गेल्या शुक्रवारी रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये प्राणघातक दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात १३७ पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. मॉस्कोतील क्रोकस सिटी सभागृहात एका संगीत कार्यक्रमादरम्यान नागरिकांवर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. या प्रकरणात चार संशयितांना अटक करण्यात आली. रविवारी मॉस्को न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले. रशियन मीडियाने सर्व आरोपी ताजिकिस्तानचे नागरिक असल्याचे सांगितले आहे. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी ‘इस्लामिक स्टेट ऑफ खोरसान’ या संघटनेने स्वीकारली. अटक करण्यात आलेले संशयित आरोपी कोण आहेत? कशाच्या आधारावर त्यांना अटक करण्यात आली? या हल्ल्यामागील त्यांचा उद्देश काय होता? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोणत्या आधारावर संशयितांना अटक करण्यात आली?

मॉस्कोच्या बासमनी जिल्हा न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, चारही संशयितांवर दहशतवादाचा आरोप आहे. आरोप सिद्ध झाल्यास त्यांना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. हा खटला २२ मेपर्यंत सुरू राहणार असून तोपर्यंत आरोपींना नजर कैदेत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे वृत्त ‘न्यूज१८’ ने दिले. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार, अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, हा हल्ला इस्लामिक स्टेटने केला होता. ‘इस्लामिक स्टेट ऑफ खोरसान’ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या संघटनेने हल्ल्याच्या व्हिडीओ फुटेजसह हल्लेखोरांचे फोटोदेखील जारी केले. या आधारेच संशयितांना अटक करण्यात आली.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन युक्रेनला या हल्ल्यासाठी जबाबदार धरत असून, त्यांनी आपल्या वक्तव्यात कुठेही ‘इस्लामिक स्टेट’चा उल्लेख केलेला नाही. रशियाच्या माध्यमांनीदेखील युक्रेनवर दोषारोप केले आहेत. परंतु, हे सर्व दावे युक्रेनने फेटाळून लावले आहेत.

अटक करण्यात आलेले संशयित आरोपी कोण आहेत?

मुहम्मदसोबीर फैजोव

मुहम्मदसोबीर फैजोव हा अटकेत असलेल्यांमध्ये सर्वात लहान आहे. त्याचे वय केवळ १९ वर्ष आहे. रशियन माध्यमांनी सांगितले की, तो मॉस्कोच्या ईशान्येकडील एका गावात न्हावीचे काम करतो. शनिवारी माध्यमांनी एक व्हिडीओ प्रकाशित केला होता, ज्यामध्ये हॉस्पिटलच्या बेडवर पडून असताना त्याची चौकशी केली जात होती. रविवारी ऑनलाइन प्रसारित झालेल्या छायाचित्रांमध्ये फैजोवचा एक डोळा गायब असल्याचे दिसून आले. त्याला इतर तीन संशयितांप्रमाणे व्हीलचेअरवरून न्यायालयात नेण्यात आले.

डॅलर्डझोन मिर्झोयेव

मिर्झोयेव ३२ वर्षांचा असून त्याला चार मुले आहेत. त्याच्या चौकशीच्या व्हिडीओमध्ये त्याने सांगितले की, तो मोटारवे जवळील एका वसतिगृहात मुखामद नावाच्या व्यक्तीबरोबर राहत होता. १० ते १२ दिवसांपूर्वी त्यांनी अब्दुल्लो नावाच्या एका व्यक्तीकडून कार विकत घेतली होती. मात्र, हल्ल्याबाबत तो स्पष्ट बोलला नाही. त्याच्या हवाई प्रवासाच्या माहितीनुसार, मिर्झोयेव अधूनमधून मॉस्को ते ताजिकिस्तान ये-जा करायचा. २०११ मध्ये त्याच्यावर इमिग्रेशन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल खटला चालवण्यात आला होता. कोर्टरूममधील छायाचित्रांमध्ये त्याच्या चेहऱ्यावर अनेक जखमा दिसून आल्या आहेत.

शमसीदिन फरीदुनी

चौकशीच्या व्हिडीओमध्ये २५ वर्षीय फरीदुनीने म्हटले आहे की, तो ४ मार्चला तुर्कीहून आला. त्याने स्वतःवरील आरोप कबूल केले. त्याने क्रोकस सिटी सभागृहात पैशांसाठी हल्ला केला आणि लोकांना गोळ्या घातल्याचे कबूल केले. या कामासाठी ओळख नसलेल्या एका व्यक्तीने त्याला ४.५० लाख दिल्याचेही त्याने सांगितले. ‘वॅग्नर ग्रुप’च्या जवळ असलेल्या ‘ग्रे झोन’ या टेलिग्राम वाहिनीने फरीदुनीचा एक व्हिडीओ प्रकाशित केला. यात फरीदुनी जमिनीवर पडल्याचे आणि कोणीतरी त्याच्या पायावर उभे असल्याचे दिसते. रविवारी फरीदुनीला न्यायालयात हजर केले असता, त्याच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला मोठी जखम होती.

सैदाक्रामी रचाबैलीझोडा

असलेल्या ‘ग्रे झोन’ या टेलिग्राम वाहिनीने प्रकाशित केलेल्या व्हिडीओमध्ये ३० वर्षीय सैदाक्रामीला मारहाण आणि शिवीगाळ केली जात आहे. रचाबैलीझोडा याच्या चौकशीच्या एका दृश्यात, गणवेशातील एक अधिकारी त्याच्या उजव्या कानाचा काही भाग कापतो आणि त्याच्या तोंडात भरतो. दुसर्‍या दृश्यात “आता तुझा एक कान बाकी आहे,” असा आवाज येतो. रविवारी त्याला कोर्टात हजर करण्यात आले, तेव्हा त्याच्या उजव्या कानाभोवती मोठी पट्टी, चेहऱ्यावर जखमा होत्या. न्यायालयाच्या माहितीनुसार, २०१८ मध्ये इमिग्रेशन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रचाबैलीझोडा याच्यावर कारवाई करण्यात आली होती आणि २,२५० रुपये दंडही ठोठावण्यात आला होता.

हेही वाचा : विश्लेषण : कंगना रणौतला लोकसभा उमेदवारी देण्यामागे भाजपाची भूमिका काय?

चौकशीदरम्यान चारही आरोपींचा छळ केला जात आहे, असा दावा ‘ग्रे झोन’ या टेलिग्राम वाहिनीने केला होता. त्यासंबंधित अनेक व्हिडीओजदेखील प्रकाशित करण्यात आले होते. अटकेतील चौघांपैकी तिघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचा दावा, रशियन माध्यमांनी केला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले होते की, हा हल्ला अशा दहशतवाद्यांनी घडवून आणला आहे, ज्यांची विचारसरणी इस्लामिक जगाशी संबंधित आहे. पुतिन यांनी असेही सांगितले होते की, चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे चौघेही युक्रेनच्या दिशेने जाण्याच्या प्रयत्नात होते, असा आरोपही त्यांनी केला होता.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Men behind moscow concert hall attack russia rac