– भक्ती बिसुरे
घर असो, जंगल, वाळवंट, पर्यावरण असो की समुद्र… दुर्दैवाने या जगाचा एकही कोपरा असा नाही जिथे प्लास्टिक पोहोचलेले नाही. प्लास्टिक हा पदार्थ मानवी जगण्याला व्यापून उरला आहे. प्लास्टिकला पर्याय नाही या एका कारणास्तव प्लास्टिक हटवण्याचे सर्व प्रयत्न आतापर्यंत फोल ठरले आहेत. तशातच आता मानवी रक्तातही प्लास्टिकचे मायक्रोपार्टिकल्स म्हणजे सूक्ष्म कण आढळल्याचे नेदरलॅंडमधील एका संशोधनातून समोर आले आहे. हे संशोधन नेमके काय आहे, मानवी रक्तात प्लास्टिक पोहोचले कसे आणि त्याचे काय दुष्परिणाम मानव जातीला भोगावे लागणार आहेत याचा आढावा या संशोधनाद्वारे घेण्यात आला आहे.
संशोधन नेमके काय?
मायक्रोप्लास्टिक म्हणजे प्लास्टिकच्या सूक्ष्म कणांनी आपला संपूर्ण भवताल व्यापला आहे. पण आता केवळ भवताल व्यापून प्लास्टिक थांबलेले नाही. त्याने आपल्या शरीरातही शिरकाव केला आहे. नेदरलॅंडमधील संशोधकांनी २२ अज्ञात माणसांच्या रक्ताच्या नमुन्यांवर केलेल्या संशोधनात २२ पैकी १७ जणांच्या रक्तात मायक्रोप्लास्टिक आढळले आहे. हे सगळे प्लास्टिक पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांसाठी वापरले जाणारे असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे. तपासण्यात आलेल्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये अत्यल्प म्हणजे ७०० नॅनोमीटर (०.०००७ मिलीमीटर) प्लास्टिक आढळले. हे प्लास्टिक मानवी शरीराच्या कार्यात काही अडथळे आणते का, त्याचे काय दुष्परिणाम होतात हे पाहण्यासाठी व्यापक संशोधनाची गरज असल्याचे संशोधकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मायक्रोप्लास्टिक म्हणजे काय?
पर्यावरणात दिसणाऱ्या विविध प्रकारच्या प्लास्टिकचे अतिसूक्ष्म कण म्हणजे मायक्रोप्लास्टिक होय. मायक्रोप्लास्टिकची वैश्विक व्याख्या करण्यात आलेली नाही. यूएस नॅशनल ओशनिक ॲण्ड ॲटमोस्फिअरिक ॲडमिनिस्ट्रेशन आणि युरोपिअन केमिकल एजन्सी यांनी केलेल्या व्याख्येनुसार ५ मिलिमीटरपेक्षा कमी लांबीचे प्लास्टिक म्हणजे मायक्रोप्लास्टिक होय. या विशिष्ट संशोधनासाठी मात्र मानवी शरीराच्या त्वचेच्या आतील स्तरातून (मेम्ब्रेन) प्रवास करू शकणाऱ्या आकाराचे प्लास्टिक हा एकमेव निकष वापरण्यात आला आहे. या संशोधनात जगात सर्वत्र आढळून येणारे प्लास्टिक पॅालिमर – बाटल्यांसाठी वापरले जाणारे पॅालिथिलिन टेट्राफ्टॅलेट, पिशव्यांसाठी वापरले जाणारे पॅालिथिलिन, अन्नपदार्थांच्या पॅकिंगसाठी वापरले जाणारे पॅालिमर स्टायरिन या प्रकारांतील प्लास्टिकचे सूक्ष्मकण आढळले आहेत.
संशोधनातील निष्कर्ष काय?
सदर संशोधनासाठी २२ निरोगी व्यक्तींच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले. २२ पैकी १७ जणांच्या रक्तात मायक्रोप्लास्टिकचे अस्तित्व आढळले. त्यापैकी ५० टक्के नमुन्यांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांच्या निर्मितीसाठी वापरले जाणाऱ्या पॅालिथिलिन टेट्राफ्टॅलेट, ३६ टक्के नमुन्यांमध्ये पॅालिस्टरिन, २३ टक्के पॅालिथिलिन तर पाच टक्के नमुन्यांमध्ये मिथाइल मेथिलायक्रेट प्रकारातील मायक्रोप्लास्टिक आढळले आहेत. प्रत्येक रक्तदात्याच्या नमुन्यात सुमारे १.६ मायक्रोग्रॅम मायक्रोप्लास्टिक आढळले आहे. भविष्यातील संभाव्य दीर्घ अभ्यासातून काय निष्कर्ष हाती लागतील याची हा अहवाल म्हणजे नांदी असेल अशी शक्यता संशोधकांकडून वर्तवण्यात आली आहे.
संशोधनाचे महत्त्व काय?
प्लास्टिकचे वर्णन नेहमी भस्मासुर असा केला जातो. त्यामुळे मानवी शरीर आणि आरोग्यावर होणारा संभाव्य परिणाम यांचा अभ्यास होणे आवश्यक आहे. मात्र, त्याबाबत माहिती संकलन आणि संशोधनाचा अभाव दिसतो. त्या दृष्टीने अशा प्रकारचे संशोधन होणे आवश्यक आहे. मानवी शरीरात असलेल्या संभाव्य, मायक्रोप्लास्टिकपेक्षा कितीतरी पटीने सूक्ष्म प्लास्टिक कणांची तपासणी करणारी यंत्रणाच उपलब्ध नसल्याचे संशोधकांनी नमूद केले असून तशा चाचण्या आणि तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज असल्याचेही संशोधक गटाकडून अधोरेखित करण्यात आले आहे. सध्याच्या संशोधन निष्कर्षांवरून लगेच धोरण ठरवणे कदाचित शक्य नाही पण भविष्यात याबाबत अधिक संशोधनास असलेला वाव आणि गरज दर्शवण्यासाठी हे संशोधन आवश्यक असल्याचे या शोधनिबंधात मांडण्यात आले आहे.
मानवी आरोग्याला धोका किती?
मानवी रक्तात आढळलेले मायक्रोप्लास्टिक मानवी आरोग्यावर काय काय दुष्परिणाम करण्याची शक्यता आहे याबाबत ठोस निष्कर्ष काढण्यासाठी अद्याप संशोधनाची गरज आहे. मात्र, प्राण्यांवर (उंदीर) केलेल्या संशोधनात उंदरांच्या फुप्फुसांना २० नॅनोमीटर मायक्रोप्लास्टिकच्या संपर्कात आणले असता कालांतराने गर्भात आणि गर्भातील ऊतींमध्ये त्यांचे अस्तित्व आढळल्याचे दिसून आले आहे. याचा अर्थ उंदरांमध्ये मायक्रोप्लास्टिक तोंडावाटे गेल्याने यकृत, मूत्रपिंड आणि आतड्यांमध्ये ते जमा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे मानवी शरीरातही त्या मायक्रोप्लास्टिकचे स्थलांतर शक्य असल्याचे स्पष्ट होते. थोडक्यात, मायक्रोप्लास्टिक हे वातावरणात म्हणजे समुद्र, पर्यावरण यांच्या माध्यमातून आता मानवी शरीरातही शिरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्लास्टिक रक्तात आढळल्याने आपल्या आरोग्याला किती धोका आहे, हे येणारा काळच ठरवेल. मात्र, तोपर्यंत आपण तातडीने पावले उचलून प्लास्टिकला शाश्वत पर्याय शोधण्याची गरज आहे. प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकचे डबे, बाटल्या, खाद्यपदार्थांची वेष्टने अशा सर्व स्वरूपात प्लास्टिक आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाले आहे. प्लास्टिकचा वापर जाणीवपूर्वक कमी करणे आणि त्याचबरोबर वापरलेल्या प्लास्टिकवर पुनर्प्रक्रियेचे पर्याय शोेधणे ही काळाची गरज ठरणार आहे. त्या दृष्टीने वेगवान हालचाली करणे हेच पुढील पिढ्यांच्या निरोगी भवितव्यासाठी मानवाच्या हाती आहे.