एके काळी भल्याभल्या बॉक्सर्सच्या मनात धडकी भरवून रिंग गाजवणारा माजी सुपरहेवीवेट जगज्जेता बॉक्सर माइक टायसन नुकताच एका लढतीत चक्क एका यू-ट्यूब इन्फ्लुएन्सरकडून पराभूत झाला. ही लढत खरी होती की लुटुपुटूची आणि यात टायसन खरोखरच जीव ओतून खेळला का, याची चर्चा सुरू झाली आहे. ही लढत नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून जगापर्यंत पोहोचली. यातून टायसन, यू-ट्यूब इन्फ्लुएन्सरबरोबरच नेटफ्लिक्सलाही घबाड मिळाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टायसनला हरवणारा यू-ट्यूबर कोण?  

जेक पॉल हा २७ वर्षीय यू-ट्यूब इन्फ्लुएन्सर टायसनच्या लढतीआधीपासूनच सुपरिचित आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे २.७० कोटी फॉलोअर्स आहेत. यू-ट्यूबवर त्याचे असंख्य व्हिडियो गाजले आहेत. गाजलेल्या सिनेमांतील प्रसंग पुनरुज्जीवित करणे, वेगवेगळ्या डान्स मूव्ह सादर करणे हे करताकरता, जेक पॉल पुढे अनेक अचाट, आचरट चाळेही करू लागला. फर्निचर, मॅट्रेसेसना आगी लावणे, पिक-अप ट्रकला मागून जोडून गजबजलेल्या रस्त्यांमधून सर्फिंग करणे वगैरे उद्योग त्याने केले. डिस्नी कंपनीबरोबर करार करून त्याने एक लोकप्रिय मालिका केली. तो मूळचा हौशी बॉक्सरही आहे. टायसनशी टक्कर घेण्यासाठी त्याने विशेष प्रशिक्षण घेतले. त्याचा भाऊ लोगन जेक हा डब्ल्यूडब्ल्यूई कुस्तीगीर आहे. जेक पॉलने यापूर्वी यू-ट्यूबर्सबरोबर काही लढती जिंकल्या. पण टायसनसारख्या एके काळच्या व्यावसायिक बॉक्सरबरोबर त्याची ही पहिलीच लढत होती.

हेही वाचा – ‘या’ किल्ल्यावरील अंडाकृती खडकाखाली दडलंय काय?

माइक टायसन… तो सध्या काय करतो?

१९८०च्या उत्तरार्धात आणि १९९०च्या दशकात ‘आयर्न’ माइक टायसन या बॉक्सरचा दबदबा होता. अत्यंत आक्रमक परंतु खुनशी टायसनने बॉक्सिंगच्या रिंगणात अनेक भल्याभल्या बॉक्सर्सना धराशायी केले. वयाच्या १५व्या वर्षापासून तो व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये उतरला. वयाच्या विसाव्या वर्षीच तो आजवरचा सर्वांत युवा हेवीवेट बॉक्सिंग जगज्जेता बनला. मोहम्मद अली, शुगर रे रॉबिन्सन यांच्याइतकी लोकप्रियता त्याला मिळाली. पण वादांमध्ये अडकला. जेम्स बस्टर डग्लसकडून तो एकदा अनपेक्षितरीत्या पराभूत झाला. इव्हेंडर होलिफील्ड या बॉक्सरशी लढत असताना, त्याने होलिफील्डच्या कानाचा चावा घेऊन तुकडा पाडला. पुढे त्याची रया ओसरली. तरीदेखील ५०-६ ही त्याची जय-पराजयाची आकडेवारी आजही सर्वोत्तम मानली जाते. २००५मध्ये तो निवृत्त झाला. अधूनमधून तुरुंगातही जात राहिला. अखेर ‘हँगओव्हर’ चित्रपटाने त्याला पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आणले. 

लढत रंगलीच नाही…

नेटफ्लिक्सने जेक पॉल वि. माइक टायसन लढतीला भरपूर प्रसिद्धी दिली. या कंपनीला आता लाइव्ह स्ट्रीमिंग क्षेत्रात जम बसवायचा आहे. पण प्रत्यक्ष लढतीमध्ये टायसनला फार जम बसवता आला नाही. ५८ वर्षीय टायसनचा फारसा सराव राहिलेला नाही, हे स्पष्टच दिसले. त्याने मोजकेच गुद्दे जेकच्या दिशेने लगावले. याउलट २७ वर्षीय जेकचा रिंगमधील वावर चपळ होता. त्याने सरावही बऱ्यापैकी केलेला दिसून आला. अर्थात तरीही टायसनच्या फार समीप जाऊन त्याच्या गुद्द्याचा प्रहार झेलण्याची मानसिक तयारी जेकने केलेली नव्हती. टायसनला थकवून, संधी मिळताच त्याच्या हल्ला करण्याचे डावपेच जेकने अंगिकारले. आठ फेऱ्यांअखेरीस लढत थांबवली गेली. अखेर गुणांवर जेकला विजयी घोषित केले गेले. 

हेही वाचा – Why Earth Looks Flat:पृथ्वी गोल असूनही ती सपाट कशामुळे दिसते?

फायदा नेटफ्लिक्सलाच?

या लढतीचे प्रक्षेपण तांत्रिकदृष्ट्या सदोष होते. अनेकदा चलचित्रांचे ‘रेंडरिंग’ व्यवस्थित होत नव्हते. टेक्सासमधील या लढतीसाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांची निराशा झाली. नेटफ्लिक्सवरही अनेकांनी ताशेरे ओढले. पण काही लाख यूजर्सनी लढत पाहण्यासाठी लॉग-इन केल्याचा फायदा नेटफ्लिक्सला झालाच. भविष्यातही ही लढत आणखी असंख्यांकडून पाहिली जाईलच. दोन ‘चक्रम’ व्यक्तिमत्त्वांमधील या लढतीचे आकर्षण अल्पवाधीत संपण्यासारखे नाही. टायसन आजवर केवळ सहाच बॉक्सर्सशी हरला होता. त्याला हरवणारा सातवा बॉक्सर व्यावसायिक नव्हता, तर यू-ट्यूबर होता, इतकेच या लढतीचे कवित्व. काहींच्या मते निकालही ‘फिक्स्ड’ होता. टायसन आणि जेक यांना अर्थातच या लढतीसाठी मोठे घबाड मिळाले. ते किती याची  वाच्यता अद्याप कोणी केलेली नाही. 

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mike tyson defeated by youtube influencer was the fight real benefit of netflix print exp ssb