अनिकेत साठे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जम्मू-काश्मीरमधील बडगाम येथे भारतीय हवाई दलाने स्वत:च्या एमआय – १७ हेलिकॉप्टरवर क्षेपणास्त्र डागून ते पाडल्याच्या (फ्रेंडली फायर) प्रकरणात लष्करी न्यायालयाने (जनरल कोर्ट मार्शल) श्रीनगर केंद्राचे तत्कालीन मुख्य परिचालन अधिकारी ग्रुप कॅप्टन सुमन रॉय चौधरी यांनाही अखेर दोषी ठरवत बडतर्फ करण्याची शिफारस केली आहे. स्वत:च्या हेलिकॉप्टरला लक्ष्य करण्याची ही घोडचूक होती. त्यात हेलिकॉप्टरचे सारथ्य करणारे नाशिकचे स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्यासह सहा अधिकारी आणि एक नागरिक अशा सात जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिस्तभंगाच्या कारवाईतून दिलासा मिळण्यासाठी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांचे दावे निकाली निघेपर्यंत शिक्षेच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा राहणार आहे.

काय घडले होते ?

२७ फेब्रुवारी २०१९ रोजीची ही घटना आहे. पुलवामा हल्ल्यानंतर काही दिवसांत भारताने पाकिस्तानातील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांवर हवाई हल्ले केले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी भारत-पाकिस्तानची लढाऊ विमाने आकाशात प्रतिहल्ला आणि संरक्षणाच्या उद्देशाने झेपावली. सीमेवर तणावाची स्थिती होती. याच सुमारास भारतीय हवाई दलाच्या एमआय – १७ हेलिकॉप्टरने श्रीनगरहून उड्डाण केले. काही वेळात ते बडगाममध्ये कोसळले. जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या स्पायडर या इस्त्रायली बनावटीच्या क्षेपणास्त्राने त्याचा वेध घेतला. शत्रू-मित्र ओळख न पटल्याने हवाई संरक्षण विभागाकडून हे क्षेपणास्त्र डागले गेले. त्यात दोन वैमानिकांसह हवाई दलाच्या सहा अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. यामध्ये नाशिकचे स्कॉड्रन लिडर निनाद मांडवगणे यांचाही समावेश होता. तसेच १३३ कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाले.

वास्तव मान्य करण्यात विलंब का?

स्वत:च्या हेलिकॉप्टरवर स्वत:च क्षेपणास्त्र डागण्याची घोडचूक झाली होती. मात्र हे वास्तव स्वीकारण्यात बराच कालापव्यय झाला. फेब्रुवारी २०१९च्या अखेरीस ही घटना घडली. प्रारंभीच सर्व काही स्पष्ट होते. पण, आठ महिन्यांनंतर हवाई दलाने अधिकृतपणे त्याची कबुली दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, ही माहिती लपवल्याची साशंकता व्यक्त झाली. बालाकोटमध्ये हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी हल्ले केले होते. संपूर्ण देशात पुलवामाचा बदला घेतल्याची भावना पसरली होती. देशप्रेमाने भारलेल्या वातावरणात लोकसभा निवडणुकीसाठी एप्रिल ते मे २०१९ या कालावधीत मतदान झाले. लक्षणीय यश मिळवून केंद्रात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन झाले. ऑक्टोबर २०१९ मध्ये हवाई दलाचे तत्कालीन प्रमुख आर. के. एस. भदौरिया यांनी पहिल्यांदा त्यावर भाष्य केले. क्षेपणास्त्राने हेलिकॉप्टर पाडणे ही मोठी चूक होती. या प्रकरणात दोन जवानांवर कारवाई सुरू असल्याचे त्यांनी म्हटले होते.

शीख दंगलीप्रकरणी सीबीआयने काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांच्या आवाजाची चाचणी का केली? आवाजाचा नमुना पुरावा ठरू शकतो?

चौकशी, न्यायालयीन प्रक्रियेत काय झाले?

या घटनेच्या न्यायालयीन चौकशीत ही बाब स्पष्ट झाली. या घटनेला हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आणि चार अधिकारी जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले. सैन्याच्या न्यायाधिकरणाने वैधानिक तरतुदींच्या कारणास्तव या अहवालाच्या आधारे ग्रुप कॅप्टन रॉय चौधरी आणि विंग कमांडर श्याम नैथानी यांच्याविरुद्ध कारवाईला स्थगिती दिली होती. नंतर चौकशीतील निष्कर्ष ग्राह्य धरले व शिस्तभंगाच्या कार्यवाहीला संमती दिली. लष्करी न्यायालयात उभयतांविरुद्ध सुनावणी सुरू झाली. दरम्यानच्या काळात या अधिकाऱ्यांनी पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयात दाद मागितली. लष्करी न्यायालयाने रॉय चौधरींना नऊपैकी पाच आरोपांमध्ये दोषी ठरवले. यात हवाई दल मुख्यालयाने प्रसिद्ध केलेल्या आदेशाचे पालन न केल्याचा समावेश आहे. ओळख पटविणारी संबंधित हेलिकॉप्टरमधील रडार प्रणाली बंद होती. वैमानिक व जमिनीवरील कर्मचारी यांच्यात समन्वय नव्हता. ओळख पटवणारी रडार प्रणाली कार्यान्वित न ठेवता श्रीनगरच्या हवाई क्षेत्रात हेलिकॉप्टर उड्डाणाला परवानगी देणे आणि हवाई संरक्षण विभागाने त्या हेलिकॉप्टरवर क्षेपणास्त्र डागणे यावर बोट ठेवण्यात आले. विंग कमांडर नैथानी तेव्हा वरिष्ठ हवाई वाहतूक नियंत्रण अधिकारी होते. ते चार आरोपांतून दोषमुक्त झाले. एका आरोपासाठी त्यांना शिक्षा सुनावण्यात आली.

समन्वयाचा अभाव, अन्य त्रुटी होत्या का?

आकाशात भ्रमंती करणारे विमान वा हेलिकॉप्टर शत्रूचे आहे की स्वदेशीय वा मित्रदेशीय, हे ओळखण्यासाठी विद्युत चुंबकीय लहरी प्रसारण, ओळख पटविणारी प्रणाली, दृष्टी टप्प्याच्या पलीकडे लक्ष देणारी यंत्रणा, सुरक्षित चिन्हांकित मार्गिका आदींचा उपयोग केला जातो. सांकेतांकाची देवाणघेवाण होऊन ओळख पटवली जाते. युद्धजन्य स्थितीत यात त्रुटी राहिल्यास विपरित घटना घडण्याची शक्यता असते. श्रीनगर हवाई तळावरील मुख्य परिचालन अधिकारी आणि वरिष्ठ हवाई वाहतूक नियंत्रक यांच्यात समन्वय नव्हता. त्याची परिणती या घटनेत झाली.

विश्लेषण: Camille Claudel: एका फ्रेंच (श)सकुंतलेची कहाणी नेमकी आहे तरी काय?

तंत्रज्ञान साधर्म्याबाबत साशंकता काय?

रशियन बनावटीचे एमआय – १७ हे बरेच जुने हेलिकॉप्टर आहे. या घटनेवेळी त्यात ओळख पटविणारी यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे सांगितले जाते. परंतु, तशी आधुनिक उपकरणे त्यात आहेत का, याविषयी काही अधिकारी साशंक आहेत. त्याचे तंत्रज्ञान जमिनीवरील आधुनिक रडार प्रणालीशी समन्वय साधण्याच्या दृष्टीने कधी विकसित केले, हा त्यांचा प्रश्न आहे. आकाशातील कुठल्याही धोक्यांचा वेध घेणारे इस्त्रायली स्पायडर ही स्वयंचलित क्षेपणास्त्र प्रणाली आहे. हवाई संरक्षण विभागाने ते डागण्यापूर्वी एकदा फेरपडताळणीची आवश्यकता होती. आपल्या हवाई क्षेत्रात एकच हेलिकॉप्टर अतिशय कमी वेगात व कमी उंचीवरून संचार करीत आहे. ते शत्रूूचे कसे असू शकेल, याचा तर्कसंंगत विचार झाला नाही. हवाई दलाच्या विविध शाखांमध्ये एकात्मक दृष्टिकोन विकसित करण्याची गरज मांडली जात आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mi 17 helicopter crash incident in jammu kashmir friendly fire pmw
Show comments