अमेरिकेत काही महिन्यातच राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आगामी निवडणूक लढवण्यापासून माघार घेतल्याने या निवडणुकीला नवे वळण आले आहे. जो बायडेन यांनी विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार म्हणून पाठिंबा दिला आहे. मात्र, कमला हॅरिस यांना उमेदवारी देण्याबाबत पक्षात दोन गट पडले आहेत. पक्षातील सर्वोच्च नेतृत्व आणि लोकप्रतिनिधींमध्ये मतभेद पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे, माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामादेखील त्यांच्या उमेदवारीला विरोध करत असल्याची माहिती आहे.
एका सर्वेक्षणात राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांचे नाव समोर आले आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या वर्तुळात त्यांची लोकप्रियता आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची पत्नी या नात्याने त्यांनी अमेरिकेच्या ‘फर्स्ट लेडी’ म्हणून आपल्या कार्यकाळात लोकांवर एक छाप सोडली आहे. मिशेल ओबामा यांच्या नावाचा प्रबळ दावेदार म्हणून वारंवार उल्लेख केला जात आहे. त्यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे विविध राजकीय गटांमध्ये प्रचंड खळबळ आणि चिंता निर्माण झाली आहे. डेमोक्रॅटिक पक्षातील उमेदवारीचे चित्र काय? मिशेल ओबामा यांना खरंच उमेदवारी मिळणार का? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
हेही वाचा : अमेरिकन नागरिक कृष्णवर्णीय महिलेला राष्ट्राध्यक्षपदी निवडून देणार का? इतिहास काय सांगतो?
मिशेल ओबामा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता किती?
नुकत्याच झालेल्या ‘इप्सॉस पोल’च्या सर्वेक्षणामध्ये असे दिसून आले आहे की, मिशेल ओबामा या एकमेव उमेदवार असू शकतात, ज्या डोनाल्ड ट्रम्पला निर्णायकपणे पराभूत करू शकतात. या सर्वेक्षणात ट्रम्प यांना ५० टक्के ते ३९ टक्के मते मिळाली आहेत, तर उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्यासह इतर उमेदवारांना ट्रम्प यांच्यापेक्षा कमी मते मिळाली आहेत. याव्यतिरिक्त, ‘नोबल प्रेडिक्टिव इनसाइट्स’च्या सहकार्याने ‘सेंटर स्क्वेअर व्होटर्स व्हॉईस’ने केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, डेमोक्रॅट पक्षाच्या २४ टक्के समर्थकांनी मिशेल ओबामा यांना इतर उमेदवारांपेक्षा प्राधान्य दिले आहे, कमला हॅरिस या सात टक्क्यांनी पिछाडीवर आहेत.
मिशेल ओबामा यांच्या नावाच्या चर्चेनंतर रिपब्लिकन पक्ष घाबरला आहे का?
रिपब्लिकन पक्षानेदेखील मिशेल ओबामा यांच्या संभाव्य उमेदवारीची दखल घेतली आहे. अमेरिकेचे सिनेटर केविन क्रेमर यांनी न्यूयॉर्कच्या एका मासिकाला सांगितले की, “मिशेल ओबामा या अशा एक व्यक्ती आहेत, ज्या पक्षाला एकसंध ठेवू शकतील.” अमेरिकेतील भारतीय वंशाचे नेते विवेक रामास्वामी यांनीदेखील असे भाकीत केले की, जो बायडेन किंवा कमला हॅरिस या दोघांनाही डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळू शकणार नाही. त्यांनी मिशेल ओबामा यांच्या पदावर येण्याची शक्यतादेखील वर्तवली.
मिशेल ओबामा काय म्हणाल्या?
मिशेल ओबामा यांनी सातत्याने पदाच्या शर्यतीत आपल्या उपस्थितीबाबत नकार दिला आहे. ‘नेटफ्लिक्स स्पेशल’च्या एका कार्यक्रमात त्या म्हणाल्या, “राजकारण कठीण आहे. राजकारण तुमच्या आत्म्यात असणे आवश्यक आहे, कारण ते खूप महत्त्वाचे आहे. ते माझ्या आत्म्यात नाही.” या वर्षाच्या सुरुवातीला, त्यांच्या कार्यालयाने ‘एनबीसी’ न्यूजलाही हेच सांगितले आणि स्पष्ट केले की, २०२४ मध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याची त्यांची कोणतीही योजना नाही.
यावर बराक ओबामा यांची प्रतिक्रिया काय?
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या वक्तव्याने या अटकळांना आणखीच खतपाणी घातले आहे. बराक ओबामा यांनी जो आणि जिल बायडेन यांची स्तुती केली, मात्र कमला हॅरिसचे समर्थन करणे टाळले आणि म्हटले, “आत्तासाठी, मिशेल आणि मला फक्त जो आणि जिल यांच्याविषयी प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करायची आहे. कारण त्यांनी संकटकाळात सक्षमतेने आणि धैर्याने देशाचे नेतृत्व केले आहे.” या अर्धवट वक्तव्यानंतर काहींना असा विश्वास वाटू लागला आहे की, कदाचित मिशेल ओबामा यांना डेमोक्रॅटिक पक्षाकडून उमेदवारी दिली जाऊ शकेल.
जनतेला काय हवे आहे?
मिशेल ओबामा यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत इंटरनेटवर चर्चा सुरू आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, विशेषत: ‘एक्स’वर त्यांना उमेदवारी मिळण्याविषयीच्या पोस्टमध्ये वाढ झाली आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “कृपया मिशेल ओबामा यांच्यावर लक्ष केंद्रित करा. कमला यांचा या निवडणुकीत पराभव निश्चित आहे.” राजकीय विश्लेषक आणि समालोचकांनीही यावर भाष्य केले आहे. काहींचा असा विश्वास आहे की, मिशेल ओबामा या डोनाल्ड ट्रम्प यांना पराभूत करण्यासाठी डेमोक्रॅट्सच्या सर्वोत्तम उमेदवार आहेत.
हेही वाचा : ब्रीफकेस ते टॅबलेट व्हाया बही खाता: निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पाचं सादरीकरण कसं बदललं?
डेमोक्रॅटिक पक्षाच्या नव्या उमेदवार म्हणून बायडेन यांनी कमला हॅरिस यांना मान्यता दिल्याने मिशेल ओबामा यांच्याविषयीच्या अटकळांना आळा बसला नाही. डेमोक्रॅटिक पक्षाला आता गंभीर निर्णयाचा सामना करावा लागत आहे. कमला हॅरिस या संभाव्य अधिकृत उमेदवार असताना, मिशेल ओबामा या पक्षाला एकत्र आणण्यासाठी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर मोठे आव्हान उभे करण्यासाठी उत्तम पर्याय असू शकतात का? हा प्रश्न प्रलंबित आहे.