लोकसत्ता टीम
इराणमध्ये अध्यक्षीय निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीत तेथील मतदारांनी मसूद पेझेश्कियान या सर्जन असलेल्या नेमस्त व्यक्तीस अध्यक्षपदी निवडले. इराणची सूत्रे हाती असलेल्या कर्मठ मंडळींनी चार उमेदवारांना अध्यक्षपदासाठी उभे केले, त्यांतील तिघे कट्टर विचारसरणीचे होते. तर पेझेश्कियान हे एकच मवाळ होते. पण इराणी जनतेने दोन्ही फेऱ्यांमध्ये त्यांना पसंती दिली. संघर्षपर्वात कट्टरपंथियांच्या कलाने घेत इराणला नवी दिशा देण्याची जबाबदारी पेझेश्कियान यांच्यावर राहील.
कोण आहेत मसूद पेझेश्कियान?
डॉ. मसूद पेझेश्कियान हे मूळचे कार्डिअॅक सर्जन आहेत. इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचे १९ मे रोजी हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाल्यामुळे अध्यक्षीय निवडणूक घ्यावी लागली. इराणमधील प्रभावी अशा गार्डियन कौन्सिलने अध्यक्षपदासाठी चार उमेदवारांची निवड केली. मोहम्मद बकर कलिबाफ, सईद जलिली, अलिरझा झकानी आणि मसूद पेझेश्कियान हे ते चार उमेदवार. या चौघांपैकी पहिले तीन कट्टरपंथिय मानले जातात. त्यांच्या तुलनेत अझेरी वंशाचे पेझेश्कियान सुधारणावादी मानले जातात. त्यांनी प्रचारातही उदारमतवादी धोरणे राबवण्याविषयी उल्लेख केला होता. मोठ्या सत्तांबरोबर संबंध प्रस्थापित करून २०१५मधील अणुकराराचे पुनरुज्जीवन करण्याचे आश्वासन दिले होते. अर्थात इराणमध्ये परराष्ट्र धोरण ठरवण्याचा अधिकार त्या देशाचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला अली खामेनी यांना असल्यामुळे यांतील किती वचनांची पूर्तता पेझेश्कियान यांना करता येईल याविषयी शंका आहे. पण मतदारांनी दोन्ही फेऱ्यांमध्ये त्यांनाच पसंती दिली. दुसऱ्या फेरीमध्ये पेझेश्कियान यांना १.६३ कोटी मते मिळाली. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी सईद जलिली यांना १.३५ कोटी मते मिळाली.
आणखी वाचा-विश्लेषण: काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानधार्जिणे… आता भारतमित्र… ब्रिटनमधील मजूर पक्षाचे बदलते रंग!
नेमस्त नेत्याला पसंती का?
इराणमध्ये गेली तीन वर्षे कडव्या राजवटीमुळे जनता संत्रस्त झाली होती. इब्राहीम रईसी यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत तेथील धर्मवाद्यांनी असहिष्णू धोरणे राबवली. हिजाबच्या मुद्द्यावर महिला रस्त्यावर उतरल्या. आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे अर्थव्यवस्था मोडकळीस आली. त्यामुळे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर नाराज होता. यावेळी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदारांमध्ये उत्साह नव्हताच. तशात रईसी यांचा उत्तराधिकारी म्हणून निवडलेल्या चौघांपैकी तीन कट्टर विचारांचे होते. या धोरणांमुळे सामान्य जनतेचे नुकसानच होते या भावनेतून मतदारांनी पेझेश्कियान यांच्या पारड्यात मते दिली. देशांतर्गत धर्मवादी आणि जगात संघर्षवादी धोरणांकडे इराणच्या विशेषतः युवा मतदारांनी पाठ फिरवल्याचेच हे लक्षण होते.
इराणमध्ये सुधारणांची नांदी?
नवीन सहस्रकात इराणमध्ये सुधारणांसाठी प्रयत्न करण्याचे श्रेय दोन नेमस्त अध्यक्षांना दिले जाते. १९९७ ते २००५ या काळात मोहम्मद खतामी त्या देशाचे अध्यक्ष होते. त्यांनी राजकीय सुधारणांवर भर देण्याचा प्रयत्न केला. उदारमतवादी समाज आणि माध्यमस्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. २०१३ ते २०२१ या काळात हसन रूहानी इराणचे अध्यक्ष होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंध सुधारण्यास प्राधान्य दिले. त्यांच्याच अमदानीत २०१५मध्ये ऐतिहासिक इराण अणुकरार घडून आला होता. या करारामुळे इराण जागतिक मुख्य प्रवाहात आला. पण रूहानी यांच्या पराभवानंतर इराण पुन्हा एकदा संघर्षवादी धोरणांकडे आणि एकांडेपणाकडे झुकला. दोन्ही सुधारणावादी अध्यक्षांना सुरुवातीस अली खामेनी यांचा पाठिंबा मिळाला. पण रिव्होल्युशनरी गार्ड्स या इराणच्या लष्करी यंत्रणेने दोघांनाही कडाडून विरोधच केला. खामेनी आणि रिव्होल्युशनरी गार्ड्स यांना सांभाळून पेझेश्कियान यांना सुधारणा राबवाव्या लागतील.
आणखी वाचा-पैसे टाकल्यावर वस्तू देणाऱ्या मशीन्स जपानमध्ये चर्चेत का आल्या आहेत?
इस्रायल, अमेरिकेशी संबंध?
इस्रायल किंवा अमेरिकेशी संबंध इतक्यात सुधारण्याची चिन्हे नाहीत. आंतरराष्ट्रीय धोरणे ठरवण्याचे सर्वाधिकार धार्मिक नेते खामेनी आणि रिव्होल्युशनरी गार्ड्सकडे आहेत. पण देशांतर्गत सुधारणा राबवून अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांचा विरोध बोथट करण्याचे पेझेश्कियान यांचे प्रयत्न राहतील. हुथी, हेजबोला, हमास यांना पाठिंबा देऊन अमेरिका, इस्रायल, आखाती अरब देश यांची नाराजी ओढवून घ्यावी लागते. निर्बंध लादले जातात. यातून आपलेच नुकसान आहे, हे स्थानिक तरुणाईली पटवून देण्यात पेझेश्कियान यशस्वी ठरले, तर खामेनींवर संघर्षवादी भूमिका टाळण्यासाठी दबाव आणता येऊ शकतो.
भारताशी संबंध कसे राहतील?
भारताशी संबंधांमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. कट्टरवादी आणि सुधारणावादी अशा दोन्ही राजवटींशी भारताचे संबंध अलीकडच्या काळात चांगले राहिले आहेत. भारताने यादरम्यान इस्रायल आणि आखाती अरब देशांशी संबंध वाढवले, अमेरिकेशी सामरिक मैत्री वाढवली. पण याचा फार परिणाम भारत-इराण संबंधांवर झालेला नाही. चाबहार बंदर विकास प्रकल्पाच्या उभारणीत आणि परिचालनात त्यामुळे कोणतेही अडथळे येण्याची चिन्हे नाहीत.