मीरारोड भागातील हत्या प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. ५६ वर्षीय मनोज साने नावाच्या आरोपीने त्याची कथित लिव्ह-इन पार्टनर असलेल्या ३२ वर्षीय सरस्वती वैद्य नामक महिलेचा निर्घृण खून केला. आरोपीने खून करून या महिलेच्या शरीराचे बारिक तुकडे केले. तसेच हे तुकडे कुकरमध्ये शिजवले. या हत्याप्रकरणामुळे महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आरोपीने हा खून नेमका का आणि कसा केला? असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी आतापर्यंत केलेला तपास आणि आरोपीच्या चौकशीतून काय काय समोर आले, हे जाणून घेऊ या…

आरोपी दुर्धर आजाराने ग्रस्त

मनोज सानेने केलेल्या खुनाची तुलना श्रद्धा वालकर खून प्रकरणाशी केली जात आहे. पोलिसांनी मनोज साने याला अटक केले असून त्याची चौकशी केली आहे. त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मनोज साने दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. याबाबत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला माहिती दिली आहे. “आरोपी साने हा २००८ सालापासून दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. याबाबतची माहिती खुद्द साने यानेच दिली आहे. या आजाराला थोपवण्यासाठी तो २००८ सालापासून औषधं घेत आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी आरोपीचा अपघात झाला होता. अपघातावरील उपचारादरम्यान त्याला रक्त चढवण्यात आले होते. यादरम्यान संक्रमित रक्त देण्यात आल्याचे आरोपी साने याला वाटते,” असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा >> भारतीयांसाठी मधुमेह ठरतोय चिंतेची बाब, नव्या अभ्यासातून स्पष्ट; जाणून घ्या सविस्तर

मृत सरस्वती वैद्य स्वभावाने खूप आक्रमक

मृत सरस्वती वैद्य स्वभावाने खूप आक्रमक होत्या. तसेच मनोज साने नेहमीपेक्षा उशिरा घरी आल्यावर तो माझी फसवणूक करत आहे, असे सरस्वती वैद्य यांना सतत वाटायचे, असे आरोपीने चौकशीदरम्यान सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार मृत सरस्वती वैद्य या इयत्ता दहावीच्या परीक्षेची तयारी करत होत्या. त्यामुळे आरोपी साने हा वैद्य यांना या परीक्षेसाठी मार्गदर्शन करत होता. सातव्या मजल्यातील ज्या ठिकाणी वैद्य यांचा खून झाला होता, तेथे बोर्डावर गणिताची काही उदाहरणे लिहिलेली होती.

मृत सरस्वती वैद्य यांनी आत्महत्या केली?

आरोपी मनोज साने याने सरस्वती वैद्य यांचा खून करून त्यांच्या शरीराचे तुकडे केले. तसेच हे तुकडे कुकरमध्ये शिजवले. मात्र आरोपी साने याने सरस्वती वैद्य यांनी आत्महत्या केल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे पोलिसांच्या दाव्यानुसार सरस्वती वैद्य आणि साने या दोघांमध्ये भांडण झाले होते. त्यानंतर वैद्य यांनी विष प्राशन केले होते.

हेही वाचा >> विश्लेषण : राज्यातील शासकीय वसतिगृहांची एकूणच अवस्था गंभीर का?

सरस्वती वैद्य यांचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला अधिक माहिती दिली आहे. “मुंबईजवळच्या मीरा रोड येथील एका घरात आरोपीला महिला खाली पडलेली दिसली. आरोपीने महिला जिवंत आहे का? हे पाहिले. मात्र सरस्वती वैद्य मृत असल्याचे आरोपीला समजले. या प्रकारामुळे आरोपी साने घाबरला. कारवाईच्या भीतीमुळे त्याने या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला, असे आरोपीने चौकशीत सांगितले आहे,” असे या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. आरोपीने हे सर्व कबुल केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मनोज साने हा सरस्वती वैद्य यांना मारहाण करायचा.

आरोपी सानेचा शेजारच्यांशी संवाद नाही

आरोपी त्याच्या शेजाऱ्यांशी कसलाही संवाद साधत नव्हता. याबाबत त्याच्या शेजाऱ्यांनी माहिती दिली आहे. “आरोपी साने हा इतरांमध्ये मिसळत नव्हता. आमच्या इमारतीत काहीतरी सडल्याप्रमाणे वास येत होता. मंगळवार-बुधवारपासून हा वास येण्यास सुरुवात झाली होती. मात्र साने याच्या घरातून हा वास येत असेल, याची आम्हाला कल्पनादेखील नव्हती. अशा प्रकारच्या घटना आम्ही फक्त टीव्हीवरच पाहिलेल्या आहेत,” असे साने याच्या शेजाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा >> शाळेत ‘अबाया’ परिधान करण्यास मज्जाव केल्याने वाद, जम्मू काश्मीरमध्ये नेमकं काय घडतंय? जाणून घ्या…

वैद्य यांची भीषण हत्या

आरोपी साने याने मृत महिला सरस्वती वैद्य यांच्या शरीराचे तुकडे करण्याआधी त्यांचा गळा दाबल्याचे म्हटले जात आहे. ४ जून रोजी ही घटना घडली होती. हा सर्व प्रकार दाबण्याचा आरोपी प्रयत्न करत होता. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीने सरस्वती वैद्य यांच्या मृतदेहाचे २० तुकडे केले. मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी आरोपीने तीन कटरचा वापर केला. मृतदेहाचे काही तुकडे किचनमध्येही होते. शरीराच्या तुकड्यांचा घाणेरडा वास येऊ नये म्हणून आरोपीने हे तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवले. शरीराचे तुकडे शिजवल्यानंतर ते प्लॅस्टिक बॅकमध्ये भरून त्यांची विल्हेवाट लावण्याचा आरोपीचा हेतू होता, असे पोलिसांनी सांगितले आहे.

“हॉलमध्ये एकूण तीन कटर ठेवलेले होते. हॉल तसेच बेडरुमध्ये सर्वत्र काळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या बॅग पसरलेल्या होत्या. मृत महिलेचे केस बेडरुमध्ये पडलेले होते. किचनमध्ये तीन बकेट्स होते. या बेकेट्समध्ये मृत महिलेच्या शरीराचे छोटे-छोटे तुकडे होते. या बकेट्समध्ये रक्त साचलेले होते. पोलिसांना मृत महिलेचा एक पायदेखील सापडला होता,” असे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा >> विश्लेषण : महिलांविरोधातील गुन्ह्यांची स्थिती काय?

‘आरोपीने मृतदेहाचे तुकडे कुत्र्यांना खायला दिले नाहीत’

आरोपी भटक्या कुत्र्यांना काहीतरी खायला देत होता, असे म्हटले जात आहे. आरोपी महिलेच्या शरीराचे तुकडे त्या कुत्र्यांना खायला देत असावा, असा दावा केला जात होता. मात्र मीरा भाईंदर, वसई विरारचे पोलीस उपायुक्त जयंत बाजबाले यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. “आरोपीने मृत महिलेच्या शरीराचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवले हे सत्य आहे. मात्र त्याने ते तुकडे कुत्र्यांना खायला दिलेले नाहीत,” असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या दाव्यानुसार आरोपी मृतदेहाच्या तुकड्यांना उकळून ते प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये भरू पाहात होता. आरोपीने मृतदेहाचे काही तुकडे टॉयलेटमध्ये टाकले का? याचादेखील पोलीस शोध घेत आहेत.

दरम्यान, आरोपीवर भारतीय दंड विधानाच्या कलम २०१ आणि ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. खोटी माहिती देणे, खून करणे असे गुन्हे त्याच्याविरोधात नोंदवण्यात आलेले आहेत.