दिल्लीतील ग्रेटर नोएडा येथे २५ ऑक्टोबर रोजी मेथॅम्फेटामाइन लॅबचा पर्दाफाश करण्यात आला. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकांनी या प्रयोगशाळेवर छापा टाकून सुमारे ९५ किलो मेथाम्फेटामाइन जप्त केले. अहवालात असेही नोंदविण्यात आले होते की, तिहार जेल वॉर्डन, दिल्लीतील एक व्यापारी व मुंबईतील केमिस्ट ही प्रयोगशाळा चालवत होते. मेक्सिकोच्या सर्वांत कुप्रसिद्ध असणार्‍या ड्रग कार्टेलपैकी कार्टेल डी जॅलिस्को नुएवा जेनेराशियन (सीजेएनजी)चे सदस्य या अवैध प्रयोगशाळेशी जोडलेले होते, असे ‘इंडिया टुडे’च्या वृत्तात देण्यात आले आहे. पोलीस अधिकार्‍यांनी प्रयोगशाळेचा पर्दाफाश कसा केला? या प्रकरणाचा तिहार तुरुंग आणि मेक्सिको कार्टेलशी काय संबंध? त्याविषयी जाणून घेऊ.

प्रकरण काय?

एनसीबी आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने ग्रेटर नोएडा औद्योगिक साइटवर छापा टाकत जवळपास ९५ किलोग्राम ड्रग्ज जप्त केले. या प्रकरणात त्यांनी मेक्सिकन नागरिक आणि तिहार तुरुंगातील वॉर्डरसह पाच जणांना अटक केली. ‘एनसीबी’ने एका निवेदनात म्हटले आहे की, २५ ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील कासना औद्योगिक परिसरातल्या या प्रयोगशाळेचा पर्दाफाश करण्यात आला. या प्रसंगी घन आणि द्रव असे दोन्ही प्रकारचे सुमारे ९५ किलो घातक मेथॅम्फेटामाइन जप्त करण्यात आले. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने फेडरल अँटी-नार्कोटिक्स एजन्सीला मदत केली. कारण- हे ड्रग नेटवर्क दिल्लीतील अनेक भागांत पसरले होते.

हेही वाचा : गरोदर महिला आणि मुलांसाठी ‘U-WIN Portal’ची सुरुवात; याचा कसा होणार फायदा?

प्रकरणाचे तिहार कनेक्शन

एनसीबी उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांच्या म्हणण्यानुसार, छाप्यादरम्यान पकडलेल्या दिल्लीतील एका व्यावसायिकाने बेकायदा लॅब सुरू करण्यासाठी ड्रग्जसाठी लागणारी रसायने विविध स्रोतांकडून खरेदी करण्यासाठी आणि यंत्रसामग्री आयात करण्यासाठी तिहार तुरुंगातील वॉर्डनची मदत घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सिंग यांनी पुढे सांगितले की, मुंबईतील एका केमिस्टला ड्रग्ज तयार करण्यासाठी कंपनीने नियुक्त केले होते. या ड्रग्जची गुणवत्ता तपासणी दिल्लीत राहणाऱ्या मेक्सिकन कार्टेल सदस्याने केली होती. चार संशयितांना २७ ऑक्टोबर रोजी विशेष नार्कोटिक ड्रग्स अॅण्ड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायदा न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्यांनी तीन दिवसांची एनसीबी कोठडी सुनावण्यात आली.

मेक्सिको ड्रग कार्टेलचा संबंध

ग्रेटर नोएडामधील गुप्त प्रयोगशाळा जॅलिस्को न्यू जनरेशन कार्टेल (सीजेएनजी) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मेक्सिकन ड्रग कार्टेलशी जोडलेली होती. ही मिलेनियो कार्टेलची एक शाखा आहे, जी मेक्सिकोच्या सर्वांत भयंकर गुन्हेगारी गटांपैकी एक आहे. ‘सीजेएनजी’वर हिंसाचार आणि धमकावण्याचे अनेक आरोप आहेत. दिल्लीत राहणाऱ्या एका मेक्सिकन कार्टेल सदस्याने ग्रेटर नोएडा लॅबमध्ये मेथॅम्फेटामाइनची कथितरीत्या चाचणी केली आणि पुढील तपासात प्रयोगशाळा व सीजेएनजी यांच्यातील संबंधांची पुष्टी झाली. त्याच्या व्यापक ड्रग-तस्करी ऑपरेशन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘सीजेएनजी’ने २०१० मध्ये मिलेनियो कार्टेलपासून विभक्त झाल्यापासून, अमेरिका, युरोप आणि आता भारतासह ३० हून अधिक देशांमध्ये स्वतःचा विस्तार केला आहे. मेक्सिकोच्या मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांपैकी एक आणि अमेरिकेचे लक्ष्य असणार्‍या एल. मेन्चो याने या गटाची सुरुवात केली होती. अनेक तज्ज्ञांनी ‘डेली बीस्ट’ला सांगितले की, या गटाच्या बूट कॅम्पमध्ये तीन ते चार महिन्यांत भरती करणाऱ्यांना नरभक्षक कृत्ये करण्यास भाग पाडले जाते. मुख्य म्हणजे ते प्रशिक्षण देताना मानवी मांस खाण्यासही भाग पाडतात, असेही अनेक वृत्तपत्रांत सांगण्यात आले आहे.

ग्रेटर नोएडामधील गुप्त प्रयोगशाळा जॅलिस्को न्यू जनरेशन कार्टेल (सीजेएनजी) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मेक्सिकन ड्रग कार्टेलशी जोडलेली होती. (छायाचित्र-रॉयटर्स)

कारवाई करणे कसे शक्य झाले?

ग्रेटर नोएडा प्रयोगशाळेतील छाप्यात ॲसिटोन, सोडियम हायड्रॉक्साईड, मिथिलीन क्लोराईड, इथेनॉल, टोल्युइन, रेड फॉस्फरस, इथाईल अॅसिटेट आणि विशेष यंत्रसामग्रीसह कृत्रिम औषध निर्मितीसाठी आवश्यक असलेली विविध रसायनेदेखील मिळाली, असे कारवाई केलेल्या यंत्रणेने सांगितले. एनसीबीचे ज्ञानेश्वर सिंग यांच्या म्हणण्यानुसार, आता पुढील तपास या अमली पदार्थांच्या नेटवर्कचा शोध घेण्यावर केंद्रित आहे. या महिन्याच्या सुरुवातीला एनसीबीने भोपाळमधून ९०७ किलो मेफेड्रोन जप्त केले आणि ग्रेटर नोएडा छाप्यात मदत करणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने अलीकडेच महिपालपूर एक्स्टेन्शनमधील एका गोदामातून ५६२ किलो कोकेन जप्त केले, ज्याची किंमत दोन हजार कोटी रुपये होती.

परदेशी लोक मेथ लॅब स्थापन करण्यासाठी ग्रेटर नोएडाची निवड का करतात?

कमी घनतेचे निवासी क्षेत्र आणि दिल्लीशी स्ट्रॅटेजिक कनेक्टिव्हिटीमुळे ग्रेटर नोएडा गुप्त मेथॅम्फेटामाइन प्रयोगशाळा उभारण्यासाठी एक लोकप्रिय ठिकाण ठरत आले आहे, असे अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी ‘पीटीआय’ला सांगितले. मेथ लॅबसाठी वापरल्या जाणाऱ्या भाड्याने घेण्यात येणार्‍या जागा थोड्या वेगळ्या असतात. मेथ उत्पादनादरम्यान तीव्र वास निर्माण होतो. त्यामुळे कमीत कमी तीन बाजूंनी मोकळ्या असणार्‍या जागेत प्रयोगशाळा उभारली जाते. ग्रेटर नोएडाची निवड करण्याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे आवश्यक घटकांची उपलब्धता; ज्यांचा परदेशात स्रोत मिळणे कठीण आहे. अत्यंत उत्तेजक असणारे एफेड्रिन हे औषध एनडीपीएस कायद्यांतर्गत प्रतिबंधित आहे आणि ज्याच्या विक्रीवर सरकारनेही बंदी घातली आहे. परंतु, काही निर्बंधांसह तांत्रिकदृष्ट्या फार्मास्युटिकल उद्देशांसाठी या औषधाचा वापर आजही केला जातो. एफेड्रिनची किंमत प्रतिकिलो ८० ते ९० हजारांच्या दरम्यान आहे. युरोपमध्ये त्याची किंमत आठ ते १० लाख रुपये प्रतिकिलो आहे आणि युरोपमध्ये हे औषध खरेदी करण्यासंबंधी अनेक नियमही आहेत. परंतु, काळ्या बाजारात भारतातील एफेड्रिनची किंमत प्रतिकिलो दोन ते तीन लाखांपर्यंत आहे.

हेही वाचा : ‘या’ देशात लग्नासाठी मुलांना मुलीच मिळेनात; ३.५ कोटी मुलांवर एकटे राहण्याची वेळ? कारण काय?

“येथे काम करून नफा मार्जिन दुप्पट आहे. तसेच, मेथ हे कोकेनपेक्षा दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत महागडे ड्रग आहे आणि ग्रेटर नोएडामध्ये तयार करण्यात येणारे ड्रग विकण्यासाठी नव्हे, तर निर्यातीसाठी तयार करण्यात येत होते,” असे अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले. एनसीबीच्या म्हणण्यानुसार, हे गट औद्योगिक भागात मोठ्या प्रमाणावर प्रयोगशाळा उभारत आहेत. या सेटअपमुळे त्यांना यंत्रसामग्री व रसायनांची वाहतूक करणे आणि प्रयोगशाळेतील कचऱ्याची विल्हेवाट लावणे, तसेच रासायनिक प्रक्रियांमधून धूर सोडणे शक्य होत आहे. कारण- अशा झोनमध्ये या गोष्टी सामान्य आहेत.