संदीप नलावडे
इटलीमधील लॅम्पेडुसा बेटाजवळ गेल्या आठवडय़ात एक प्रवासी बोट बुडाली असून त्यात तीन लहान मुलांसह ४१ जणांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे यासंबंधीची माहिती प्रसारमाध्यमांना या आठवडय़ात बुधवारी मिळाली. या बोटीमधील सर्व प्रवासी स्थलांतरित होते आणि ते इटलीमध्ये येत होते. ही दुर्घटना आणि स्थलांतरितांच्या प्रश्नाविषयी..
इटलीमध्ये काय दुर्घटना घडली?
टय़ुनिशियाच्या स्फॅक्स शहरातून इटलीला गेल्या आठवडय़ातील गुरुवारी एक बोट निघाली होती. तिच्यात टय़ुनिशियातील निर्वासित होते आणि ते इटलीमध्ये चालले होते. प्रवास सुरू झाल्यानंतर सहा तासांनीच या बोटीला जलसमाधी मिळाली. ही दुर्घटना इटलीच्या लॅम्पेडुसा बेटाजवळ घडली. या अपघातात तीन लहान मुलांसह ४१ जणांना मृत्यूला सामोरे जावे लागले. या दुर्घटनेत केवळ चार जण वाचले असून ते गुआना आणि आयव्हरी कोस्ट या देशांचे नागरिक आहेत. त्यांना इटलीच्या तटरक्षक दलाने ताब्यात घेतले आहे. लॅम्पेडुसा हे बेट उत्तर आफ्रिकेजवळ असून निर्वासितांच्या तस्करीसाठी ते ओळखले जाते. त्यामुळे हा प्रकारही निर्वासितांच्या तस्करीचा असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
माहिती कळण्यास विलंब का?
उत्तर आफ्रिकेतील अनेक देशांमधून निर्वासितांना इटलीमध्ये नेण्यात येते. अवैध मार्गाने आणि गुप्त पद्धतीने या निर्वासितांचे स्थलांतर केले जाते. टय़ुनिशियामधून गेल्या गुरुवारी निर्वासितांना घेऊन जाणारी ही बोट नियमबाह्य पद्धतीने निघाली होती. या दुर्घटनेतील चौघांना माल्टीज मालवाहू जहाजाने वाचविले आणि इटालियन तटरक्षक दलाच्या ताब्यात दिले. अधिकाऱ्यांनाही या बोटीविषयी माहिती नव्हती आणि या चौघांनी दिलेल्या माहितीनंतर त्यांना धक्का बसला. या बोटीत तीन मुलांसह एकूण ४५ जण असल्याची माहिती या चौघांनी दिली. समुद्रातील एका मोठय़ा लाटेच्या तडाख्याने ही बोट उलटली, अशी माहिती तटरक्षक दलाला देण्यात आली. या बोटीतील केवळ १५ जणांनी सुरक्षा जाकिटे परिधान केली होती. तरीही ते बुडाले. तटरक्षक अधिकाऱ्यांनी या चौघांची चौकशी केल्यानंतर ही बातमी फ्रान्स सरकारला कळविण्यात आली. नंतर आठवडय़ाने प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती देण्यात आली.
इटलीमधील निर्वासितांचा प्रश्न काय आहे?
निर्वासितांना आश्रय देण्याबाबत उदारमतवादी असलेल्या युरोपमधील अनेक देशांना आता त्यासंदर्भातील समस्या जाणवू लागल्या आहेत. इटलीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून उत्तर आफ्रिकेतील निर्वासितांचे लोंढे वाढले असून त्यामुळे इटलीमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. इटालियन अधिकाऱ्यांच्या मते भूमध्य समुद्र पार करून या वर्षभरात ९० हजारांहून अधिक निर्वासित इटालियन किनाऱ्यावर पोहोचले आहेत. मागील वर्षांच्या तुलनेत ही संख्या दुप्पट असल्याचे अधिकारी सांगतात. अनेकांना उत्तर आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळ रोखले जात आहे, तर बहुतेकांना इटालियन तटरक्षक दल आणि धर्मादाय संस्था ‘निर्वासित केंद्रां’मध्ये घेऊन जात आहेत. भूमध्य सागरी मार्ग हा जगातील सर्वात धोकादायक स्थलांतरित मार्गापैकी एक आहे.
इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन (आयओएम) नुसार २०१४ पासून जवळपास २८ हजार निर्वासित समुद्र ओलांडण्याच्या प्रयत्नात बेपत्ता झाले आहेत. इटलीमध्ये सर्वाधिक निर्वासित गुआना, आयव्हरी कोस्ट, मिस्र आणि टय़ुनिशिया या देशांमधून येतात. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे उजव्या विचारसरणीचे सरकार निर्वासितांची तस्करी रोखण्यासाठी युरोपीय संघाला विनंती करत आहेत. मात्र तरीही मोठय़ा संख्येने निर्वासित तस्करांच्या बोटी इटलीमध्ये येत आहेत.
या समुद्रात किती निर्वासित प्रवास करतात?
युरोपमधील सर्वाधिक अनधिकृत स्थलांतर इटलीत झाले आहे. या वर्षी ९३ हजार निर्वासित इटलीमध्ये आले आहे. २०२२ मध्ये हा आकडा २१ हजार ८८४ होता, तर २०२१ मध्ये १६ हजार ७३७ होता. या वर्षी आयव्हरी कोस्ट, इजिप्त, गिनी, टय़ुनिशिया, पाकिस्तान व बांगलादेश या देशांमधून सर्वाधिक निर्वासित इटलीमध्ये आले आहेत. मोरोक्को व अल्जेरिया या देशांमधून स्पेनला जाण्यासाठी काही स्थलांतरित पश्चिम भूमध्य सागरी मार्गाचा अवलंब करतात. सीरिया, इराक, अफगणिस्तान या देशांतील नागरिक पूर्व भूमध्य सागरी मार्गाचा वापर करतात. त्यासाठी आधी ते तुर्कस्तानला जातात आणि त्यानंतर ग्रीक किंवा अन्य युरोपीय देशांमध्ये जातात.
यापूर्वी अशा दुर्घटना किती झाल्या आहेत? पूर्व लिबियाच्या तोब्रुक भागातून निर्वासितांना घेऊन जाणारी एक बोट ग्रीसच्या दक्षिण किनाऱ्याजवळ बुडाल्याची घटना १४ जूनला घडली. इटलीला चाललेल्या या बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. या दुर्घटनेत ८० जणांना जलसमाधी मिळाली तर १०४ प्रवासी वाचले. २०२० मध्ये लिबियाच्या किनारपट्टीजवळील समुद्रात स्थलांतरित मजुरांना घेऊन जाणारी एक बोट बुडून ७४ जणांचा मृत्यू झाला. या बोटीमधून १२० स्थलांतरित प्रवास करत होते. २०१९ मध्ये लिबियाच्या किनाऱ्याजवळ बोट बुडून ११७ जणांचा मृत्यू झाला. २०१८ मध्ये भूमध्य सागर ओलांडताना २२०० निर्वासितांनी जीव गमावला आहे. १८ एप्रिल २०१५ रोजी भूमध्ये समुद्रात निर्वासितांना घेऊन जाणाऱ्या एका बोटीला अपघात झाल्याने ७०० जणांचा मृत्यू झाला.