Marathi language accorded ‘classical language’ status: मराठी भाषेला केवळ १००१ वर्षांचाच इतिहास असल्याचे मानले जात होते. परंतु, नवीन संशोधनातून मराठी भाषेचा इतिहास हा किमान २,००० वर्षे जुना असल्याचे सिद्ध झाले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरिता राज्य सरकारकडून नेमण्यात आलेल्या समितीने अभिलेखीय पुराव्यांच्या आधारे मराठी भाषेची प्राचीनता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता. आता याच प्रयत्नांना यश आले आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला ‘अभिजात दर्जा’ देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठीसह पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी भाषेची प्राचीनता सिद्ध करण्यासाठी सातवाहनकालीन नाणेघाटातील शिलालेखाचा दाखला देण्यात आला. या शिलालेखात वापरण्यात आलेली भाषा ‘महाराष्ट्री प्राकृत’ असून लेखाची लिपी ब्राह्मी आहे. मूलतः मराठी भाषा ही इंडो-आर्यन परिवारातील भाषा असून, भारतातील अनेक भाषांप्रमाणे तिची उत्पत्ती आद्य प्राकृतमधून झाली आहे. मध्ययुगीन कालखंडात अपभ्रंश भाषेतून जुन्या मराठीने वळण घेतल्याचे बहुतांश अभ्यासक मानतात. परंतु, काही अभ्यासकांच्या मते- तत्पूर्वीच मराठी भाषा अस्तित्वात आली होती. किंबहुना मराठी मध्य भारतीय बोलीपासून विभक्त झाल्यानंतर अपभ्रंश भाषा निर्माण झाल्याचे मानले जाते. म्हणजेच मराठीला आजचे स्वरूप प्राप्त होण्याकरिता अनेक स्थित्यंतरांतून जावे लागले आहे. भाषा कोणतीही असो, ती समजण्याकरता त्या भाषेत लिहिलेले साहित्य नेहमीच उपयोगी ठरते. मराठीतील प्रारंभिक साहित्य हे मध्ययुगीन कालखंडात रचनाबद्ध करण्यात आले. त्यामुळेच मराठी भाषेची प्राचीनता जाणण्यासाठी शिलालेख, ताम्रपट यांसारखे ऐतिहासिक, पुरातत्त्वीय पुरावे मदतनीस ठरतात. आजच्या मराठीचा इतिहास हा किमान २,००० वर्षांहून अधिक जुना असला तरी आजच्या मराठीशी साधर्म्य दर्शविणारे अभिलेख इसवी सनाच्या सातव्या शतकापासून अस्तित्वात असल्याचे पुरावे सापडतात. या यादीत आक्षीचा शिलालेख मराठी भाषेतील ज्ञात असलेला सर्वांत प्राचीन शिलालेख असल्याचे मानले जाते. आजच्या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने त्याच शिलालेखाचा घेतलेला हा आढावा.
अधिक वाचा: २००० वर्षांपूर्वी स्वतःच्या नावाने नाणी पाडणारी मराठी आद्य राणी ‘नागनिका’
मराठी भाषेतील आद्य शिलालेख
सुरुवातीच्या कालखंडात कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील बाहुबली / गोमटेश्वराच्या पायापाशी असणारा शिलालेख हा मराठीतील सर्वांत प्राचीन शिलालेख असल्याचे मानले जात होते. या शिलालेखात ‘श्री चावुण्ड राजे करवियले श्री गंगराजे सुत्ताले करवियले’ असे नमूद करण्यात आले आहे. म्हणजेच हा शिलालेख चामुंडराज व गंगराज यांच्या कारकिर्दीत इसवी सन १११६-१७ मध्ये कोरण्यात आला. या शिलालेखाची नोंदणी अभ्यासकांनी आधी केल्यामुळे हाच मराठीतील प्राचीन शिलालेख असल्याचे गृहीत धरले गेले. परंतु, नंतर झालेल्या संशोधनात महाराष्ट्रातील आक्षी या भागात सापडलेला शिलालेख मराठी भाषा आणि देवनागरी लिपी यांच्या समीकरणातून निर्माण झालेला सर्वांत प्राचीन ज्ञात शिलालेख असल्याचे सिद्ध झाले.
आक्षीचा शिलालेख
निळ्याशार समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या अलिबागची भुरळ अनेकांना आहे. परंतु, याच अलिबागने आपल्या कुशीत मराठी भाषेचे अस्तित्व सांगणारा आद्य पुरावा अनेक वर्षांपासून सांभाळला आहे. अलिबागच्या आक्षी येथील शिलालेख मराठी भाषेत कोरला गेलेला सर्वांत प्राचीन शिलालेख आहे. हा शिलालेख १० व्या शतकातील शिलाहार राजा केसिदेवराय याच्या कारकिर्दीत कोरला गेला. या शिलालेखाचा जुना संदर्भ कुलाबा जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये सापडतो. त्याशिवाय आक्षी गावात आणखी एक शिलालेख आहे. तो शके १२१३ (इ. स. १२९१) मधील असून, रामचंद्र देव यादव याच्या राजवटीतील आहे. हा शिलालेखही मराठीच्या आद्य शिलालेखांपैकी एक आहे.
गॅझेटियरमधील संदर्भ
“आक्षी हॅज टू टेंपल्स, वन ऑफ काल्काबोरवा देवी अँड द अदर ऑफ सोमेश्वर महादेव. अबाऊट ट्वेंटी फाईव पेसेस फ्रॉम द देवीज टेंपल, ऑन द रोड, टू द लेफ्ट ऑफ द हाऊस ऑफ वन रामा नाईक, इज अॅन इन्स्क्राइब्ड स्टोन ४’-३” लॉन्ग बाय १’ ब्रॉड. अबाव आर सन अँड मून फॉलोड बाय द अास -कर्स; देन कम्स अ रफली कट रायटींग ऑफ नाइन लाईन्स इन देवनागरी कॅरक्टर, अँड बिलो द रायटींग, अ सेकंड रेप्रेसेंटेशन ऑफ द सन अँड मून”
भावानुवाद
“आक्षीला दोन मंदिरे आहेत; एक काल्काबोरवा देवीचे आणि दुसरे सोमेश्वर महादेवाचे. देवीच्या मंदिरापासून सुमारे २५ पावलांवर रामा नाईक यांच्या घराच्या डावीकडे ४’-३” लांब, १’ रुंद कोरलेला दगड आहे”. दगडाच्या वरच्या बाजूला सूर्य आणि चंद्र आणि त्यानंतर शापवाणी कोरलेली आहे. त्यानंतर देवनागरीतील नऊ ओळींचे लिखाण आहे. लिखाणाच्या खालच्या बाजूस सूर्य आणि चंद्र कोरलेले आहेत.”
अधिक वाचा: ‘ओरिजिन’च्या निमित्ताने: भारतीय सिनेसृष्टीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्रण केव्हा व कुणी केले?
आक्षीच्या शिलालेखावरील ओळी :
गीं सुष संतु । स्वस्ति ओं । पसीमस-
मुद्राधिपती । स्री कोंकणा चक्री-
वर्ती । स्री केसीदेवराय । महाप्रधा-
न भईर्जू सेणुई तसीमीनी काले
प्रव्रतमने । सकु संवतु: ९३४ प्रधा-
वी सवसरे: अधीकू दीवे सुक्रे बौ-
लु । भईजुवे तथा बोडणा तथा नऊ
कुवली अधोर्यु प्रधानु । महलषु-
मीची वआण । लुनया कचली ज-
अर्थ : जगी सुख नांदो.
पश्चिम समुद्राधिपती श्री कोकणचक्रवर्ती,
श्री केसीदेवराय याचा महाप्रधान
भइर्जू सेणुई याने शक संवत ९३४ परिधावी
संवत्सर अधिक कृष्ण पक्ष शुक्रवार
या दिवशी भइर्जूने देवीच्या बोडणासाठी नऊ
कुवली धान्य नेमून दिले. लुनया कचली
या शिलालेखाच्या वाचनाचे श्रेय प्रसिद्ध अभ्यासक शं. गो. तुळपुळे यांच्याकडे जाते. शं. गो. तुळपुळे लिखित ‘प्राचीन मराठी कोरीव लेख’, १९६३ या पुस्तकात या अभिलेखाचे सविस्तर विश्लेषण करण्यात आले आहे. तुळपुळे यांनी नमूद केल्याप्रमाणे प्रस्तुत लेख एका ओबडधोबड शिळेवर कोरलेला आहे. शिळेच्या माथ्यावर चंद्र-सूर्य असून, त्याखाली गधेगाळाची आकृती कोरण्यात आलेली आहे. त्याखालोखाल मुख्य लेख व शेवटी पुन्हा चंद्र-सूर्य कोरलेले आहेत. प्रत्यक्ष लेखात नऊ ओळी आहेत. हजार वर्षांपासून कोणत्याही संरक्षणाशिवाय हा शिलालेख उघड्यावरच उभा असल्याने ऊन-पावसाच्या माऱ्याने बऱ्यापैकी जीर्ण झालेला आहे. या लेखातील काही अक्षरांचे वळण या लेखाचे प्राचीनत्व सिद्ध करते. तर, लेखात काही ठिकाणी पुष्ठमात्राही आहेत. अवघ्या नऊ ओळींच्या या लेखात तसिमीनी (तस्मिन), सुक्रे (शुक्रे), अधोर्यु (अध्वर्यू), अशी अशुद्ध रूपे आढळतात, असे तुळपुळे नमूद करतात. अनुस्वार सर्वत्र पोकळ शून्याने व विराम एका उभ्या दंडाने दिला आहे. लेखाची भाषा संस्कृत-मराठी, अशी संमिश्र आहे. या लेखात कोरक्याचा नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. ‘लुनया कचली’ असे कोरक्याचे नाव आहे. ‘लुनया’ हे नाव; तर ‘कचली’ हा शब्द व्यवसाय दर्शवतो. कचली म्हणजे कोरणारा. “पश्चिमसमुद्रपती श्री कोकण चक्रवर्ती केसीदेवराय यांच्या महाप्रधान भरजु सेणुई याने हा शिलालेख कोरून घेतला असून, महालक्ष्मी देवीच्या बोडणासाठी दर शुक्रवारी नऊ कुवली धान्य देण्याचा नेम आखून दिला आहे”, असा या लेखाचा आशय आहे.
शिलालेखाचा कालखंड
शिलालेखाच्या पाचव्या-सहाव्या ओळीत लेखाचा कालखंड नमूद करण्यात आलेला आहे. “सकु संवतु ९३४ प्रधावी संवसरे: अधीकु दीवे सुक्रे बौलु।” या ओळीत प्रधावी, असा उल्लेख आहे. प्रधावी म्हणजे परिधावी. शालिवाहन शकाच्या ९३४ या वर्षी परिधावी संवत्सर आहे. कोणत्या महिन्यात हा शिलालेख कोरला गेला, त्या महिन्याचे नाव दिलेले नाही. परंतु, अधीकु (अधिक मास), असा उल्लेख आहे. दीवे सुक्रे म्हणजे हा दिवस शुक्रवार होता. याचाच अर्थ हा लेख शक संवत ९३४, परिधावी संवत्सर, अधिक ज्येष्ठ मास, कृष्णपक्ष, शुक्रवार या दिवशी कोरण्यात आला. शके ९३४ च्या अधिक ज्येष्ठातील कृष्णपक्षात प्रतिपदा, अष्टमी व अमावस्या अशा तीन तिथींना शुक्रवार आहे. परंतु प्रस्तुत लेख महालक्ष्मीच्या म्हणजे देवीच्या प्रीत्यर्थ असल्याने आणि देवीची तिथी अष्टमी असल्याने वरील तीन तिथींपैकी अष्टमी ही प्रस्तुत शिलालेखाची तिथी असणे संभवनीय आहे, असे तुळपुळे नमूद करतात. म्हणजेच हा लेख १६ मे १०१२ रोजी कोरण्यात आला. या लेखात नमूद केलेली तारीख आणि वर्ष ऐतिहासिक घटनांशी जुळवल्यास याच कालखंडात केसिदेवराय याने राज्य केले होते हे समजते. म्हणजेच हा शिलालेख ऐतिहासिकदृष्ट्या एक महत्त्वपूर्ण पुरावा आहे. त्याशिवाय शिलाहार कालखंडात मराठी भाषा, नागरी लिपी म्हणून वापरली जात होते हे सिद्ध होते. म्हणूनच या शिलालेखाचे संवर्धन होणे ही काळाची गरज आहे.
मराठीतील या आद्य शिलालेखाच्या निर्मितीला आज हजारपेक्षा अधिक वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु, इतिहासाच्या या अमूल्य ठेव्याच्या नशिबी मात्र प्रतारणाच आली होती. हा शिलालेख आक्षीतील एका रस्त्याच्या कडेला धूळ खात पडला होता. पुरातत्त्व विभागाकडून या शिलालेखाच्या संवर्धनासाठी कोणतीही हालचाल करण्यात आलेली नाही. आक्षी समुद्रकिनारा, निसर्ग अनुभवण्यासाठी देशभरातून अनेक पर्यटक येतात. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतून येणाऱ्या पर्यटकांची संख्याही जास्त आहे. तरी हा शिलालेख दुर्लक्षितच होता. काही वर्षांपासून या शिलालेखाच्या संवर्धनासाठी स्थानिकांकडून पुढाकार घेतला गेल्याचे दिसते. या शिलालेखाचे जतन करण्याची मागणी आक्षी ग्रामपंचायत, इतिहासप्रेमी, तसेच नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत होती. परिणामी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत प्राप्त निधीतून समुद्रकिनारी असलेल्या साई मंदिरात आक्षी शिलालेखाचे संवर्धन करण्यात आले आहे.