प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शेर शिवराज’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध कसा केला हे पाहायला मिळणार आहे. येत्या २२ एप्रिलला ‘शेर शिवराज’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी शेर शिवराज या चित्रपटाचा ट्रेलर मेटावूडच्या सहकार्याने मेटाव्हर्समध्ये प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे ‘शेर शिवराज’ हा मेटाव्हर्सद्वारे लाँच होणारा पहिलाच मराठी चित्रपट ठरला. यामुळे या चित्रपटाचे विशेष कौतुक केले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर शेर शिवराज या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा या चित्रपटाचा ट्रेलर मूव्ही स्टुडिओ आणि यूएफओ मुव्हीज यांच्याबरोबरच मेटावूडच्या सहकार्याने मेटाव्हर्स प्रदर्शित झाला. यामुळे शेर शिवराजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पण त्यानंतर अनेकांना मेटाव्हर्स म्हणजे काय? असा प्रश्न पडला आहे. आज या निमित्ताने आपण मेटाव्हर्स ही संकल्पना नेमकी काय? मेटावूड म्हणजे काय? हे जाणून घेणार आहोत.

मेटाव्हर्स तंत्रज्ञान म्हणजे काय?

गेल्या काही वर्षांपासून तंत्रज्ञान क्षेत्रात बरीच प्रगती होत आहे. त्यामुळे आता या डिजीटल युगात कोणतीही गोष्ट अशक्य राहिलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून ‘मेटाव्हर्स’ नावाच्या संकल्पनेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. मेटाव्हर्स हा सोशल मीडियावरील फार महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. मेटाव्हर्स हे एक वेगळं जग असून ते पूर्णपणे इंटरनेटवर अवलंबून असणार आहे.

मेटाव्हर्स हे एक विशिष्ट तंत्रज्ञान नसून ती एक संकल्पना आहे. एका आभासी विश्वात संवाद साधण्याचे किंवा माहितीची देवाणघेवाण करण्याचे माध्यम म्हणून मेटाव्हर्सकडे पाहिले जाते. आतापर्यंत आपल्याला केवळ स्क्रीनद्वारे एखाद्या गोष्टीचा अनुभव घेता येत होता. पण आता मात्र स्क्रीनच्या पलीकडे असणारे जग अनुभवता येणार आहे.

एका आभासी तंत्रज्ञानाद्वारे ओळख तयार करुन त्याद्वारे संवाद साधण्याचे माध्यम म्हणून मेटाव्हर्सकडे पाहिलं जातं. वेब ३.० हे नव्याने आलेले इंटरनेटचे युग आहे. वेब ३.० मध्ये फाइव्ह जी, ब्लॉकचेन, ऑगमेन्टेड रिअ‍ॅलिटी, व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी यांसारख्या तंत्रज्ञानाचा समावेश असेल. हे तंत्रज्ञानदेखील थेट मेटाव्हर्सशी निगडितच आहे. वेब ३.० मध्ये युजर्स कोणत्याही कंपनी किंवा व्यक्तीशिवाय विविध सोयी-सुविधांचा थेट लाभ घेऊ शकणार आहेत.

मेटावूडबद्दल थोडक्यात माहिती

मेटावूड हे भारतातील पहिले एकात्मिक चित्रपट मेटाव्हर्स, NFT आणि ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म आहे. याची निर्मिती मनोरंजन आणि चित्रपट रसिक असलेल्या तंत्रज्ञान तज्ज्ञांनी केली आहे. मेटाव्हर्स सर्व चित्रपट रसिकांसाठी एक गो-टू व्यासपीठ असणार आहे. ज्यामुळे प्रेक्षकांना एका वेगळ्या रुपात चित्रपटाचा अनुभव घेता येणार आहे.

‘शेर शिवराज’ आणि मेटाव्हर्स

‘शेर शिवराज’ या ऐतिहसिक मराठी चित्रपटाचा ट्रेलर मेटाव्हर्सच्या माध्यमातून दाखवला गेल्यानंतर सर्वत्र त्याची चर्चा सुरु झाली. मेटाव्हर्स तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दाखविण्यात आलेला हा पहिलाच मराठी चित्रपटाचा ट्रेलर ठरला. मुंबई मुवी स्टूडियोज आणि यूएफओ मुव्हीज यांनी ‘शेर शिवराज’ या मराठी चित्रपटाकरिता मेटावूडसोबत भागीदारी केली आहे. तंत्रज्ञानाशी सांगड घालत आपला दैदिप्यमान इतिहास भविष्यातील पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवता यावा, यासाठी हा प्रयत्न करण्यात आला.

शेर शिवराज या चित्रपटाचा ट्रेलर मेटाव्हर्समध्ये पाहताना तुम्हाला एका आभासी जगाचा अनुभव घेता येतो. यासाठी युजर्सला https://metawood.life/metaverse या लिंकवर क्लिक करावे लागेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला शेर शिवराजच्या पोस्टर पाहायला मिळेल. त्यावर दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर तुमचे नाव आणि इतर माहिती भरल्यानंतर तुमच्या समोर एक व्हर्च्युअल रिअॅलिटीद्वारे उभं करण्यात आलेले एक जग अनुभवता येईल.

त्या ठिकाणी तुमचा एक डिजीटल अवतार असेल. या आभासी जगाचा तुम्ही इतर युजर्ससोबत अनुभव घेऊ शकता. या चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासोबत तुम्ही याद्वारे प्रतापगड किल्लाही फिरु शकणार आहात. विशेष म्हणजे या चित्रपटाचे निर्माते चित्रपटाचे डिजीटल संग्रहण आणि NFT लाँच करण्याची योजना आखत आहेत. यामुळे चाहत्यांना चित्रपटाची आभासी आठवण ठेवता येणार आहे.

‘केजीएफ २’ आणि ‘राधे श्याम’ चा ट्रेलरही मेटाव्हर्सवर लाँच

विशेष म्हणजे शेर शिवराज या चित्रपटापूर्वी अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचा ट्रेलर मेटाव्हर्सद्वारे लाँच करण्यात आले आहेत. यात दाक्षिणात्य अभिनेता यश मुख्य भूमिका असलेला ‘केजीएफ २’ या चित्रपटाचा समावेश आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा ट्रेलर मेटाव्हर्सद्वारे प्रदर्शित झाला होता.

यात अनेक युजर्सने मेटाव्हर्सचा वापर करत डिजीटल अवतार निर्माण केले होते. यामुळे चाहत्यांना ‘रॉकी भाई’ या पात्राचा आभासी अनुभव घेता आला होता. त्यासोबतच अभिनेता प्रभासचा ‘राधे श्याम’ या चित्रपटाचा ट्रेलरही मेटावूडच्या मेटाव्हर्सद्वारे प्रदर्शित करण्यात आला होता. अनेकांनी या आभासी जगाचाही अनुभव घेतला होता.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Metawood launches sher shivraj first marathi movie trailer in metaverse know what is meaning and all about nrp