-मंगल हनवते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

म्हाडा कोकण मंडळाने काढलेल्या २०१८च्या सोडतीमधील ठाणे शहरातील बाळकुम येथील घरांच्या किमतीत मंडळाने १६ लाख रुपयांनी वाढ केली आहे. वाहनतळ, पाणी पुरवठा, व्याज आणि मेट्रो उपकर याचा भार मंडळाने बाळकुममधील विजेत्यांवर टाकला आहे. ही भरमसाट वाढ पाहता विजेते चिंतेत पडले आहेत. किमती कमी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मात्र म्हाडा आणि सरकारने मात्र या मागणीस प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे आता या विजेत्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनानंतर किमती कमी होतील का, बाळकुममधील घरांच्या किमती का वाढल्या अशा प्रश्नांचा आढावा.

बाळकुममधील घरांसाठी सोडत कधी निघाली होती?

म्हाडाच्या कोकण मंडळाकडून २०१८मध्ये ९०१८ घरांसाठी सोडत काढण्यात आली. या सोडतीत अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च अशा सर्व गटातील घरांचा समावेश आहे. पंतप्रधान आवास योजना, म्हाडा गृहप्रकल्प आणि २० टक्के योजनेतील ही घरे आहेत. याच घरांमध्ये मध्यम उत्पन्न गटातील १२५ घरांचा समावेश आहे. या घरांसाठी ४३ लाख ४५ हजार २३६ रुपये अशी निश्चित करण्यात आली होती. या घरांसाठी अर्जदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

या प्रकल्पात स्थानिकांनाही घरे का?

मध्यम उत्पन्न गटातील १२५ घरांचा समावेश असलेल्या या गृहप्रकल्पात आणखी ६९ घरे आहेत. ज्या भूखंडावर ही इमारत बांधण्यात आली आहे, तेथे एक गृहयोजना नियोजित होती. त्यासाठी ७६ लाभार्थ्यांकडून १० टक्के रक्कम भरून घेण्यात आली होती. मात्र ही योजना साकारलीच नाही. त्यामुळे ही जागा ताब्यात घेऊन म्हाडाने बांधकाम सुरू झाल्यानंतर २०१८मध्ये त्यातील ६९ घरे स्थानिक लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर या गृहप्रकल्पात १२५ विजेते आणि ६९ लाभार्थ्यांना घर देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

लाभार्थी नाराज का?

सोडत झाल्यानंतर मंडळाने १२५ घरांसाठीच्या विजेत्यांची पात्रता निश्चिती सुरू केली. अनेक जण पात्रही ठरले. पण या पात्र विजेत्यांना घराचा ताबा मात्र अद्याप मिळालेला नाही. ताबा कधी मिळेल या प्रतीक्षेत असलेल्या विजेत्यांना आणि ६९ लाभार्थ्यांना मागील महिन्यात कोकण मंडळाने देकार पत्र पाठवून घराची रक्कम भरण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंतची मुदत दिली. मात्र या देकार पत्रामधील घरांच्या किमती पाहून लाभार्थ्यांना धक्काच बसला. कारण घराची किंमत ४३ लाखांवरून थेट ५९ लाख करण्यात आली होती. सोडतीच्या जाहिरातीत बाळकुम येथील घरांच्या किमतीत वाहनतळाच्या बांधकामाचा खर्च समाविष्ट करण्यात येईल आणि तो विजेत्यांना भरावा लागले असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. त्यानुसार तीन ते पाच लाख रुपयांपर्यंत किंमत वाढेल असे वाटत असताना थेट १६ लाख रुपयांनी किंमत वाढविल्याने तसेच वाहनतळासह सोडतीत उल्लेख नसलेल्या घटकांचाही समावेश करण्यात आला आहे.

किमती का वाढल्या?

बाळकुम प्रकल्पाला ठाणे महानगरपालिकेने दोन घरांमागे एक वाहनतळ याप्रमाणे परवानगी दिली होती. मात्र नंतर तेथे आणखी दोन इमारती बांधण्यासाठी मंडळाने सुधारित आराखडा सादर केला. त्यानंतर पालिकेने नव्या नियमानुसार एका घरामागे दोन वाहनतळ यानुसार परवानगी दिली. त्यामुळे वाहनतळासाठी स्वतंत्र इमारती बांधाव्या लागल्या आणि त्याचा खर्च वाढला. त्यामुळे प्रति सदनिका ९ लाख ८५ हजार ५५७ रुपये इतका खर्च वाढला. त्याच वेळी या प्रकल्पास पाणी पुरवठा करण्यासही पालिकेने नकार दिला. त्यामुळे पाणी पुरवठ्याची सोयही मंडळाला करावी लागली. त्यामुळे प्रति सदनिका ३८ हजार ७१  रुपये इतकी किंमत वाढली. याशिवाय एका सदनिकेसाठी ५ लाख २ हजार ४२१ रुपये असे व्याज आणि १ लाख ३ हजार ५१४ इतका मेट्रो उपकर आकारण्यात आला. परिणामी एका घराची किंमत १६ लाख २९ हजार ५६४ रुपयांनी वाढली. त्यामुळे घराची किंमत ४३ लाख ४५ हजार २३६ रुपयांवरून ५९ लाख ७४ हजार ८०० रुपयांवर पोहोचली आहे.

किंमत कमी करण्यास म्हाडाचा नकार का?

किंमत कमी करावी अशी मागणी विजेते आणि लाभार्थी यांनी केली आहे. मात्र म्हाडाने किंमत कमी करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. याबाबत लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन किंमत कमी करण्यासाठी साकडे घातले आहे. पण त्यांनीही कोणतेही ठोस आश्वासन न दिल्याने लाभार्थ्यांची नाराजी वाढली आहे. दरम्यान, बाळकुम येथील घरांची किंमत कमी करण्यास नकार देणाऱ्या म्हाडा कोकण मंडळाने नुकत्याच २०१८च्याच सोडतीतील खोणी-शिरढोणमधील घरांच्या किमती १० टक्क्यांनी कमी केल्या आहेत. मंडळाच्या या दुटप्पी भूमिकेवरूनही आता नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आता लाभार्थ्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १७ ऑक्टोबरपासून आझाद मैदानावर हे आंदोलन सुरूही झाले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mhada balkum lottery flats issue print exp scsg
Show comments