– सुनील कांबळी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या जनसंवाद कार्यक्रमाचा शंभरावा भाग रविवारी प्रसारित होत आहे. यानिमित्त या उपक्रमावर दृष्टिक्षेप टाकतानाच जगाच्या इतिहासातील बड्या नेत्यांच्या अशा कार्यक्रमाचा वेध घेणे आवश्यक ठरते.
‘मन की बात’ची पार्श्वभूमी काय आणि रेडिओची निवड का?
तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असले तरी रेडिओ हे जनसंवादाचे प्रभावी माध्यम आहे. जगातील अनेक बड्या नेत्यांनी देशवासियांशी संवादासाठी रेडिओचा वापर केल्याचे दिसते. जनतेशी विचारांचे आदानप्रदान, दिलखुलास संवादासाठी रेडिओ हे उत्तम माध्यम असल्याचे लक्षात घेऊन मोदी यांनी ३ ऑक्टोबर २०१४ रोजी ‘मन की बात’ उपक्रमाची सुरुवात केली. पहिला कार्यक्रम महिन्याच्या सुरुवातीला झाला असला तरी त्यानंतर महिन्याचा शेवटचा रविवार आणि ‘मन की बात’चे यांचे नाते घट्ट जुळले. त्यासाठी ‘ऑल इंडिया रेडिओ’चे भक्कम जाळे कामी आले. सध्या २२ प्रादेशिक भाषा, २९ बोलीभाषा आणि ११ परदेशी भाषांतून ‘मन की बात’चे प्रसारण केले जाते.
जनतेचा प्रतिसाद किती?
आतापर्यंत शंभर कोटी नागरिकांनी एकदा तरी ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकला आहे, असे ‘आयआयएम-रोहतक’ने केलेल्या सर्वेक्षणात आढळले आहे. देशातील ९६ टक्के नागरिकांना या कार्यक्रमाबाबत माहिती आहे. ‘मन की बात’चे २३ कोटी नियमित श्रोते आहेत. तसेच ४१ कोटी लोक अधूनमधून हा कार्यक्रम ऐकतात, असे ‘आयआयएम-रोहतक’च्या अहवालात म्हटले आहे. हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील जनता यांना जोडणारा दुवा ठरल्याचा दावा सत्ताधारी करतात. जगातील अनेक नेत्यांनी अशाच जनसंवाद उपक्रमाद्वारे जनतेशी नाते घट्ट केल्याचे इतिहासात डोकावल्यास दिसते.
फ्रँकलिन डी. रूझवेल्ट यांचा ‘फायरसाईड चॅट’ उपक्रम काय होता?
फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांनी १९३३ ते १९४५ या कालावधीत सर्वाधिक चार वेळा अमेरिकेचे अध्यक्षपद भूषवले. जागतिक महामंदी आणि दुसऱ्या महायुद्धाच्या कठीण काळात त्यांनी अमेरिकेचे नेतृत्व केले. संवाद कौशल्य हे त्यांचे बलस्थान होते. ते ‘फायरसाईड चॅट’ या कार्यक्रमाद्वारे नागरिकांशी सोप्या भाषेत संवाद साधत. अतिशय गुंतागुंतीचे विषय ते सुगमतेने नागरिकांना उलगडून दाखवत. ‘व्हाईट हाऊस’च्या ‘डिप्लोमॅटिक रिसेप्शन रुम’मधून ते हा कार्यक्रम करीत. हा संवाद सुगम, सुबोध व्हावा, यावर त्यांचा कटाक्ष असे. त्यामुळे बोजड शब्द, क्लिष्ट वाक्यरचना टाळण्यावर त्यांचा भर असायचा. या कार्यक्रमातील त्यांचे सुमारे ८० टक्के शब्द दैनंदिन संभाषणातले होते. त्यामुळेच त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख उंचावत राहिला, असे निरीक्षण रेडिओ इतिहास तज्ज्ञ जाॅन डनिंग यांनी नोंदविले आहे. हा कार्यक्रम साप्ताहिक किंवा मासिक नव्हता. रूझवेल्ट यांनी ४४२२ दिवसांच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत फक्त ३१ कार्यक्रम केले. म्हणजे वर्षातून जेमतेम दोन कार्यक्रमच त्यांनी केल्याचे दिसते.
‘आझाद हिंद रेडिओ’ची स्थापना कशी झाली?
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्य संग्रामाबाबत जनजागृतीसाठी १९४२ मध्ये ‘आझाद हिंद रेडिओ’ सेवा सुरू केली होती. भारतीयांना ब्रिटिशांविरोधात लढण्यासाठी प्रवृत्त करावे, हा त्यामागचा उद्देश होता. सुरूवातीला त्याचे मुख्यालय जर्मनीमध्ये होते. त्यानंतर ते सिंगापूर आणि हैदराबाद येथे हलविण्यात आले. ‘आझाद हिंद रेडिओ’वरील साप्ताहिक कार्यक्रमाचे इंग्रजीबरोबरच हिंदी, मराठी, बंगाली, मराठी, तमिळ, पंजाबी, उर्दू आदी भाषांतून प्रसारण होत असे.
हिटलरकडून रेडिओचा शस्त्रासारखा वापर?
जर्मनीचा तत्कालीन हुकूमशहा ॲडाॅल्फ हिटलरचे प्रचारतंत्र भक्कम होते. रेडिओ सेवेचा त्याने शस्त्राप्रमाणे वापर केल्याचे मानले जाते. त्यासाठी सर्वसामान्यांना अल्पदरात रेडिओ उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली. दिवसभर दैनंदिन कामामुळे थकलेल्या नागरिकांमध्ये कोणत्याही विचाराला विरोध करण्याचे बळ नसेल, हे ओळखून रात्री रेडिओद्वारे प्रचारयंत्रणा राबविण्यावर त्यांचा भर होता. नव्या कल्पना नागरिकांवर थोपविण्यासाठी रात्रीची वेळच योग्य असल्याचे मुख्य प्रचारक जोसेफ गोबेल्सचे मत होते. विमान आणि रेडिओशिवाय जर्मन क्रांतीच शक्य झाली नसती, असे गोबेल्सने म्हटले होते.
नासेर यांचा अरब एकतेचा प्रयोग काय होता?
इजिप्तचे तत्कालीन अध्यक्ष गमाल अब्देल नासेर यांच्या नेतृत्वाखाली १९५३ मध्ये ‘द व्हॉइस ऑफ अरब’ (सौत अल अरब) हे रेडिओ केंद्र सुरू करण्यात आले. या रेडिओ केंद्राद्वारे नासेर यांनी अरब एकतेची हाक दिली. अतिभावनिक राष्ट्रवादाची भाषा आणि वसाहतवादविरोध ही त्यांची वैशिष्ट्ये होती. पश्चिम आशिया, उत्तर आफ्रिकेतील कोट्यवधी घरांमध्ये नासेर यांचे विचार पोहोचविण्याचे काम या केंद्रातून झाले. प्रादेशिक भिंती ओलांडून अरबी अस्मिता जागृत करण्यात या रेडिओ केंद्राचे मोठे योगदान आहे. मात्र, १९६७ च्या अरब-इस्रायल युद्धानंतर या रेडिओ केंद्राला उतरती कळा लागली. मात्र, नासेर यांच्या प्रतिमानिर्मितीत रेडिओचे मोठे योगदान असल्याचे मानले जाते.