गेल्या काही वर्षांमध्ये ऋतूंची गुंतागुंत झाल्याचे पाहायला मिळात आहे. उन्हाळ्यात गारवा, हिवाळ्यात पाऊस, पावसाळ्यात ऊन, असे मोठे बदल वातावरणात दिसून आले आहेत. या सर्व बाबींना कारणीभूत आहे ते ग्लोबल वॉर्मिंग. गेल्या आठवड्यात राज्यातील काही भागांत गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. पुढील आठवड्यातही वातावरणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
एका अभ्यासाच्या माहितीतून ही शक्यता वर्तविली जात आहे. १९७० पासून संपूर्ण भारतभर मार्च व एप्रिल या महिन्यांत उष्णतेचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. परिणामी, काही राज्यांमध्ये होळीच्या आसपास तापमान ४० अंश सेल्सिअस ओलांडण्याची उच्च शक्यता आहे. १९७० मध्ये मात्र हे दृश्य वेगळे होते, असे एका अभ्यासात सांगण्यात आले आहे. हा अभ्यास अमेरिका येथील क्लायमेट सेंट्रलमधील शास्त्रज्ञांच्या एका गटाने केला आहे. अभ्यासासाठी या गटाने १ जानेवारी १९७० ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत दररोजचे तापमान तपासले आहे.
अभ्यासात काय?
या अभ्यासात असे दिसून आले आहे की, मार्चमध्ये भारतातील उत्तर आणि पश्चिम भागात १९७० च्या तुलनेत सर्वांत जास्त तापमानवाढ झाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सरासरी तापमानात २.८ अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात संपूर्ण भारतात एकसारखी तापमानवाढ झाली आहे. मिझोरममध्ये १९७० पासून अंदाजे १.९ अंश सेल्सिअसची सर्वांत मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे.
होळीच्या आसपासच्या दिवसांतील तापमानावर लक्ष केंद्रित केल्यास अभ्यासात असे आढळून आले की, १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला महाराष्ट्र, छत्तीसगड व बिहार या तीन राज्यांमध्ये मार्चच्या उत्तरार्धात ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असण्याची शक्यता पाच टक्के होती. सध्या या संख्येत नऊ राज्यांचा समावेश झाला आहे. तीन मूळ राज्यांसह राजस्थान, गुजरात, तेलंगणा, मध्य प्रदेश, ओडिशा व आंध्र प्रदेशमध्येही ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानवाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात तापमानवाढ होण्याची शक्यता तब्बल १४ टक्के आहे. संशोधकांनी भारतातील ५१ शहरांचेही परीक्षण केले.
क्लायमेट सेंट्रलचे डॉ. ॲण्ड्र्यू पर्शिंग यांच्या म्हणण्यानुसार, “भारतामध्ये हिवाळ्यासारख्या शीतलतेपासून उष्णतेकडे तापमानात अचानक बदलत असल्याचे दिसून आले आहे.” ते म्हणाले, “फेब्रुवारीमध्ये दिसून आलेल्या तापमानवाढीच्या ट्रेंडनंतर मार्चमध्येही याच पद्धतीची तापमानवाढ होण्याची शक्यता आहे.”
उष्ण तापमानाचे कारण काय?
मार्च व एप्रिल या महिन्यांत तापमानवाढ होण्यामागील मुख्य कारण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. औद्योगिक क्रांतीनंतर हरितगृह वायू परिणामामुळे जागतिक तापमानात वाढ झाली आहे. जगाचे वार्षिक सरासरी तापमान १८५०-१९०० या कालावधीतील सरासरी तापमानापेक्षा १.१ अंश सेल्सिअसने वाढले असून, भारतीय उपखंडातील वार्षिक सरासरी तापमान १९०० पासून ०.७ अंश सेल्सिअसने वाढले आहे.
हेही वाचा: मोदी सरकारच्या ‘Fact Check Unit’ला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; नेमके प्रकरण काय?
अमेरिकेतील नॅशनल सेंटर फॉर ॲटमॉस्फेरिक सायन्स, युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंग येथील संशोधन शास्त्रज्ञ डॉ. अक्षय देवरस म्हणाले, “भारतात उष्ण हवामानाचे हंगामाच्या लवकर आगमन होण्यास ग्लोबल वॉर्मिंग कारणीभूत आहे. हरितगृह वायूंचे प्रमाण १९७० च्या दशकाच्या तुलनेत सध्या खूप जास्त असल्याने हे ग्लोबल वॉर्मिंग होत आहे.” ते पुढे म्हणाले, “दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. विशेषतः भारतातील डोंगराळ राज्यांना याचा फटका बसत आहे. मार्च-एप्रिलमधील उष्ण हवामानामुळे उष्णतेशी संबंधित आजार होण्याची शक्यता वाढते.”