स्थलांतरितांना घेऊन जाणारी एक मासेमारी बोट ग्रीसच्या दक्षिण किनाऱ्याजवळ बुडाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (१४ जून) घडली आहे. ही बोट बुडताना स्थलांतरितांनी बचावकार्य करणाऱ्या बोटींची मदत नाकारल्याचे म्हटले जात आहे. लिबिया, सीरिया आदी भागांतील नागरिक युरोपात जाण्यासाठी धडपडत असतात. जीव धोक्यात घालून हे लोक प्रवास करतात. लिबिया किंवा ट्युनिशियापासून उत्तर युरोपात जाण्यासाठी स्थलांतरित लोक मध्य भूमध्य सागराच्या मार्गाने प्रवास करतात. संयुक्त राष्ट्राच्या ‘इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ मायग्रेशन’ संस्थेनुसार हा मार्ग सर्वाधिक धोकादायक जलमार्गांपैकी एक आहे. याच पार्श्वभूमीवर ग्रीसच्या दक्षिण किनाऱ्यावर ही घटना नेमकी कशी घडली? या दुर्घटनेत किती लोकांना जलसमाधी मिळाली? युरोपात निर्वासितांची समस्या गंभीर का होत चालली आहे? यावर टाकलेला प्रकाश…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्रीसमध्ये नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार पूर्व लिबियाच्या तोब्रुक भागातून स्थलांतरितांना घेऊन एक मासेमारी बोट इटलीला जात होती. मात्र ही बोट बुधवारी (१४ जून) दक्षिण पेलोपोनिस द्वीपकल्पाच्या नैर्ऋत्येस उलटली. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यामुळे या बसला अपघात झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत ७९ जणांना जलसमाधी मिळाली आहे. तर १०४ प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. बोटीमध्ये एकूण किती लोक होते आणि किती लोक बेपत्ता आहेत, हे अद्याप अस्पष्ट आहे. प्राथमिक माहितीनुसार या बोटीमध्ये शेकडो लोक प्रवास करत होते. ही दुर्घटना आतापर्यंतच्या सर्वाधिक भीषण दुर्घटनांपैकी एक असल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा >> औरंगजेब प्रकरणावरून महाराष्ट्रात अटकसत्र; कोणत्या कलमाखाली अटक होते आणि का?

प्रवाशांनी खरंच मदत नाकारली?

दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रीस तटरक्षक दल, नौदल, व्यापारी जहाजे तसेच विमानांच्या माध्यमातून बचावकार्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तटरक्षक दलातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बुडत असलेल्या जहाजाने कोणाकडूनही मदत घेण्यास नकार दिला. आम्ही मदत करण्यास तयार असताना जहाजाच्या कॅप्टनला मात्र इटलीकडे जायचे होते, असे तटरक्षक आणि व्यापारी जहाज विभागाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. संकटात असलेल्या स्थलांतरितांच्या बोटींना ‘अलार्म फोन’ या संस्थेकडून मदत केली जाते. या संस्थेने ग्रीसच्या दक्षिण किनाऱ्यावरील या दुर्घटनेबाबत अधिक माहिती दिली आहे. बोटीमध्ये असलेले काही लोक त्यांच्यासारख्याच काही स्थलांतरितांच्या संपर्कात होते. त्या लोकांना मदत हवी होती. आमची बोट एका छोट्या बोटीवर आदळली. त्यामुळे हा अपघात घडला, असे बोटीतील स्थलांतरितांनी सांगितले, असे ‘अलार्म फोन’ या संस्थेने सांगितले आहे. बरेच स्थलांतरित आपल्या ईप्सितस्थळी जाण्यासाठी ग्रीसमध्ये न जाता थेट इटलीला पोहोचतात. अन्य स्थलांतरितांकडे, कुटुंबीयांकडे सहजपणे पोहोचता यावे आणि प्रवास अडथळ्यांविना व्हावा म्हणून हा मार्ग निवडला जातो.

हेही वाचा >> स्टॅलिन यांचे विश्वासू सहकारी, गैरव्यवहाराच्या आरोपामुळे अडचणीत; ईडीच्या कारवाईनंतर चर्चेत आलेले सेंथिल बालाजी कोण आहेत?

ग्रीसचे स्थलांतरितांसाठीचे धोरण काय आहे?

बहुतांश स्थलांतरित ग्रीसमध्ये जाण्यासाठी टर्की देशातून प्रवास करतात. हे स्थलांतरित लहान लहान बोटींच्या माध्यमातून पूर्वेकडील ग्रीक बेटांच्या किंवा एव्हरोज नदी ओलांडून ग्रीसमध्ये प्रवास करतात. मागील काही काळापासून ग्रीसने सागरी सीमेवरील गस्त वाढवली आहे. तसेच सुरक्षेमध्येही वाढ केली आहे. त्यामुळे सध्या ग्रीसमधील स्थलांतरितांचे किंवा ग्रीसमार्गे जाणाऱ्या स्थलांतरितांचे प्रमाण कमी झाले आहे. याच कारणामुळे स्थलांतरित, मानवाधिकार संघटना, टर्कीचे अधिकारी ग्रीस देशावर नेहमी टीका करतात. ग्रीस देशाकडून स्थलांतरितांना टर्कीमध्ये पाठवले जाते. तसेच त्यांना आश्रय नाकारला जातो, असा दावा केला जातो. ग्रीसने मात्र हा दावा फेटाळून लावलेला आहे.

ग्रीसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

ग्रीस सरकारच्या स्थलांतरितांच्या धोरणावर ‘अलार्म फोन’ या संघटनेनेही टीका केली आहे. ग्रीस देश हा युरोपाची ढाल म्हणून काम करत आहे. हा देश युरोपातील स्थलांतर रोखत आहे. ‘अलार्म फोन’ या संघटनेच्या दाव्यावर ग्रीसच्या तटरक्षक दलाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ग्रीसच्या दक्षिण किनाऱ्यावर दुर्घटना घडल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही तत्परतेने मदतीसाठी धावलो. दुर्घटनाग्रस्त जहाजाने आमची मदत नाकारली. मात्र तरीदेखील आम्ही त्या भागात शोधमोहीम राबवली. तसेच जहाज बुडाल्यानंतर आम्ही बचावकार्य केले, असे तटरक्षक दलाने सांगितले.

हेही वाचा >> लव्ह जिहाद प्रकरणावरून मुस्लीम नागरिकांना राज्याबाहेर हुसकावण्याचा प्रयत्न; उत्तराखंडमधील राजकारण का तापले?

भूमध्य समुद्रातून किती स्थलांतरित प्रवास करतात?

युरोपमध्ये सर्वाधिक अनधिकृत स्थलांतर इटली देशात झाले आहे. या वर्षी साधारण ५५ हजार १६० स्थलांतरित लोक या देशात आले आहेत. २०२२ साली हा आकडा २१ हजार ८८४ होता. तर २०२१ साली हा आकडा १६ हजा ७३७ होता. या वर्षी आवरी कोस्ट, इजिप्त, गिनी, पाकिस्तान, बांगलादेश या देशांतून सार्वाधिक लोक इटलीमध्ये आलेले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार युरोपमध्ये स्थलांतरितांचे प्रमाण कमी होत आहे. वर्षाला साधारण १ लाख २० हजार लोक युरोपमध्ये येतात, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.

मोरोक्को आणि अल्जेरिया येथून स्पेनला जाण्यासाठी काही लोक धोकादायक असलेल्या मध्य-भूमध्य सागराव्यतिरिक्त पश्चिम भूमध्य सागरीय मार्गाने स्थलांतर करतात. सीरियन, इराकी, अफगाणिस्तानी, बिगर आफ्रिकी लोक पूर्व भूमध्य सागरी मार्गाने प्रवास करतात. त्यासाठी ते अगोदर टर्कीला जातात. त्यानंतर टर्कीहून ग्रीस तसेच अन्य युरोपीय देशांत जाण्याचा प्रयत्न करतात.

हेही वाचा >> विश्लेषण: पश्चिम विदर्भातील खारे पाणी गोड होणार का? नितीन गडकरींचा खारपाणपट्ट्यातील प्रयोग काय आहे?

भूमध्य सागर किती धोकादायक आहे?

भूमध्य सागरातील प्रवास तुलनेने अधिक धोकादायक समजला जातो. या वर्षात मध्य-भूमध्य सागरातून प्रवास करणारे एकूण १०३९ लोक बेपत्ता असल्याचे म्हटले जाते. यामध्ये अनेक लोकांच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. त्यामुळे मृतांचा प्रत्यक्ष आकडा यापेक्षाही अधिक असू शकतो. ‘इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ मायग्रेशन’ने सांगितल्यानुसार २०१४ सालापासून या मार्गावर साधारण २७ हजार लोक बेपत्ता झालेले आहेत.

याआधी बोट बुडण्याच्या दुर्घटना घडलेल्या आहेत का?

भूमध्य सागरात बोटी बुडण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. १८ एप्रिलला २०१५ रोजी भूमध्य सागरात अशीच एक मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत २८ प्रवासी बचावले होते. तर साधारण ७०० लोकांना जलसमाधी मिळाली होती. या दुर्घटनेतील मृतांचा शोध घेणाऱ्या फॉरेन्सिक तज्ज्ञांनी बोटीत एकूण ११०० लोक प्रवास करत होते, असा निष्कर्ष काढला होता. ३ ऑक्टोबर २०१३ रोजीही अशीच दुर्घटना घडली होती. या जहाजात साधारण ५०० लोक प्रवास करीत होते. मात्र निर्जन समजल्या जाणाऱ्या लॅम्पेडुसा बेटाजवळ या बोटीला आग लागली होती. ही दुर्घटना घडल्यानंतर स्थानिक मासेमारांनी बचावकार्य करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ३८६ लोकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला होता. तर १५५ लोकांना वाचवण्यात यश आले होते.

हेही वाचा >> विश्लेषण : मध्य प्रदेशात काँग्रेसलाही हिंदुत्वाचा आधार?

एकाच आठवड्यात दोन दुर्घटना

साधारण आठवड्याभरानंतर म्हणजेच ११ ऑक्टोबर २०१३ रोजी आणखी एक दुर्घटना घडली होती. लॅम्पेडुसाच्या दक्षिणेकडील समुद्रात ही दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेला ‘मुलांची कत्तल’ म्हणून ओळखले जाते. कारण या दुर्घटनेत साधारण ६० छोट्या मुलांसह एकूण २६० लोकांचा मृत्यू झाला होता. २०१७ साली इटलीतील एका साप्ताहिकाने या दुर्घटनेशी संबंधित एका ऑडिओची रेकॉर्डिंग सार्वजनिक केली होती. या रेकॉर्डिंगमध्ये बोटीतील स्थलांतरित लोक मदतीसाठी याचना करत होते. मात्र माल्टीज अधिकाऱ्यांनी या लोकांच्या बचावकार्यास विलंब केला होता.

स्थलांतरामुळे युरोपमधील देशांत वाद

भूमध्य सागरीय देशांमध्ये वेगवेगळ्या देशांतून स्थलांतरित येतात. या स्थलांतरितांना आश्रय देताना या देशांवर ताण पडतो. त्यामुळे युरोपातील अन्य देशांनीही स्थलांतरितांना सामावून घेतले पाहिजे, अशी मागणी भूमध्य सागरीय देश करताना दिसतात. पोलंड, हंगेरी तसेच इतर पूर्व युरोपीय राष्ट्रांनी मात्र स्थलांतरितांना सामावून घेण्यास काय विरोध दर्शवलेला आहे. मात्र या मुद्द्यावर मागील अनेक वर्षांपासून युरोपीय देशांमध्ये चर्चा सुरू आहे. मागील आठवड्यात ही चर्चा एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. मानवाधिकार संघटनेकडून मात्र स्थलांतरितांच्या मुद्द्यावरून युरोपीय देशांवर आरोप केले जातात. युरोपीय देश स्थलांतरितांना लिबियाच्या तटरक्षक दलाकडे सोपवतात. त्यानंतर स्थलांतरितांना छावण्यांमध्ये टाकले जाते. तेथे या स्थलांतरितांवर बलात्कार केला जातो. त्यांना मारहाण केली जाते, असा दावा मानवाधिकार संघटनांकडून केला जातो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Migrant boat capsizes on greek coast 79 dead know detail information european nations clash on migration prd
Show comments