मंगल हनवते
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) कांजूरमार्ग येथील वादग्रस्त जागेपैकी १५ हेक्टर जागा ‘स्वामी समर्थ नगर – विक्रोळी मेट्रो ६’ मार्गिकेतील कारशेडसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध होताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि आरे वाचवा आंदोलक आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयाला त्यांनी जोरदार विरोध केला आहे. कांजूरमार्ग येथे एकात्मिक कारशेड न उभारता वेगवेगळ्या ठिकाणी चार कारशेड उभारून आसपासच्या जागा आणि कांजूर येथील उर्वरित जागा खासगी विकासकांसाठी मोकळ्या करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप यानिमित्ताने होत आहे. तर पुन्हा एकदा ‘आरे वाचवा’ची हाक देण्यात आली असून आरेतील कारशेड कांजूरला हलविण्याची मागणी होत आहे. कांजूरबाबतचा सरकारचा नवीन निर्णय काय आहे आणि त्याचा परिणाम काय होणार याचा हा आढावा…
‘मेट्रो ६’ मार्गिकेची कारशेड सुरुवातीपासूनच कांजूरमध्ये प्रस्तावित?
मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील ३३७ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकेच्या जाळ्यात स्वामी समर्थ नगर – विक्रोळी (कांजूर मार्ग) दरम्यान १५.३१ किमी लांबीची ‘मेट्रो ६’ मार्गिका प्रस्तावित आहे. या मार्गिकेत १३ मेट्रो स्थानकांचा समावेश असून यासाठी अंदाजे ६६७२ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. एमएमआरडीएने या मार्गिकेतील कारशेड पूर्व द्रुतगती मार्गालगतच्या कांजूरमार्ग येथील मोकळ्या जागेवर प्रस्तावित केली आहे. महत्त्वाचे म्हणजे यासंबंधीच्या प्रस्तावाला २०१६मध्येच तत्कालीन फडणवीस सरकारने मंजुरी दिली. एमएमआरडीए आरे वसाहतीमध्ये कारशेड बांधण्याच्या कामाला सुरुवात करणार तेवढ्यात मोठ्या वादात तोंड फुटले. न्यायालयाने एमएमआरडीएच्या कामाला स्थगिती दिली आणि आजवर कांजूरमधील कारशेडचे काम सुरू होऊ शकलेले नाही.
कांजूरच्या जागेचा वाद नेमका काय? ‘मेट्रो ६’ची कारशेड का रखडली?
सरकारने परवानगी दिल्यानंतर एमएमआरडीएने ‘मेट्रो ६’च्या कारशेडच्या कामाला सुरुवात करण्याची तयारी सुरू केली. दरम्यान, आरे कारशेडला २०१४पासून जोरदार विरोध होत असल्याने सरकारची समिती आणि ‘आरे वाचवा’ आंदोलकांकडून पर्यायी जागा सुचविण्यात येत होती. त्यानुसार ‘मेट्रो ६’ची कारशेड आणि ‘मेट्रो ३’ची कारशेड एकत्र बांधण्याचा पर्याय पुढे आला. पुढे २०२०मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे जंगल वाचविण्याच्या दृष्टीने आरेमधील कारशेड कांजूरला हलविण्याचा निर्णय घेतला. कांजूर येथील ४१ हेक्टर जागा मध्यवर्ती असल्याने आणि येथून ‘बदलापूर-कांजूरमार्ग मेट्रो १४’ आणि ‘वडाळा – कासारवडवली मेट्रो ४’ मार्गिका जात असल्याने येथे मेट्रो ३, ४, ६ तसेच १४ मार्गिकांसाठी एकात्मिक कारशेड बांधण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला. ठाकरे यांच्या निर्णयाचे मुंबईकर, आरे आंदोलकांनी स्वागत केले. मात्र हा निर्णय भाजपला मान्य नव्हता. भाजपने याला जोरदार विरोध केला. यात केंद्र सरकारने हस्तक्षेप करीत ही जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा केला आणि थेट उच्च न्यायालयात धाव घेतली. यात काही खासगी विकासकांनीही उडी मारली आणि जागेवर मालकी दावा केला. अखेर आरेप्रमाणे ही कारशेडही वादात अडकली आणि एकात्मिक कारशेड बारगळली. पण महत्त्वाचे म्हणजे ‘मेट्रो ६’ मार्गिकेच्या कारशेडचा प्रश्न अधांतरीच राहिला.
कांजूरची जागा मिळविण्यात अखेर एमएमआरडीए यशस्वी?
मुळात कांजूरची जागा ‘मेट्रो ६’ कारशेडसाठी प्रस्तावित होती. असे असताना ‘मेट्रो ३’ची कारशेड येथे हलविण्यात आली. त्याचा फटका ‘मेट्रो ६’च्या कारशेडला बसला. एमएमआरडीएने या मार्गिकेचे काम वेगात सुरू केले. तसेच २०२५ मध्ये ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन होते. मात्र कारशेड रखडली होती. त्यामुळे एमएमआरडीएची चिंता वाढत होती. दरम्यान, एमएमआरडीएने पहाडी गारेगावसह अन्य काही पर्यायांची चाचपणी केली होती. मात्र कांजुरमार्गच योग्य असल्याचे स्पष्ट करीत एमएमआरडीएने ही जागा मिळावी यासाठी सातत्याने केंद्र आणि राज्याकडे पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला अखेर यश आले. राज्य सरकारने ४१ हेक्टरमधील १५ हेक्टर जागा ‘मेट्रो ६’च्या कारशेडसाठी देण्यास हिरवा कंदिल दाखविला. त्यानुसार महसूल विभागाने लेखी आदेश काढून ही जागा एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याचे आदेश मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली असून लवकरच ही जागा एमएमआरडीएकडे वर्ग करण्यात येणार आहे. केवळ एक हमीपत्र घेऊन ही जागा एमएमआरीडएच्या ताब्यात देण्यात येणार आहे. ही जागा ताब्यात आल्यानंतर एमएमआरडीए तात्काळ कारशेडच्या कामासाठी निविदा मागविण्याची शक्यता आहे.
मेट्रो ६ ला जागा दिल्यानंतर आरोप-प्रत्यारोप कशासाठी?
‘मेट्रो ६’च्या कारशेडसाठी जागा दिल्यानंतर आदित्य ठाकरे आणि ‘आरे वाचवा’ आंदोलक आक्रमक झाले आहेत. एकीकडे ‘मेट्रो ६’च्या कारशेडसाठी कांजूरची जागा देण्यात आली, तर दुसरीकडे विविध कारणे पुढे करीत ‘मेट्रो ३’ वा एकात्मिक कारशेडसाठी ही जागा नाकारण्यात आली होती. ही मुंबईकरांची घोर फसवणूक असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आरे जंगल वाचविण्याऐवजी आरे आणि कांजूरमधील जागा कारशेडच्या नावाखाली मोकळ्या करून त्या खासगी विकासकांच्या घशात घालण्याचा डाव आखल्याचा आरोप आदित्य ठाकरे आणि ‘आरे वाचवा’ आंदोलकांनी केला आहे. आरेमधील जंगल आजही वाचविता येईल. त्यासाठी आरेमध्ये होऊ घातलेली कारशेड तात्काळ रद्द करून ती कांजूरला हलवावी आणि तिथे एकात्मिक कारशेड बांधावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच एकात्मिक कारशेड रद्द झाल्याने अंदाजे १० हजार कोटी रुपयांचा फटका बसणार असल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्याचवेळी कांजूरमध्ये एकात्मिक कारशेड व्हावी यासाठी पुन्हा आंदोलन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागेवरून वादही चिघळण्याची चिन्हे आहेत. नेमके काय होते हे येणाऱ्या दिवसात समजेल. असे असले तरी आता ‘मेट्रो ६’च्या कारशेडचा मार्ग मात्र मोकळा झाला असून एमएमआरडीएला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.