महाराष्ट्र सरकारकडून काही दिवसांपूर्वीच राज्याच्या इतिहासात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेल्या काही ऐतिहासिक व्यक्तींच्या स्मारक बांधणीसाठी निधीची घोषणा करण्यात आली. यात प्रामुख्याने राजगडच्या पायथ्याशी राजमाता सईबाई, प्रतापगडच्या पायथ्याशी जीवा महाले यांची स्मारके बांधण्यात येणार आहे. याशिवाय हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, संत जगनाडे महाराज यांचीही स्मारके उभारण्यात येणार असून साने गुरुजी, संत गोरोबाकाका यांच्याही स्मारकांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. तर गेल्याच आठवड्यात क्रांतिगरू लहुजी साळवे यांच्या स्मारकासाठी भूमिपूजन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हातून पार पडले. या स्मारकांच्या उभारणीच्या निमित्ताने या थोर व्यक्तींच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे, त्याच निमित्ताने स्वराज्याच्या निर्मितीत आपला मोलाचा वाटा उचलणाऱ्या जीवा महाले आणि राजमाता सईबाई तसेच स्वातंत्र्य चळवळीला हातभार लावणाऱ्या लहुजी वस्ताद यांच्याविषयी जाणून घेणे समयोचित ठरावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिक वाचा: Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024: छत्रपती शिवाजी महाराजांनी बलात्काऱ्यांना कोणती शिक्षा दिली?

राजमाता सईबाई

सईबाई या छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या प्रथम पत्नी, तर संभाजी महाराजांच्या आई होय. सईबाई या माहेरच्या निंबाळकर होत्या. निंबाळकर घराणे हे फलटणचे प्रसिद्ध राजघराणे म्हणून ओळखले जाते. सईबाई या त्याच प्रथितयश निंबाळकर कुटुंबातील सदस्य होत्या. त्यांचे वडील मुधोजीराव नाईक निंबाळकर हे फलटणचे १५ वे राजे तर सईबाईंचा भाऊ बजाजीराव निंबाळकर हा १६ वा राजा होता. सईबाईंची आई रेऊबाई या आंध्र प्रदेशातील शिर्के कुटुंबातील होत्या. किंबहुना सईबाई आणि शिवाजी महाराज यांची ज्येष्ठ कन्या सकावरबाईंचा विवाह बजाजीराव निंबाळकर यांच्या मुलाशी झाला होता.

सईबाई आणि शिवाजी महाराज यांचा विवाह १६ मे १६४० रोजी लाल महाल, पुणे येथे झाला. हा विवाह सोहळा वीर जिजाबाईंच्या पुढाकाराने पार पडला होता, या विवाह सोहळ्याला शहाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचे बंधू संभाजी आणि व्यंकोजी उपस्थित राहू शकले नव्हते. सईबाई यांनी शिवाजी महाराजांच्या संपूर्ण आयुष्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्या केवळ रोजच्या घरातील व्यवहारच नाही तर राज्यकारभारातही सक्रिय होत्या. त्यांचा शिवाजी महाराजांवर लक्षणीय प्रभाव होता. शिवाजी महाराजांना विजापूरच्या मोहम्मद आदिलशाह याने भेटीसाठी बोलावले तेव्हा सईबाईंनी राज्यकारभारात सल्लागाराची भूमिका बजावली होती. १६५९ साली सईबाईंच्या अकाली मृत्यूनंतर शिवाजी महाराजांच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली. त्यांच्या मृत्यूनंतर सोयराबाईंना राजघराण्यात महत्त्व प्राप्त झालेले असले तरी, शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सईबाईंची जागा त्या घेऊ शकल्या नाहीत. एका आख्यायिकेनुसार महाराज मृत्यूशय्येवर असताना त्यांनी उच्चारलेला शेवटचा शब्द हा ‘सई’ होता. त्यांच्या एकोणीस वर्षांच्या वैवाहिक जीवनात, सईबाई आणि शिवाजी महाराज हे ‘सकवारबाई, राणूबाई, अंबिकाबाई आणि संभाजी’ अशा चार मुलांचे पालक झाले. १६५९ साली शिवाजी महाराज प्रतापगडावर अफझलखानाच्या भेटीची तयारी करत असताना राजगडावर सईबाईंचे निधन झाले. संभाजी महाराजांच्या जन्मानंतर सईबाई या आजारी असायच्या, सईबाईंच्या मृत्यूसमयी संभाजी महाराज हे दोन वर्षांचे होते. सईबाईंची समाधी राजगड किल्ल्यावर आहे.

जीवा महाले

जीवा महाले यांनी गाजवलेला पराक्रम सर्वश्रुत आहे. त्यावरूनच मराठीत म्हण रूढ झाली ‘होता जीवा म्हणून वाचला शिवा’. प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केल्यानंतर अफजल खानाच्या रक्षकाने सय्यद बंडाने महाराजांवर वार केला. त्यावेळी महाले यांनी बंडाचे हात कापून शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले होते. शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र सरकारने दांडपट्टा हे मराठाकालीन शस्त्र राज्यशस्त्र म्हणून घोषित केले. हाच दांडपट्टा चालविण्यात जीवा महाले अत्यंत तरबेज होते. सय्यद बंडाच्या हल्ल्याचा प्रतिकार त्यांनी दांडपट्टयानेच केला होता. आजही महाला समुदायात दांडपट्टा चालविणारे अनेक तरबेज सदस्य आहेत. जीवा महाले यांच्या वंशजाना १७०७ साली छत्रपती शाहू महाराजांकडून निगडे/साखरे ही गावे इनाम देण्यात आली होती.

अधिक वाचा: छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड सोडून राजधानीचे ठिकाण रायगड का निवडले? काय होते यामागील समीकरण?

लहुजी वस्ताद साळवे

१८१८ ते १८८१ या कालखंडात इंग्रजाविरुद्ध सशस्त्र क्रांतिवीर निर्माण करण्यात महत्त्वाचे योगदान लहुजी वस्ताद साळवे यांनी दिले होते. लहुजी राघोजी साळवे हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याकरिता सशस्त्र सेना घडवणारे नेतृत्व म्हणून प्रसिद्ध आहेत. यासाठीच त्यांना क्रांतिगरू म्हटले जाते. ते उत्तम कुस्तीपटू होते. म्हणूनच त्यांच्या नावामागे वस्ताद ही पदवी लावली जाते. ते पुण्यात गंज पेठ तालमीत कुस्तीचे प्रशिक्षण देत असत. क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, म. ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, सदाशिराव परांजपे, मोरो विठ्ठल वाळवेकर, पोवळे असे अनेक देशभक्त वस्ताद लहुजी साळवे यांच्याच कुस्तीच्या तालमीत तयार झाले होते. तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी अशा अनेक प्रकारचे प्रशिक्षण ते देत असत. क्रांतिकारक उमाजीराजे नाईक, वासुदेव बळवंत फडके यांच्या सशस्त्र उठावात क्रांतिगरू लहुजी वस्ताद साळवे यांनी सहकार्य केले होते. ज्योतिबा व सावित्रीबाई फुले यांनाही त्यांच्या सामाजिक उपक्रमात संरक्षण दिले होते.

क्रांतिगुरू वीर लहुजी राघोजी साळवे यांचा जन्म १४ नोव्हेंबर १७९४ रोजी पुरंदर किल्ल्याजवळील पेठ या गावी झाला होता. त्यांचे वडील ‘राघोजी’ हे पेशव्यांच्या शिकारखान्याचे प्रमुख होते. १८१८ साली पेशवाईचा अंत झाला, त्यावेळी झालेल्या अखेरच्या लढाईत राघोजी यांना वीरमरण आले. पुण्यातील त्यांची समाधी मांगीरबाबाची समाधी म्हणून ओळखली जाते. आपल्या वडिलांचा वारसा चालविणारे वस्ताद लहुजी तितकेच कर्तृत्ववान होते. स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजवणाऱ्या लहुजी वस्ताद यांनी १७ फेब्रुवारी १८८१ रोजी अखेरचा श्वास घेतला. आता या तिन्ही वंदनीय व्यक्तींचे स्मारक उभारण्यासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Memorials planned rajmata saibai jiva mahala and lahuji vastad svs
Show comments