समाजमाध्यमं आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनली आहेत. कित्येक लोकांच्या दिवसाची सुरुवात आजघडीला ‘व्हॉट्सॲप’, ‘फेसबुक’, ‘ट्विटर’, ‘इन्स्टाग्राम’सारख्या सोशल मीडिया ॲप्सने होते. ‘इन्स्टाग्राम’, ‘ट्विटर’सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स तर कित्येक लोकांसाठी पैसे कमावण्याचे साधन बनले आहे. लोकांच्या जीवनावर सोशल मीडियाचा प्रभाव वाढत असला तरी या क्षेत्रातही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढली आहे. या क्षेत्रातील ‘मेटा’ या आघाडीच्या कंपनीने ‘ट्विटर’ या मायक्रोब्लॉगिंग साइटला टक्कर देण्याचे ठरवले आहे. ‘मेटा’ या कंपनीकडून ‘ट्विटर’प्रमाणेच आणखी एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू केला जाणार आहे. तशी चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर ‘मेटा’कडून सुरू करण्यात येणाऱ्या नव्या सोशल मीडिया ॲपचे नाव काय आहे? या नव्या सोशल मीडियामुळे ट्विटरवर काय परिणाम होणार? हे नवे माध्यम कशा प्रकारे काम करणार? हे जाणून घेऊ या…
हेही वाचा >> आयर्लंडने मद्याच्या बाटल्यांवर आरोग्याबाबत सावधानतेचा इशारा छापण्याचा निर्णय का घेतला?
‘मेटा’ देणार ट्विटरला टक्कर?
सोशल मीडिया क्षेत्रात ‘मेटा’ या कंपनीचे वर्चस्व पाहायला मिळते. ‘व्हॉट्सॲप’, ‘फेसबुक’, ‘इन्स्टाग्राम’ यांसारखे जगप्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘मेटा’ या कंपनीच्या मालकीचे आहेत. हे तीनही प्लॅटफॉर्म जनसामान्यांत फार लोकप्रिय आहे. ‘ट्विटर’ या मायक्रोब्लॉगिंग साइटलाही ‘फेसबुक’, ‘इन्स्टाग्राम’प्रमाणेच किंबहुना तेवढेच महत्त्व आहे. याच कारणामुळे ट्विटरला टक्कर देण्यासाठी आतापर्यंत बाजारात अनेक सोशल मीडिया ॲप्स आलेले आहेत. यामध्ये ब्लू स्काय, टीटू, मास्टोडोन ही यातील प्रमुख नावे आहेत. असे असतानाच ट्विटरशी स्पर्धा करण्यासाठी ‘मेटा’ कंपनी नवे सोशल मीडिया ॲप जारी करण्याची शक्यता आहे. या सोशल मीडिया ॲपचे नेमके नाव, अद्यापि समजू शकलेले नाही. मात्र सध्या तरी पीएन ९२, प्रोजेक्ट ९२, बार्सिलोना या सांकेतिक नावाने या सोशल मीडिया ॲपला ओळखले जात आहे. ‘इन्स्टाग्राम फॉर युअर थॉट्स’ अशी या ॲपची टॅगलाइन आहे. जून महिन्यापर्यंत हे ॲप लॉन्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा >> पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांनी मोदींचे चरणस्पर्श करून घेतले आशीर्वाद; हे बेट भारतासाठी महत्त्वाचे का आहे?
‘मेटा’च्या नव्या ॲपची विशेषता काय?
हे ॲप ‘इन्स्टाग्राम’पेक्षा वेगळे असेल. मात्र या ॲपला ‘इन्स्टाग्राम’शी लिंक करता येईल. या ॲपवर खाते उघडल्यानंतर खातेधारकाच्या ‘इन्स्टाग्राम’वर त्याचे नोटिफिकेशन जारी होईल. ॲप लॉन्च झाल्यानंतर ते सुरुवाताला काही क्रिएटर्सना वापरण्याची परवानगी दिली जाईल. सध्या तरी ‘मेटा’कडून सेलिब्रेटी तसेच अन्य एन्फ्लुएन्सर्सकडून या ॲपबद्दलची मतं जाणून घेतली जात आहेत. या ॲपवर सध्या काम सुरू असल्याचे म्हटले जात आहे. लॉस एंजेलिस यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये सोशल मीडिया आणि एन्फ्लुएन्सर मार्केटिंग शिकवणाऱ्या लिया हॅबरमॅन यांनी ‘मेटा’च्या या नव्या ॲपबद्दल ट्वीटच्या माध्यमातून अधिक माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अन्य सोशल मीडिया ॲप्स वापरकर्तेदेखील ‘मेटा’च्या नव्या ॲपवरील एन्फ्लुएन्सर्सना फॉलो करू शकतील.
मेटाचे नवे ॲप कसे काम करणार?
लिया हॅबरमॅन यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘मेटा’च्या नव्या सोशल मीडिया ॲपवर ५०० अक्षरांची मर्यादा असेल. यासह या ॲपवर फोटो आणि व्हिडीओदेखील पोस्ट करता येतील. या ॲपवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली आहे. उदाहरणादाखल इन्स्टाग्रामवर जे अकाऊंट्स ब्लॉक करण्यात आलेले आहेत, ते अकाऊंट्स या नव्या ॲपवरही ब्लॉक करण्यात येतील.
हेही वाचा >> विश्लेषण: कृत्रिम साखर आरोग्यासाठी किती घातक? जागतिक आरोग्य संघटनेचा कोणता इशारा?
‘मेटा’चे ॲप ट्विटरसाठी ठरणार पर्याय?
“मला मिळालेल्या माहितीनुसार ‘मेटा’चे नवे ॲप ट्विटरप्रमाणेच आहे. सध्या तरी लोक या नव्या ॲपला कसा प्रतिसाद देतील हे सांगणे कठीण आहे. मात्र ट्विटरसाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो,” असे हॅबरमॅन ट्वीटद्वारे म्हणाल्या आहेत. एलॉन मस्क यांनी ट्विटरमध्ये बरेच बदल करण्याचे संकेत दिलेले आहेत. मात्र ‘मेटा’चा इतिहास पाहता नव्या ॲपमध्ये हे बदल तुलनेने लवकर केले जाण्याची शक्यता आहे, असेदेखील हॅबरमॅन म्हणाल्या आहेत.