वो आए घर में हमारे, खुदा की क़ुदरत हैं!
कभी हम उनको, कभी अपने घर को देखते हैं….
ही शायरी आपल्यापैकी अनेकांनी ऐकली असेल. या शायरीचा उद्गाता कोण हे इथे वेगळे सांगायला नको. त्याच प्रसिद्ध गालिबचा आज स्मृतिदिन आहे. त्याच निमित्ताने या कवीच्या जीवनाचा घेतलेला हा आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गालिबने उर्दू कवितेला एक नवी दृष्टी दिली. आपल्या काव्याच्या माध्यमातून रोमँटिसिझम, वास्तववाद आणि तत्त्वज्ञान यांचा अप्रतिम संगम साधला. त्याची फारसी कविता देखील तितकीच प्रभावशाली आणि विद्वत्तापूर्ण आहे. गालिबच्या कवितांमध्ये परंपरा, धर्म आणि नियती यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्याने आपल्या कवितेच्या माध्यमातून जीवनाच्या अस्थिरतेवर आणि मानवी भावनांवर भाष्य केले. ‘हजारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहोत निकले मेरे अरमान, लेकिन फिर भी कम निकले’ (हजारो इच्छा, प्रत्येक इच्छा इतकी तीव्र की जीव जाईल, अनेक इच्छा पूर्ण झाल्या, पण तरीही अपुऱ्या वाटल्या) ही शायरी त्याच्या जीवनविषयक दृष्टीकोनावर प्रकाश टाकते. गालिब हा त्याच्या बुद्धिमत्तेसाठी आणि उपहासात्मक शैलीसाठी ओळखला जातो. त्याने समाज, राजकारण आणि मानवी स्वभावावर निर्भीड भाष्य केले. त्याच्या पत्रलेखनात देखील हीच शैली आढळते. गालिबने उर्दू पत्रलेखनाला एक नवीन उंची दिली. त्याच्या पत्रांमध्ये संवादात्मक शैली, विनोद आणि सामाजिक भाष्य आढळते. उर्दू गद्य साहित्याला आकार देण्यात त्याचा मोठा वाटा आहे.

मिर्झा असदुल्ला खान गालिब वयाच्या सातव्या वर्षी प्रथमच आपले जन्मस्थान आग्रा सोडून दिल्लीला आला. वयाच्या १३ व्या वर्षी पहिला नवाब लोहारू आणि फिरोजपूर झिरका यांच्या भाचीशी विवाह झाल्यानंतर तो मुघल राजधानीत कायमचा स्थायिक झाला. त्याने पुढची ५० वर्षे याच शहरात घालवली. या सर्व काळात गालिबने कधीही स्वतःचे घर विकत घेतले नाही, तो नेहमी भाड्याच्या घरात राहायचा आणि तिथे कंटाळा आला की, तिथून दुसऱ्या ठिकाणी जायचा. मात्र, त्याने कधीही गली कासिम जान किंवा त्याच्या आसपासची जागा सोडली नाही. त्याचे शेवटचे घर म्हणजे जिथे त्याचा मृत्यू झाला ते एका मशिदीच्या सावलीत होते. याचे वर्णन करणारा त्याचा एक शेर प्रसिद्ध होता.
“मस्जिद के ज़ेरे साया एक घर बना लिया है, एक बंदा-ए-कमीना हमसाया-ए-ख़ुदा है।”
(मशिदीच्या सावलीत मी एक घर बांधले आहे, एका हलक्या माणसाचा निवास खुदाच्या शेजारी आहे.)

गालिब हा मुघलांच्या पडत्या आणि ब्रिटिशांच्या उदयाच्या कालखंडात होऊन गेला. तो जेव्हा दिल्लीला आला तेव्हा मुघल सम्राट अकबर शाह दुसरा (१८०६-१८३७) राज्य सांभाळत होता. शाही आश्रयाखाली दाग देहलवी (१८३१-१९०५) आणि मोमिन खान मोमिन (१८००-१८५१) यांसारखे कवी अप्रतिम कविता लिहीत होते. सामंत घराण्यातील असल्यामुळे गालिब देखणा आणि रुबाबदार होता आणि त्याची गणना शहरातील श्रीमंतांमध्ये होत होती. दिल्लीला स्थायिक झाल्यानंतर अवघ्या सहा वर्षांत गालिबने आपली सर्वोत्तम काव्यरचना पूर्ण केल्याचे मानले जाते तेव्हा तो केवळ १९ वर्षांचा होता. त्याची कविता दिल्लीतील जनमानसात विलक्षण लोकप्रिय झाली होती. तो अभिमानाने म्हणायचा, “जिस शायर की ग़ज़ल बालाख़ाने में डोमनी और सड़क पर फ़क़ीर गाए, उसे कौन मात कर सकता है?”

गालिबला माहीत होते की, मुघल किंवा ब्रिटिशांचा रोष ओढवून घेणे त्याच्यासाठी शहाणपणाचे ठरणारे नव्हते. कारण तो पेन्शन आणि अनुदानासाठी दोघांवरही अवलंबून होता. त्याने ब्रिटिशांकडून पेन्शन मिळवण्यासाठी सातत्याने लढा दिला. म्हणूनच दोघांचीही स्तुती करणाऱ्या अनेक कविता लिहिल्या. मात्र, तो कधीही ताटाखालचा मांजर नव्हता. तो निर्भीडपणे, कोणाच्याही भीतीशिवाय किंवा लांगूलचालन न करता आपले मत मांडायचा. मुक्तस्वभावाचा आणि प्रस्थापित रूढी-परंपरांना विरोध करणारा असे ते वेगळेच व्यक्तिमत्त्व होते. धर्म आणि परंपरांचे औपचारिक बंधन त्याला हास्यास्पद आणि निरर्थक वाटत असे. त्याच्या कवितांमध्ये “का, काय, केव्हा, कुठे, कसे?” यांसारख्या प्रश्नार्थक शब्दांचा भरपूर वापर आहे, हे त्याच्या चिकित्सक वृत्तीचे प्रतिबिंब आहे.

१८५८ साली त्याने आपला जुना शिष्य हार गोपाल तफ्ताला लिहिलेल्या एका पत्रात स्पष्ट शब्दांत लिहिले की, वडीलधाऱ्यांनी जे काही लिहिले, तेच सत्य आणि योग्य आहे, असे समजू नकोस. जुन्या काळातही मुर्ख माणसे होतीच. बहादुर शाह जफर स्वतःही एक प्रतिष्ठित कवी होता. याच्याशी गालिबचे संबंध मैत्रीपूर्ण होते. मात्र, १८३७ साली सम्राटाने त्याचा गुरु मोहम्मद इब्राहिम जौक (१७८९-१८५४) याला राजकवी (कवी-ए-लाशकर) म्हणून निवडले तेव्हा गालिब दुखावला गेला. त्याच्या मनातील असंतोष तो लपवू शकला नाही. त्याने एक गझल लिहिली, वारा आता त्याच्या विरोधात वाहत आहे, त्याचे नांगर तुटला आहे आणि त्याची नौका भरकटत आहे. १८५४ साली जौकच्या मृत्यूनंतर गालिबला अखेर राजकवी म्हणून मान्यता मिळाली आणि तो १८५७ पर्यंत या पदावर राहिला.

१८५७ च्या स्वातंत्र्य समरात गालिब उध्वस्त झाला. हा काळ दिल्लीसाठी आणि गालिबच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही एक निर्णायक वळण होते. ‘दास्तानबू’ (१८५८) या त्याच्या फारसी रोजनिशीत त्याने या उठावाचे तपशीलवार वर्णन केले आहे. या काळात त्याने आपला धाकटा भाऊ आणि अनेक जिवलग मित्र गमावले. तो लिहितो की, राजघाटपासून चांदणी चौकापर्यंत मृतदेह पडले होते आणि त्याच्या महत्त्वाच्या हस्तलिखितांची राख झाली होती. अनेकदा दु:खं सोसूनही, स्वतःवर हसण्याची कला त्याने आत्मसात केली होती. विद्रोहानंतर, मुघल दरबाराशी संबंधित असलेल्या मुसलमानांना पकडून इंग्रज शिक्षा करत होते. गालिबलाही अटक झाली आणि ब्रिटिश अधिकाऱ्याच्या समोर हजर करण्यात आले. यावेळी त्याचा ब्रिटिश अधिकाऱ्याशी झालेला संवाद रोचक आहे. अधिकाऱ्याने त्याला विचारले, तू मुसलमान आहेस का?…..गालिबने उत्तर दिले, जी, आधा मुसलमान हूं! (मी फक्त अर्धा मुसलमान आहे!) ब्रिटिश अधिकारी चकित झाला आणि विचारले, त्याचा अर्थ काय?..गालिबने मिश्कील हसत उत्तर दिले, शराब पीता हूं, सुअर का गोश्त नहीं खाता! (मद्यपान करतो, पण डुकराचे मांस खात नाही!). गालिबने आयुष्याच्या निम्म्या काळात आपल्या पेन्शनमध्ये वाढ करण्यासाठी ब्रिटिशांकडे सातत्याने अर्ज केले. पण तरीही तो कायम कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला आणि सावकारांच्या दयेवर जगत राहिला. आग्र्यामध्ये त्याचे बालपण त्याच्या आजोळच्या संपन्न घरात गेले. मात्र, दिल्लीमध्ये त्याला ते सुख लाभले नाही.

त्याला महागड्या मद्याची विशेष आवड होती. वाइन, शँपेन आणि ओल्ड टॉम व्हिस्की किंवा रम हे मद्य त्या काळात फक्त निवडक छावण्यांमध्येच मिळत असे. मात्र, ब्रिटिश अधिकाऱ्यांशी असलेल्या संबंधांमुळे गालिबला मेरठच्या जवळच्या छावणीतून ओल्ड टॉम नियमितपणे मिळत असे. जेव्हा त्याचे धार्मिक मित्र त्याला सांगायचे की, दारू पिणाऱ्याच्या प्रार्थना कधीही स्वीकारल्या जात नाहीत, तेव्हा तो मिश्कीलपणे उत्तर द्यायचा, “जिसके पास शराब हो, उसे किस चीज के लिए दुआ करने की जरूरत है?” (ज्याच्याकडे मद्य आहे, त्याला अजून कसली प्रार्थना करायची गरज आहे?). गालिबला बुद्धिबळ खेळण्याची, जुगाराची आणि आंब्यांवर ताव मारण्याची विशेष आवड होती. त्याच्या जुगाराच्या सवयीमुळे १८४१ मध्ये त्याच्या घरी छापा टाकण्यात आला आणि १८४७ मध्ये त्याला सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, त्याने फक्त अर्धी शिक्षा कारावासात भोगली.

त्याच्या घराची देखभाल एक लहानसा नोकरवर्ग करत असे. यामध्ये कल्लू नावाचा नोकर आणि वफादार नावाची दासी मुख्य भूमिका बजावत. गालिब आपल्या मद्याच्या बाबतीत अतिशय चोखंदळ होता. कल्लूला त्याच्या मनाप्रमाणे मद्य तयार करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले होते. सैफ महमूद आपल्या ‘Beloved Delhi: A Mughal City and Her Greatest Poets’ (2018) या पुस्तकात लिहितात. “गुलाबपाण्यात मिसळून दारू मातीच्या एका विशेष भांड्यात (आबखोरा) ओतली जाई. मग हे आबखोरा झाकून जमिनीत पुरले जाई किंवा काही तास पाण्याच्या टाकीत तरंगत ठेवले जाई. हे सगळं गालिबच्या पेयपानाच्या वेळेसाठी खास तयारी म्हणून केलं जाई.” जसे गालिबने कधीही घर खरेदी केले नाही, तसेच त्याने त्याचे संपूर्ण आयुष्य वाचन आणि लेखनात गेले तरीही कधीही पुस्तके विकत घेतली नाहीत.

दिल्लीमध्ये अलाह माशाल्लाह नावाचा एक माणूस साधी सर्क्युलेटिंग लायब्ररी चालवत असे. तो पुस्तक विक्रेत्यांकडून भाड्याने पुस्तके घेऊन लोकांच्या घरी पोहोचवत असे. गालिब हा त्याच्या नियमित ग्राहकांपैकी एक होता. गालिबने फारसा प्रवास केला नाही. तो कधीही दिल्लीपासून फार दूर गेला नाही. फक्त एकदाच वयाच्या ४०व्या वर्षी तो ब्रिटिश अधिकाऱ्यांकडे अर्ज करण्यासाठी कोलकात्याला गेला होता. तो दोन वर्षे कोलकात्यात राहिला. या प्रवासादरम्यान, त्याने काही महिने लखनऊ आणि बनारस येथेही घालवले.

आज गालिबचे अखेरचे घर दिल्लीच्या बल्लिमारानमधील गली कासिम जान येथे आहे. हे एक जुने, जीर्ण झालेलं घर आहे. या घराच्या भोवती सनग्लासेस, कपडे आणि बूट विकणाऱ्या लहान दुकानांची गर्दी आहे. वाहतुकीच्या कर्कश आवाजात आणि बाजाराच्या गडबडीत हरवलेले हे घर मुघल काळातील शेवटच्या महान शायराची कहाणी सांगते. गालिबच्या मृत्यूनंतर १५० वर्षांहून अधिक काळ उलटून गेला तरीही त्याचा प्रभाव आजही तितकाच मोठा आहे. गालिब की हवेली ही ३०० वर्षे जुनी वास्तू असून भारतीय पुरातत्त्व खात्याने वारसा स्थळ म्हणून जतन केली गेली आहे. या हवेलीत गालिबच्या जीवन आणि कार्याचा आढावा घेणारे संग्रहालय आहे. येथे ठेवलेल्या प्रदर्शनांमध्ये गुलजार यांनी दान केलेली गालिबची प्रतिमा, गालिबच्या कविता, पत्रे, कपडे, छायाचित्रे आणि हुक्का ओढत बसलेल्या गालिबची प्रतिकृती यांचा समावेश आहे. ही हवेली मुघल स्थापत्यशैलीत बांधली आहे. यात लखोरी (भट्टीत भाजलेल्या) विटा वापरण्यात आल्या आहेत. प्रवेशद्वारावर अर्धवर्तुळाकार कमान असून अंगणावर छज्जे (ओव्हरहँगिंग इव्हज्) झुकलेले दिसतात.

गुलजार यांनी १९८८ मध्ये तयार केलेल्या ऐतिहासिक ‘मिर्झा गालिब’ मालिकेत गालिबच्या शेवटच्या दिवसांशी संबंधित गली कासिमच्या सौंदर्याचे शब्दांकन केले होते. निस्तेज आणि अंधाऱ्या गली कासिममधून प्रकाशाचा एक झोत उमटतो. गालिबचे समाधीस्थळ निजामुद्दीन बस्ती येथे तत्कालीन नवाबाच्या कुटुंबाच्या कब्रस्तानात आहे. गालिबच्या पत्नीचा मृत्यूही त्याच दिवशी (१५ फेब्रुवारी) झाला आणि तिलाही त्याच्याच शेजारी दफन करण्यात आले. गालिबच्या समाधीपासून काही मीटर अंतरावर १३ व्या शतकातील सूफी संत निजामुद्दीन औलिया यांचा दरगाह आहे, जिथे सतत भक्तांची रीघ लागलेली असते. त्याच दरगाह संकुलात सूफी कवी आणि संगीतकार अमीर खुसरो यांची कबर आहे. गालिबने अमीर खुसरोंना सर्वात महान पर्शियन कवी म्हणून गौरवले होते. ‘मजार-ए-मिर्झा’ म्हणजे गालिबची कबर ही शेक्सपिअरच्या स्ट्रॅटफोर्ड- अपॉन- एव्हॉनसारखी भव्य वास्तू नाही, तरीही दूरदूरहून त्याचे चाहते आदरांजली वाहण्यासाठी इथे गर्दी करत असतात.