सोने हे संपत्ती, स्थिरता व समृद्धीचे सर्वांत विश्वासार्ह आणि सुरक्षित प्रतीक असल्याचे मानले जाते. सोन्याला जगातील सर्वांत महागड्या धातूंमध्ये गणले जाते. शतकानुशतके मानवी इतिहासात त्याचे महत्त्वाचे स्थान आहे. कारण- जगभरात आर्थिक अस्थिरतेच्या काळात सोने देशांसाठी विश्वासार्ह मालमत्ता राहिली आहे. सोन्याचे दर काही दिवसांत एक लाखाचा ऐतिहासिक टप्पा पार करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, आता यातच एक आनंदाची बातमी समोर येत आहे. भारतात सोन्याचा मोठा साठा सापडला आहे. हा सोन्याचा साठा नक्की कुठे सापडला आहे? देशासाठी त्याचे महत्त्व काय? त्याविषयी जाणून घेऊ.

सोन्याचे महत्त्व

ज्या देशाकडे सर्वाधिक सोने तो देश अधिक ताकदवान, असे मानले जाते. कोणत्याही जागतिक संकटावर मात करण्यासाठी सोने महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे प्रत्येक देशाच्या बँका सोन्याचे साठे वाढवत असतात. सोने केवळ अर्थव्यवस्थेतच नाही, तर हिंदू पौराणिक कथांमध्येदेखील महत्त्वपूर्ण आहे. हिंदू ग्रंथांमध्ये भगवान विष्णूंचे निवासस्थान वैकुंठ सोन्याने सजवलेले असल्याचे वर्णन करण्यात आले आहे, त्यात संपत्तीची देवता असलेली देवी लक्ष्मी सुवर्णकमळावर बसली असल्याचे चित्रित केले गेले आहे.

याव्यतिरिक्त ऐतिहासिकदृष्ट्या सोने हे देवाण-घेवाणीचे एक महत्त्वाचे माध्यम आणि संपत्तीचा साठा राहिले आहे. प्राचीन संस्कृतीपासून ते आधुनिक काळापर्यंत आर्थिक चढ-उतारांना तोंड देण्याच्या क्षमतेसाठी सोने अत्यंत मौल्यवान ठरले आहे. आर्थिक अस्थिरतेच्या काळात आणि महागाईविरुद्ध बचाव करण्यासाठी सोने ही सुरक्षित मालमत्ता राहिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताला खरोखरच एक आश्चर्यकारक धक्का बसला आहे. कारण- भारतातील खनिजांनी समृद्ध असलेल्या ‘या’ राज्यात सोन्याचा मोठा साठा सापडला आहे.

ओडिशाचे खाणमंत्री विभूती भूषण जेना यांनी हा साठा सापडल्याची माहिती दिली आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

ओडिशात सोन्याचे प्रचंड साठे

ओडिशा राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोन्याचे मोठ्या प्रमाणात साठे सापडल्यामुळे ओडिशा सोन्याच्या खाणींसाठी एक नवीन आकर्षण केंद्र ठरत आहे. ओडिशा हे राज्य नैसर्गिक संसाधनांच्या विपुलतेसाठी प्रसिद्ध आहे. ही नवनवीन शोधांचा लाभ घेण्याची आणि खाण उद्योग वाढवण्याची एक उत्तम संधी आहे. ओडिशाचे खाणमंत्री विभूती भूषण जेना यांनी हा साठा सापडल्याची माहिती दिली आहे. त्यांनी राज्याच्या आर्थिक विकासात एका नवीन टप्प्याची सुरुवात करण्याची आणि भविष्यात सोन्याच्या खाणींचा मोठ्या प्रमाणात लिलाव करण्याची योजना जाहीर केली.

राज्यात सोन्याचे साठे कोणत्या ठिकाणी सापडले?

सुंदरगड, नबरंगपूर, केओंझार व देवगड यांसारख्या जिल्ह्यांमध्ये सोन्याचे साठे असल्याचे आढळून आले आहे. मलकानगिरी, संबलपूर यांसारख्या ठिकाणी अजूनही या मौल्यवान धातूचा शोध सुरू आहे. या ठिकाणी अभ्यास आणि अधिक संशोधन केले जात आहे. त्यामध्ये जशीपूर, सुरियागुडा, रुआंसी, इडेलकुचा, मरेदिही, सुलेपत व बदामपहाड यांसारख्या ठिकाणांचाही समावेश आहे. मयूरभंज जिल्ह्यातही सोन्याचे साठे आढळून येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. देवगड जिल्ह्यातील आदासा-रामपल्ली येथे पूर्वी साठे सापडले होते. भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण (जीएसआय) सध्या या क्षेत्रात जी-२ स्तरीय आणि तांब्यासह अनेक खनिज संसाधनांच्या शक्यतेचा शोध घेत आहे.

सोन्याचे संभाव्य साठे असलेली ठिकाणे

केओंझार जिल्ह्यात गोपूर-गाझीपूर, मानकडचुआन, सालेकाना व दिमिरिमुंडा ही खाणींची मुख्य ठिकाणे आहेत. आर्थिक विकासासाठी या संसाधनांचा वापर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. भविष्यात सोन्याच्या खाणीच्या ब्लॉक लिलावात ही वचनबद्धता स्पष्ट होईल. या खाणींचा लिलाव राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशन, जीएसआय आणि राज्य सरकार खाण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. या खाणींचे व्यापारीकरणापूर्वी, सापडलेल्या सोन्याच्या साठ्यांचे तांत्रिक समित्यांकडून व्यवहार्यतेचे मूल्यांकन करण्यात येईल. भारतात सोन्याचे सर्वाधिक उत्पादन कर्नाटक राज्यात होते. कर्नाटकमधील कोलार एहुट्टी आणि उटी या खाणीतून मोठ्या प्रमाणात सोने काढले जाते. तसेच आंध्र प्रदेश आणि झारखंडमधील हिराबुद्दिनी आणि केंद्रुकोचा खाणींमध्येदेखील मोठ्या प्रमाणात सोने आढळते.

सोन्याच्या साठ्यांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल का?

सोन्याच्या साठ्यांचा वापर केल्याने देशाची सोन्याची मागणी पूर्ण करण्यासाठी आयातीवरील अवलंबित्व कमी होईल. अवलंबित्व कमी झाल्याने व्यापार संतुलन सुधारेल. तसेच या साठ्यांच्या व्यापारीकरणामुळे रोजगाराच्या संधी वाढतील आणि त्याचबरोबर खाणकाम आणि खाणकामाशी संबंधित उद्योगांमध्ये औद्योगिक वाढही होईल. तसेच, प्रादेशिक विकासालाही चालना मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ओडिशामध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याच्या साठ्यांचा शोध राज्याच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाचा आहे.

सोन्याच्या साठ्यांचा हा शोध भारताचे सोन्याच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करेल, व्यापाराची स्थिती सुधारेल आणि नवीन रोजगार निर्माण करील, अशी शक्यता आहे. या विकासामुळे ओडिशा जागतिक सोन्याच्या बाजारपेठेत एक प्रमुख खेळाडू ठरण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे राज्य व राष्ट्रीय अर्थव्यवस्था आणि तेथील लोक दोघांनाही याचा फायदा होईल.