Met Gala 2023 : मेट गाला फॅशन शो नुकताच संपन्न झाला. भारतात मंगळवारी सकाळी ४ वाजण्याच्या सुमारास याचे प्रक्षेपण करण्यात आले. दरवर्षी मेट गाला नंतर सोशल मीडियावर या इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या सेलेब्रिटींचे फोटो व्हायरल व्हायला सुरुवात होते. चित्रविचित्र वेशभूषा आणि फॅशनच्या पलीकडे जाऊन मेट गाला नेमके प्रकरण काय आहे? श्रीमंत व्यक्ती आणि सेलेब्रिटी ठरलेल्या कल्पनेनुसार मेट गालाच्या पार्टीत का सहभागी होतात आणि त्या पार्टीमध्ये नेमके काय केले जाते? या समारंभाचा खर्च कोण करते आणि यासाठी गोळा केलेला पैसा कुणाला दिला जातो? या सर्व प्रश्नांचा घेतलेला हा मागोवा.
मेट गाला म्हणजे काय?
गाला म्हणजे उत्सव किंवा खास समारंभ. न्यूयॉर्क शहरातील ‘मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट कॉस्च्युम इन्स्टिट्यूट’ या संस्थेकडून ‘मेट गाला’ हा निधी उभारणारा इव्हेंट आयोजित करण्यात येतो. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी न्यूयॉर्क शहरात याचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमातून गोळा झालेला निधी कॉस्च्युम इन्स्टिट्यूटसाठी वापरण्यात येतो. विशेष म्हणजे या एकाच इव्हेंटमधून कॉस्च्युम इन्स्टिट्यूटला वर्षभर पुरेल इतका निधी गोळा होतो. मेट्रोपॉलिटन म्युझियमकडून आयोजित करण्यात आलेल्या या समारंभास केवळ निमंत्रित केलेल्या लोकांनाच येण्याची परवानगी आहे. जगभरातील काही निवडक सेलेब्रिटी या कार्यक्रमात सहभाग घेतात. भाग घेतलेल्या सेलेब्रिटींना ठरलेल्या थीमनुसार वेशभुषा करून यावी लागते. त्या त्या वर्षी ठरलेली थीम ही कॉस्च्युम इन्स्टिट्यूटच्या प्रदर्शनाचा विषयदेखील असते.
या वेळी जवळपास ४०० लोकांना मेट गालासाठी निमंत्रित केले गेले आहे. ‘कार्ल लेगरफेल्ड: अ लाइन ऑफ ब्युटी’ ही थीम वेशभूषा करण्यासाठी ठरविण्यात आली आहे. फॅशन डिझायनर लेगरफेल्ड यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी यंदा त्यांच्या नावाने ही थीम ठरविण्यात आली. लेगरफेल्ड हे स्वतः मेट गालामध्ये सहभागी होत होते. शनेल आणि फेंडी या ब्रॅण्डसोबत त्यांनी काम केले होते. मेट गालाने कॉस्च्युम इन्स्टिट्यूटसाठी निधी गोळा करण्यासाठी सुरू केलेल्या या कार्यक्रमामुळे फॅशन आणि क्रिएटिव्हीटीला खूप वाव मिळाला आहे.
हे वाचा >> प्रियांका चोप्राने ‘मेट गाला’मध्ये घातला हिऱ्यांचा महागडा हार; कोटीत नाही तर अरबो रुपयांत आहे किंमत
कॉस्च्युम इन्स्टिट्यूट काय आहे?
म्युझियमच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, कॉस्च्युम इन्स्टिट्यूटकडे पंधराव्या शतकापासूनचे पुरुष, महिला आणि मुलांच्या वेशभूषेशी निगडित जवळपास ३३ हजार कपड्यांचे नमुने आहेत. कॉस्च्युम आर्ट म्हणून या म्युझियमची सुरुवात १९३७ साली झाली होती. १९४६ साली, फॅशन उद्योगाकडून आर्थिक मदत घेऊन ‘म्युझियम ऑफ कॉस्च्युम आर्ट’चे विलीनीकरण ‘द मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट’मध्ये करण्यात आले आहे.
मेट गालामधून निधी कसा उभारला जातो?
मेट गालासाठी दरवर्षी अनेक प्रायोजक मिळतात. या वर्षी शनेल मुख्य प्रायोजक आहे. तसेच फेन्डी, कोंडे नास्ट आणि लेगरफोल्ड सहप्रायोजक आहेत. तसेच तिकीट आणि टेबल विक्रीतूनही निधी उभारला जातो. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी एका तिकिटाची रक्कम ५० हजार डॉलर (भारतीय रुपयांमध्ये ४० लाख ८८ हजार) एवढी आहे. तर एका टेबलची किंमत तीन लाख डॉलरपासून सुरू होते. मेट गालामधील टेबल शक्यतो मोठे फॅशन ब्रॅण्ड विकत घेतात. मागच्या वर्षी मेट गालाच्या माध्यमातून १७.४ दशलक्ष डॉलरचा निधी उभारण्यात आला होता, अशी माहिती ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिली आहे.
मेट गालाचा एवढा बोलबाला कशासाठी?
मेट गालाला सध्या जगभर जेवढी प्रसिद्धी मिळत आहे, तेवढी ती आधी बिलकूल मिळत नव्हती. १९४८ साली, फॅशनचा प्रचार करणारे एलनॉर लॅम्बर्ट (Eleanor Lambert) यांनी न्यूयॉर्कमधील श्रीमंतांना रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित करून निधी गोळा करण्याचा विचार केला. त्या वेळी तिकिटाची रक्कम ५० डॉलर एवढी होती. १९७२ साली फॅशन स्तंभलेखिका डायना व्रीलॅण्ड (Diana Vreeland) यांची कॉस्च्युम इन्स्टिट्यूटच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली. डायना यांनी न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध व्यक्ती आणि सेलेब्रिटींना निमंत्रित करण्याचा आणि वार्षिक थीम ठेवून त्याप्रमाणे वेशभूषा करण्याचा पायंडा पाडला.
या वर्षीच्या मेट गालामध्ये प्रियंका चोप्रा आणि आलिया भट्ट यांनी सहभाग घेतला आहे. मेट गालाकडून दरवर्षी काही पाहुण्यांनाही निमंत्रित करण्यात येते. या वर्षी पत्रकार ॲना विन्टॉर (Anna Wintour), अभिनेत्री पेनेलोप क्रूझ (Penélope Cruz), पटकथालेखक मायकेल कोएल (Michaela Coel), गायिका डुआ लिपा (Dua Lipa) आणि टेनिस खेळाडू रॉजर फेडरर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. मेट गालामध्ये मोबाइल फोन आणण्यास मनाई आहे. रेड कार्पेटवर फोटो काढल्यानंतर आतमधील सोहळा बाहेरील कुणालाही पाहता येत नाही. या सोहळ्यात निमंत्रित केलेल्या पाहुण्यांचे मनोरंजन करण्यासाठी प्रसिद्ध कलाकारांना पाचारण करण्यात आलेले असते.