अन्वय सावंत
भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाचे जेतेपद पटकावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ आता पाकिस्तानविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या तयारीला लागला आहे. ऑस्ट्रेलियाचा तडाखेबंद सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची ही अखेरची कसोटी मालिका ठरण्याची शक्यता आहे. पाकिस्तानविरुद्ध १४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी वॉर्नरला ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळाले आहे. तसेच पुढील दोन सामन्यांसाठीही त्याचे संघातील स्थान कायम राहणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या काही काळात कसोटी क्रिकेटमध्ये धावांसाठी झगडावे लागत असतानाही वॉर्नरला सातत्याने संधी मिळणे आणि त्याने स्वत:च्या मर्जीने निवृत्ती घेणे हे ऑस्ट्रेलियन संघातील त्याचा माजी सहकारी मिचेल जॉन्सनला फारसे आवडलेले नाही. जॉन्सनने वॉर्नरवर घणाघाती टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कसोटी निवृत्तीबाबत वॉर्नर काय म्हणाला होता?

या वर्षी जूनमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपदाची (डब्ल्यूटीसी) अंतिम लढत झाली होती. इंग्लंडमधील ओव्हल स्टेडियमवर झालेल्या या लढतीपूर्वी वॉर्नरने आपल्या भविष्याच्या योजनांबाबत भाष्य केले होते. ‘‘मी ‘डब्ल्यूटीसी’ अंतिम लढत आणि ॲशेसमध्ये चांगली कामगिरी करू शकलो, तर पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची मला संधी मिळेल. ती माझी अखेरची कसोटी मालिका असेल,’’ असे वॉर्नर म्हणाला होता. ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम लढतीत वॉर्नरला ४३ आणि १ धावच करता आली. मात्र, ऑस्ट्रेलियाला भारतावर विजय मिळवण्यात यश आले. त्यानंतर ॲशेसच्या पाच सामन्यांच्या १० डावांत मिळून वॉर्नरला केवळ दोन अर्धशतके करता आली. वॉर्नरला गेल्या ३६ कसोटी डावांत केवळ २६.७४च्या सरासरीने धावा करता आल्या आहेत. असे असले तरी निवड समितीने वॉर्नरवर विश्वास दाखवताना त्याची पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी निवड केली आहे.

आणखी वाचा-विश्लेषण: विधिमंडळाचे नागपूर अधिवेशन कशासाठी, कोणासाठी?

जॉन्सनने काय टीका केली?

कामगिरीत सातत्य नसताना वॉर्नरला कसोटी संघात स्थान का दिले हे समजण्यापलीकडचे आहे, असे जॉन्सनने ‘वेस्ट ऑस्ट्रेलियन’ वृत्तपत्रातील स्तंभात लिहिले. तसेच २०१८च्या चेंडू कुरतडणे प्रकरणामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची प्रतिमा मलिन झाली होती आणि यात वॉर्नरची मुख्य भूमिका होती. अशा खेळाडूला स्वत:च्या मर्जीने निवृत्ती घेण्याचा हक्क कोणी दिला? त्याला इतका आदर का दिला जात आहे? असे प्रश्नही जॉन्सनने ३ डिसेंबर रोजी (रविवार) प्रसिद्ध झालेल्या आपल्या स्तंभात उपस्थित केले.

जॉन्सनने लेखात नक्की काय लिहिले?

‘‘पाच वर्षे झाली तरी चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणातील आपला सहभाग वॉर्नरने पूर्णपणे मान्य केलेला नाही. आता स्वत:च्या मर्जीने कसोटीतून निवृत्ती घेत तो पुन्हा ऑस्ट्रेलियाचा अपमान करत आहे, अहंकार दाखवत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये धावांसाठी झगडत असलेला सलामीवीर निवृत्तीची तारीख स्वत: कसा ठरवू शकतो? ऑस्ट्रेलियन क्रिकेटची प्रतिमा मलिन करणाऱ्या खेळाडूला एखाद्या ‘हिरो’प्रमाणे निरोप का दिला जात आहे?’’ अशी टीका जॉन्सनने केली. तसेच त्याने ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांनाही खडे बोल सुनावले होते.

आणखी वाचा-विश्लेषण : ‘ग्रीन कार्ड’च्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो भारतीयांना दिलासा?

चेंडू कुरतडण्याचे प्रकरण काय होते? त्यात वॉर्नरची भूमिका काय होती?

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०१८ मध्ये केप टाऊन येथे झालेल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर कॅमरून बॅन्क्रॉफ्टने ‘सॅण्डपेपर’चा वापर करून चेंडूचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न केला होता. याचे कारण दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाज ज्या प्रमाणात चेंडू स्विंग करत होते, त्या तुलनेत ऑस्ट्रेलियन गोलंदाज फारच फिके ठरत होते. बॅन्क्रॉफ्टचे हे कृत्य सामन्याचे प्रसारण करणाऱ्या वाहिनीने टिपले होते. या प्रकरणात ऑस्ट्रेलियन क्रिकेटची नाचक्की झाली होती. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कठोर कारवाई करताना तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची, तर बॅन्क्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घातली होती. तसेच स्मिथवर दोन वर्षांसाठी कर्णधारपद भूषवण्यावर बंदी घालण्यात आली होती. या प्रकरणात वॉर्नरला मुख्य सूत्रधार ठरवण्यात आले होते. त्याच्या सूचनेनंतरच बॅन्क्रॉफ्टने चेंडूला छेडछाड केल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे वॉर्नरला आजीवन कर्णधारपद भूषवता येणार नसल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले होते. विशेष म्हणजे आता वॉर्नर निवृत्त झाल्यास त्याची जागा घेण्यासाठी ज्या सलामीवीरांचा विचार केला जात आहे, त्यात ब्रॅन्क्रॉफ्टचाही समावेश आहे.

जॉन्सनच्या टीकेमागे वैयक्तिक कारण आहे का?

जॉन्सनने वॉर्नरवर घणाघाती टीका केल्यानंतर याची समाजमाध्यमांवर बरीच चर्चा झाली. तसेच आपल्या माजी सहकाऱ्याला अशा प्रकारे लक्ष्य केल्यामुळे जॉन्सनलाही बऱ्याच टीकेला सामोरे जावे लागले. त्यानंतर जॉन्सनने आपल्या टीकेमागचे कारण स्पष्ट केले. ‘‘या वर्षाच्या सुरुवातीला वॉर्नरच्या पत्नीने एक विधान केले होते. सलामीच्या स्थानासाठी वॉर्नरला पर्यायच नाही. त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही, असे वॉर्नरची पत्नी म्हणाली होती. तिच्या या विधानाला मी उत्तर दिले होते, जे वॉर्नरला फारसे आवडले नाही आणि त्याने मला संदेश पाठवला होता, जो फार वैयक्तिक होता. मी त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याने उत्तर दिले नाही. क्रिकेटपटू म्हणून निवृत्त झाल्यानंतर मी प्रसारमाध्यमांशी जोडला गेलो आहे. मी ज्या गोष्टी पाहतो, त्याबाबत मला लिहावे किंवा बोलावे लागते. एखाद्या खेळाडूला ते न पटल्यास तो मला थेट संपर्क करू शकतो. मी आता जे वॉर्नरबाबत लिहिले, त्यामागे हेसुद्धा एक कारण होते. वॉर्नरने मला काय संदेश पाठवला, तो नक्की काय म्हणाला होता, हे मी सांगणार नाही. मात्र, त्याने काही गोष्टी लिहिल्या होत्या ज्या फार वाईट होत्या,’’ असे जॉन्सन म्हणाला.

आणखी वाचा-विश्लेषण : “देव पुजाऱ्यांचा की भक्तांचा?”; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हा प्रश्न का विचारला?

वॉर्नरवरील टीका जॉन्सनला महागात पडली का?

जॉन्सनने वॉर्नरवर अशा प्रकारे टीका केल्यानंतर त्याचे पडसाद ऑस्ट्रेलियात उमटले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील मालिकेचे प्रसारण करणाऱ्या वाहिनीने जॉन्सनला आपल्या समालोचकांच्या यादीतून वगळले आहे. जॉन्सन आणि वॉर्नर या दोघांचीही ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणना केली जाते. त्यामुळे या दोघांमधील वाद अशा प्रकारे समोर येणे ही ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी चांगली बाब नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mitchell johnson vs david warner what is the dispute between two australian cricketers print exp mrj