढे इटलीच्या मुख्य भागात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या युद्धात इटालियन राजवटीने लवकर हार मानली. तरीही त्यांच्या भूभागावर असलेल्या जर्मनीने कडवा प्रतिकार केला. जर्मनीने आपली संसाधने इटलीच्या भूभागावर तैनात करून, टायरेनियन समुद्रापासून ते एड्रियाटिक समुद्रापर्यंत इटलीच्या सीमेचे संरक्षण केले.
नाईक घाडगे गॉथिक लाईन या अतिशय महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या सुरक्षा रेषेवरील लढाईत लढत असताना धारातीर्थी पडले, अशी माहिती द इंडियन एक्स्प्रेसने आपल्या लेखात दिली आहे.
भारतीय जवानांचे शौर्य अधोरेखित
ब्रिटिशांच्या नेतृत्वाखाली भारतातील २.५ लाख सैनिक मित्रराष्ट्रांच्या बाजूने युद्धात उतरले होते. जवळपास ५० हजार सैनिक इटालियन मोहिमेवर होते. त्यातील ५,७८२ सैनिक इटलीमध्ये धारातीर्थी पडले. ब्रिटिश आणि अमेरिकेनंतर भारतातून आलेल्या सैनिकांची संख्या सर्वाधिक होती. १९४३ ते १९४६ अशी तीन वर्षे भारतीय सैनिक इटालियन मोहिमेसाठी लढत होते.
इतिहासकार डॅनियल मार्स्टन यांनी ‘द इंडियन आर्मी अँड द एंड ऑफ द राज’ (२०१४) या ग्रंथात नमूद केले, “भारतीय सैनिकांनी दाखविलेली व्यावसायिकता आणि इटालियन मोहिमांमध्ये त्यांनी मिळवलेल्या यशाची अनेक मित्रराष्ट्रांनी योग्य ती दखल घेतली आहे. इटालियन मोहिमेवर अनेकदा भारतीय सैनिक आघाडीवर होते.”