माथेरानचे अर्थकारण पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र तरीही माथेरानकरांनी बेमुदत बंदची हाक दिली. सलग दोन दिवस माथेरानमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. पर्यटकांची नाराजी वाढत आहे, त्याबरोबर ग्रामस्थांनीही संघर्षाची भूमिका घेतलेली दिसते. यामागची कारणे कोणती याचा आढावा….

माथेरानचे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व

ब्रिटीश जिल्हाधिकारी ह्यू मॅलेट यांनी २१ मे १८५० रोजी माथेरानचा शोध लावला. तेव्हापासून माथेरान थंड हवेचे ठिकाण म्हणून पर्यटनाच्या नकाशावर आले. मुंबईजवळ असलेले, सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर वसलेले, हिरव्यागार सदाहरित वनांचे आच्छादन असलेले, निसर्गसंपन्न ठिकाण म्हणून माथेरान ओळखले जाऊ लागले. दरवर्षी देशविदेशातील लाखो पर्यटक माथेरानला भेट देतात. येथील निसर्ग पर्यटनाचा आस्वाद घेत असतात. पर्यटन आणि त्यावर आधारित व्यवसाय हेच माथेरानकरांच्या उपजीविकेचे साधन आहे.

पर्यटक का नाराज आहेत?

माथेरानमध्ये दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात, हिरवागार निसर्ग, लाल माती, थंड हवा आणि सह्याद्रीच्या पर्वत रांगा यांचे अप्रुप पर्यटकांना असते. मात्र गेल्या काही महिन्यांत इथे येणाऱ्या पर्यटकांना माथेरानच्या वेशीवर वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले. फसवणुकीसंदर्भातील अनेक चित्रफीती समाज माध्यमांवर प्रसृत झाल्या. त्यांत अनेक पर्यटकांनी माथेरानमधील त्यांना आलेले वाईट अनुभव मांडले होते. माथेरानमध्ये होणाऱ्या फसवणुकीच्या प्रकारांचा पाढाच वाचला गेला. इतर पर्यटकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळे आदर्श पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानबाबत समाजात नकारात्मक चित्र तयार होत गेले.

फसवणूक कशी?

माथेरानला येण्यासाठी रस्ता आणि रेल्वे हे दोन प्रमुख मार्ग आहे. रेल्वेच्या फेऱ्या मर्यादित असल्याने पर्यटकांकडून प्रामुख्याने रस्ते मार्गाचा अवलंब केला जातो. येणारी वाहने दस्तुरी नाका येथे थांबविली जातात. तिथून पायी चालत, हातरिक्षा, ई रिक्षा, घोडे आणि रेल्वे शटल सेवेचा वापर करून माथेरानला पोहोचता येते. मात्र दस्तुरी नाका येथे येणाऱ्या पर्यटकांना घोडेवाल्यांकडून घेरले जाते. त्यांना चुकीची माहिती दिली जाते. रेल्वे सेवा आणि ई रिक्षा बंद आहेत, चालून अंतर खूप आहे असे सांगून घोड्यावर बसण्यास भाग पाडले जाते. त्यासाठी अवाजवी दर आकारले जातात. घोड्यावर बसलेल्या पर्यटकांना थेट हॉटेलवर न नेता, विविध पॉइंट्स फिरण्यास भाग पाडून नंतर उशिरा हॉटेलवर सोडले जाते. भाडे नाकारले तर पर्यटकांना त्रास दिला जातो. ओला, उबरसारख्या टॅक्सीने माथेरानला येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्या नेरळ येथे घाटाच्या सुरवातीला अडवून, पर्यटकांना स्थानिक टॅक्सीचा वापर करून वर जाण्यास सांगितले जाते.

पर्यटकांची फसवणूक करणारे कोण?

माथेरानमध्ये रोजगारासाठी आसपासच्या गावांतून मोठ्या प्रमाणात लोक येत असतात. यात हमाल, अश्वचालक यांचा प्रामुख्याने समावेश असतो. येणाऱ्या पर्यटकांना माथेरानच्या भौगोलिक परिस्थितीची जाणीव नसते. याचा फायदा घेऊन यांतील काही अश्वचालक आणि हमाल पर्यटकांची फसवणूक करतात, असा आरोप केला जातो. नेरळ-माथेरान दरम्यान पर्यटकांची ने-आण करण्यासाठी टॅक्सी सेवा चालवली जाते. यातील बहुतेक टॅक्सीचालक हे नेरळ परिसरातील असतात. या टॅक्सी चालकांकडून माथेरानला येणाऱ्या ओला आणि उबेर या परमिट टॅक्सी चालकांची अडवणूक केली जाते. त्यांना थांबवून पर्यटकांना स्थानिक टॅक्सीचा वापर करण्यास भाग पाडले जाते. 

पर्यटन बचाव संघर्ष समिती

पर्यटकांकडून समाज माध्यमांवर व्यक्त होणाऱ्या नकारात्मक प्रतिक्रियांमुळे माथेरानकर अस्वस्थ झाले. पर्यटकांमधील या नकारात्मक प्रतिक्रियामुळे माथेरानचे पर्यटन धोक्यात येईल याची जाणीव त्यांना झाली. त्यामुळे पर्यटकांची फसवणूक थांबावी यासाठी एकत्रितपणे पुढे येण्याचा निर्णय़ त्यांनी घेतला. यातून माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीची स्थापना झाली. सर्व राजकीय पक्षांचे, विविध संघटनांशी संबंधित लोक यानिमित्ताने एकत्र आले. माथेरानचे अधीक्षक यांना यात हस्तक्षेप करण्यासाठी निवेदनही देण्यात आले होते. मात्र याबाबत काहीच प्रगती झाली नाही. त्यामुळे माथेरान बेमुदत बंद करण्याचा निर्णय संघर्ष समितीमार्फत घेण्यात आला. सर्वच राजकीय पक्ष, व्यापारी संघटना, हॉटेल व्यावसायिक असोसिएशन, हात रिक्षा आणि ई रिक्षा संघटना आणि इतर सामाजिक संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला होता. त्यामुळे सलग दोन दिवस कडकडीत बंद पाळला गेला.

समितीच्या मागण्या कोणत्या?

दस्तुरी फाटा येथे पोलीस बंदोबस्तात वाढ करावी, तिथे पर्यटन सुविधा केंद्र सुरू करावे, पार्कींग झोनमध्ये घोडेवाले, एजंट हमाल यांना प्रवेश बंद करण्यात यावा, सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करण्यात यावेत, अश्वचालक, हमाल, ई रिक्षाचालक यांचे दरपत्रक दर्शनी भागात लावण्यात यावे, बेकायदेशीर पथविक्रेत्यांवर कारवाई करावी, माथेरानमध्ये प्रवेशासाठी एकच मार्ग सुरू ठेवावा अशा मागण्या समितीने माथेरानच्या अधीक्षकांकडे केल्या आहेत.

बैठकीत काय ठरले?

माथेरान बंदची दखल घेऊन आमदार महेंद्र थोरवे यांनी बुधवारी एक बैठक बोलावली. या बैठकीला प्रांताधिकारी प्रकाश संकपाळ आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, माथेरानचे अधीक्षक, मुख्याधिकारी उपस्थित होते. माथेरान पर्यटन बचाव समितीच्या मागण्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. संघर्ष समितीच्या बहुतेक मागण्या मान्य करून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे मान्य करण्यात आले. दस्तुरी नाका येथे पर्यटन सुविधा केंद्र सुरू करणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, घोडे, हातरिक्षा, आणि ई रिक्षा यांचे दर पत्रक लावणे, घोडेवाले, हमाल, एजंट यांना वाहनतळ परिसरात प्रतिबंध करण्याचे निश्चित करण्यात आले.

Harshad.kashalkar@expressindia.com

Story img Loader