पाच हजार किलोमीटर पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचे हल्ले रोखण्यासाठी संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या दुसऱ्या टप्प्यातील (फेज-टू) क्षेपणास्त्र बचाव प्रणालीची चाचणी नुकतीच यशस्वी झाली. यानिमित्ताने भारताने पृथ्वीच्या वातावरणात आणि बाह्य वातावरणातून येणाऱ्या शत्रूच्या क्षेपणास्त्रांना नष्ट करण्याची प्रणाली विकसित करण्यात महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. या प्रणालीचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यात डीआरडीओच्या प्रयोगशाळांनी निर्मिलेल्या अनेक अत्याधुनिक स्वदेशी तंत्रज्ञानाचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रणालीचे मूल्यमापन कसे झाले?

शत्रूच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राशी साधर्म्य साधणारे क्षेपणास्त्र धामरा येथून प्रक्षेपित करण्यात आले. जमीन आणि समुद्रात तैनात प्रगत हवाई संरक्षण (इंटरसेप्टर) प्रणाली सक्रिय झाली. तिने हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र शोधले आणि अवघ्या चार मिनिटांत त्याचा वेध घेतला. उड्डाण चाचणीत लांब पल्ल्याचे संवेदक, तात्काळ प्रतिसाद देणारी दूरसंचार प्रणाली आणि प्रगत हवाई संरक्षण क्षेपणास्त्राचा समावेश असलेल्या संपूर्ण एकीकृत युद्ध प्रणालीचे प्रमाणीकरण करण्यात आले. दूरसंचार व विद्युत चुंबकीय निरीक्षण केंद्र, रडार आणि पल्ल्याचा माग काढणारी उपकरणे यातून प्राप्त माहितीची पडताळणी करण्यात आली. चाचणीत सर्व उद्दिष्टे पूर्ण झाल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

हेही वाचा >>>विश्लेषण: संत्र्याच्या निर्यातीचा प्रश्न अनुत्तरित का?

चाचणीचे फलित काय?

भारताने पृथ्वीच्या वातावरणात आणि बाहेरून येणाऱ्या प्रतिकूल क्षेपणास्त्रांना निष्प्रभ करण्यासाठी अनुक्रमे बाह्य-वातावरण आणि आंतर-वातावरण क्षेपणास्त्रभेदी (इंटरसेप्टर) प्रणाली विकसित केली आहे. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षणासाठी या प्रणाली एकत्रित केल्या गेल्या. त्यांच्यामार्फत पृथ्वीच्या आंतर आणि बाह्य वातावरणातील शत्रूच्या विविध प्रकारच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना नष्ट करणे दृष्टिपथास येत आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये डीआरडीओने एडी – १ नावाच्या लांब पल्ल्याच्या इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची पहिल्यांदा यशस्वी चाचणी केली होती.

बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण कार्यक्रम काय आहे?

लांब पल्ल्याच्या अर्थात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना हवेतच नष्ट करण्यासाठी भारताने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण कार्यक्रम (बीएमडी) हाती घेतला आहे. पहिल्या टप्प्यात पृथ्वी हवाई संरक्षण आणि अश्विनी प्रगत संरक्षण इंटरसेप्टरवर आधारित हवाई संरक्षण प्रणाली विकसित करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात एडी – एक आणि एडी -दोन या क्षेपणास्त्रांचा विकास होत आहे. एडी – एक हे स्वदेशी इंटरसेप्टर क्षेपणास्त्र आहे. त्याची रचना लांब पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि विमानांना नष्ट करण्याच्या दृष्टीने करण्यात आली. पृथ्वीच्या वातावरणात आणि पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जाऊनही ते पाठलाग करू शकते. दोन टप्प्यातील यंत्रणेद्वारे ते संचलित होते. प्रगत नियंत्रण प्रणाली, दिशादर्शन व मार्गदर्शन व्यवस्थेमुळे हे क्षेपणास्त्र अचूक लक्ष्यभेद करू शकते, हे गतवर्षी चाचणीतून सिद्ध झाले आहे.

हेही वाचा >>>विद्यापीठाच्या प्रमाणपत्रामध्ये वडिलांच्या बरोबर आईचेही नाव यायला हवे, असा आग्रह धरणारी ‘योगिनी’ कोण होती?

क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचे महत्त्व काय?

जगात विविध क्षमतेच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची निर्मिती केली जात आहे. क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून मोठ्या क्षेत्राच्या संरक्षणासाठी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली महत्त्वाची ठरते. त्यामुळे असे हवाई संरक्षण कवच प्राप्त करण्याचा अनेकांचा प्रयत्न आहे. अमेरिका, रशिया, चीन, इस्रायल आणि भारत यासह अनेक राष्ट्रांनी क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली विकसित केली आहे, अथवा करीत आहे. भारताची दुसऱ्या टप्प्यातील ही प्रणाली पाच हजार किलोमीटर मारक क्षमतेच्या क्षेपणास्त्रांना रोखू शकते. चीन आणि पाकिस्तान या दोन शेजाऱ्यांकडून बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा विकास होत आहे. चीनकडे १५ हजार किलोमीटरहून अधिक मारा करणारी आंतरखंडीय क्षेपणास्त्रे आहेत. देशातील कुठल्याही शहरावर क्षेपणास्त्र हल्ल्याची त्याची क्षमता आहे. देशात विकसित झालेल्या प्रणालीमुळे देशातील प्रमुख शहरे तसेच महत्त्वाच्या ठिकाणांचा हवाई हल्ल्यांपासून बचाव करणे शक्य होईल. ही प्रणाली मध्यवर्ती पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना रोखू शकते. पाच हजार किलोमीटरपेक्षा अधिक पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांना निष्प्रभ करण्याची क्षमता राखणारे एडी- २ देखील विकसित होत असल्याचे सांगितले जाते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Medium range missiles coming to india will be intercepted what is phase two missile defense system print exp amy